Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डॉक्टरांच्या पदोन्नतीसाठी 25 लाखांची मागणी? परमबीर सिंग यांची 'लीलावती'तून तडकाफडकी उचलबांगडी

डॉक्टरांच्या पदोन्नतीसाठी 25 लाखांची मागणी? परमबीर सिंग यांची 'लीलावती'तून तडकाफडकी उचलबांगडी
 
 
लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालकपदावरून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. जुलै 2024 मध्ये नियुक्ती झालेल्या सिंग यांच्यावर कनिष्ठ डॉक्टरांकडून पदोन्नतीसाठी 25 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप झाल्यानंतर ही कारवाई झाल्याचे समजते.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‌'अँटिलिया‌' निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळून आल्याच्या घटनेनंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर तत्कालीन सरकारने परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली होती. यानंतर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले होते.

या आरोपांमुळे देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आणि पुढे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना काही काळ तुरुगांत रहावे लागले होते. दरम्यान, या घडामोडींनंतर परमबीर सिंग यांच्याविरोधातही विविध गुन्हे दाखल झाले होते. त्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र नंतर महायुती सरकारने त्यांचे निलंबन रद्द केले होते.

पोलीस दलातून निवृत्तीनंतर जुलै 2024 मध्ये परमबीर सिंग यांची लीलावती रुग्णालयात जनसंपर्क वाढविण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. या काळात माजी विश्वस्तांनी केलेला कथित आर्थिक घोटाळा आपण उघडकीस आणल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र कनिष्ठ डॉक्टरांकडून पदोन्नतीसाठी लाच मागितल्याचा आरोप, कामावर असताना गैरवर्तन, एसीमध्ये झोपणे तसेच अल्कोहोल सेवन केल्याच्या तक्रारी आल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याचे समजते. 
 
लीलावती रुग्णालयाचे कायमस्वरूपी विश्वस्त राजीव मेहता यांनी ‌बोलताना सांगितले की, परमबीर सिंग यांची नियुक्ती राजकीय नेते व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क वाढविण्यासाठी करण्यात आली होती. मात्र त्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या आणि प्रत्यक्ष कामात मोठी तफावत होती. त्यांच्या नियुक्तीचा निर्णय चुकीचा ठरल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.