Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'अजित पवारांचा 'काटा' इस्रायलच्या...', ठाकरे सेनेचा हल्लाबोल; 'अजितदादांना आदल्या दिवशी रात्री...'

'अजित पवारांचा 'काटा' इस्रायलच्या...', ठाकरे सेनेचा हल्लाबोल; 'अजितदादांना आदल्या दिवशी रात्री...'
 

"अजित पवार यांच्या अकाली मृत्यूचा दुखवटा आणि सुतक संपले. हिंदू शास्त्र व रिवाजानुसार तेरा दिवसांचे विधी पार पडले व सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. प्रफुल पटेल वगैरे मंडळींनी श्रीमती पवार यांना दादांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे सुतकातच शपथ घ्यायला लावली. त्यावर समाजात अस्वस्थता होती. आता दुःख विसरून सुनेत्रा पवार व त्यांचा पक्ष कर्तव्यास लागले असले तरी दादांच्या अपघातामागे काहीतरी काळेबेरे आहे या शंकेतून मराठी मन बाहेर यायला तयार नाही. त्यातच काल दादांचे पुतणे, आमदार रोहित पवार यांनी या अपघातामागे काहीतरी रहस्य असल्याचे पक्के सादरीकरण केल्याने एकच खळबळ उडाली आहे," असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

...म्हणून त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करणे गरजेचे

"रोहित पवार यांनी खात्री देत सांगितले की, अजित पवार यांचा बारामती विमानतळाजवळ झालेला विमान अपघात हा फक्त अपघात नसून तो एक सुनियोजित कटाद्वारे केलेला घातपात आहे. रोहित पवार यांनी त्याबाबत एक स्पष्ट सादरीकरण केले. त्यात पायलट, खासगी विमानांचे व्यवस्थापन, त्यातली बेफिकिरी, खोटारडेपणा, लपवाछपवी, पायलटची अकार्यक्षमता व इतर संशयास्पद राजकीय बाबींवर प्रकाश टाकला. हवामान ठीक नव्हते, दृश्यमानतेमुळे विमानास धावपट्टीवर उतरता आले नाही वगैरे मुद्दे पवारांनी खोटे ठरवले. विमानात तांत्रिक बिघाड अचानक कसा निर्माण झाला व तसा तांत्रिक बिघाड आधीच पायलटच्या लक्षात का आला नाही? हे विमान आदल्या रात्री गुजरातला गेले व तेथून अजित पवार यांना बारामतीत नेण्यासाठी मुंबईस आले. खासगी विमानांच्या मेंटेनन्ससंदर्भातली कंपनी ही प्रफुल पटेल यांची असल्याचा खुलासा धक्कादायक आहे. हे खरे असेल तर रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करणे गरजेचे आहे व ही चौकशी भारतीय एजन्सीकडून करणे म्हणजे आणखी एका घोटाळ्याची शक्यता आहे," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
 
हा पूर्व विदर्भातील नेता कोण?
"अजित पवार आदल्या दिवशी मोटारीनेच बारामतीत जाणार होते. 'देवगिरी' बंगल्याबाहेर संध्याकाळी त्यांच्या गाडय़ांचा ताफा लागला होता, पण पूर्व विदर्भातील एका बडय़ा नेत्याने दादांना थांबायला सांगितले. ''एका महत्त्वाच्या फाईलवर सही करावीच लागेल, मी पोहोचतो'' या निरोपानंतर ते महाशय दोन-तीन तास उशिरा पोहोचले व दादांच्या मोटारीने बारामतीकडे जाण्याची योजना रद्द झाली. हा पूर्व विदर्भातील नेता कोण? की ज्याने दादांना दोन-चार तास ताटकळत ठेवले व दुसऱ्या दिवशी 'शवपेटी' टाईप विमानातून जाण्यास भाग पाडले? प्रश्न असा आहे की, अशी कोणती अति महत्त्वाची फाईल अजित पवारांसमोर येणार होती की, त्यावर तत्काळ सही केली नसती तर महाराष्ट्राचे गतिचक्र थांबले असते?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.
...तर संशयाची जळमटे दूर होतील!

"फाईलचा विषय रोहित पवारांनी काढला म्हणून नव्याने सांगायला हवे. ''आपल्याकडे भाजपच्या घोटाळ्याची व सिंचन भ्रष्टाचाराची फाईल आहे. ती उघड केली तर स्फोट होतील,'' असे अजित पवारांनी जाहीररीत्या सांगितल्यापासून भाजपच्या गोटातून दादांवर 'दात' धरला होता. त्यामुळे अपघाताच्या आदल्या रात्री पूर्व विदर्भातील तो भाजपचा नेता फाईलवर सही घ्यायला आला होता की, दादांकडील भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल हिसकावून घ्यायला आला होता यावर प्रकाश पडायला हवा. तो पूर्व विदर्भातील नेता कोण ज्याने पवारांना बरेच तास अडकवून ठेवले? त्याचे नाव रोहित पवारांनी जाहीर केले तर संशयाची जळमटे दूर होतील," अशी अपेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

अजित पवारांचा मोसादी पद्धतीने 'काटा' काढला
"लोकांना गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूबाबत संशय होता व आता अजित पवारांच्या विमान अपघातावर लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत. अजित पवारांचा 'काटा' इस्रायलच्या मोसादी पद्धतीने काढला आहे असे पुरावे देऊन पवार कुटुंबीय आक्रोश करीत आहेत," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. "सुनेत्रा पवार व अजितदादांची मुले दुःख विसरून कामधंद्यास लागली आहेत. प्रफुल पटेल, तटकरे, मुश्रीफ वगैरे दादांचे सहकारीही राजकीय कार्यास वाहून घेताना दिसत आहेत, पण सुरतवरून मुंबईत आलेल्या 'उडत्या शवपेटी'ने अजित पवारांचा बळी घेतला. तो कटच होता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी केला. त्यांनी त्यासाठी श्रम व अभ्यास केला. दादा गेल्याच्या दुःखातून ते सावरलेले नाहीत. महाराष्ट्राचे मनही त्याच दुःखात आहे!" असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.