Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पतीच्या जबर मारहाणीत पत्नीचा मृत्यू, कोल्हापूर शहरातील प्रकार; मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

पतीच्या जबर मारहाणीत पत्नीचा मृत्यू, कोल्हापूर शहरातील प्रकार; मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार
 

पतीने मारहाण केल्यामुळे जखमी झालेल्या महिलेचा आज रुग्णालयात मृत्यू झाला. स्वाती गणेश हुबाळे (वय ४०, रा. सोन्यामारुती चौक, शनिवार पेठ, कोल्हापूर) त्यांचे नाव आहे. मारहाणीचा प्रकार आठवड्यापूर्वी झाला आहे. महिलेच्या नातेवाइकांनी पतीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर लक्ष्मीपुरी पोलिसांनी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे मान्य केल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. गणेश शंकर हुबाळे (४३) असे पतीचे नाव असल्याची माहिती स्वाती यांच्या भावाने दिली. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पोलिसांनी आणि मृत महिलेच्या नातेवाइकांनी दिलेली माहिती अशी ः स्वाती आणि गणेश यांचा २०१२ ला प्रेमविवाह झाला आहे. स्वातीचे माहेर बीडी कामगार वसाहतीमध्ये आहे. गणेश सोन्यामारुती चौकाजवळ राहतो. त्याचे कोल्हापुरी फेट्याचे दुकान आहे. त्यांना मुलगा आणि मुलगी आहे. गेले काही दिवस त्यांच्यात वारंवार भांडण होत होते. याची माहिती स्वाती यांनी माहेरी दिली होती. भाऊ प्रवीण यालाही सांगितले होते. गणेश याचे बाहेर संबंध असल्याची माहिती स्वातीला कळाली होती. त्यानंतर त्यांच्यातील वाद वाढत गेला होता. गणेशने गळ्यातील सोन्याची चेन आणि ग्रामीण भागातील जागा विक्री केल्याचेही स्वाती यांनी भाऊ प्रवीणला सांगितले होते.
 
भाऊ प्रवीण दगडू भाट यांनी सांगितले, की सात फेब्रुवारीला गणेशने स्वातीला बेदम मारहाण केली. त्यानंतर ती बेपत्ता होती. याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद देण्यासाठी गेलो. तेव्हा पोलिसांनी २४ तासांनंतर या तोपर्यंत शोध घ्या, असे सांगितले. काही कालावधीनंतर स्वातीला कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तिला पाहण्यासाठी आम्ही तेथे गेलो. त्यावेळी ती 'मला मारहाण' असे मोडकेतोडके बोलत होती.
जबर मारहाण झाल्यामुळे तिला बोलता येत नव्हते. आम्ही रुग्णालयात गेल्यानंतर पती गणेश तेथे दिसत नव्हता. इतर नातेवाईक होते. आज दुपारी तिचा मृत्यू झाला. त्यामुळे पतीला अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका आम्ही घेतली. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रुग्णालयामध्ये गेले होते. पोलिस ठाण्यात असलेले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांची भेट घेतली. त्यांनी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करणार असून त्याला जन्मठेपेची शिक्षा होईल, असे सांगितल्यामुळे आम्ही मृतदेह ताब्यात घेणार आहे. याबाबतची फिर्याद आई जयश्री यांनी दिली असल्याचे सांगितले.

दरम्यान, यामुळे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी होती. सायंकाळी स्वाती यांच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात निरीक्षक चव्हाण यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. गणेशला अटक करण्याची जबाबदारी पोलिसांनी घेतली आहे. तो कोल्हापुरातच असून स्वातीचे नातेवाईक रुग्णालयात असताना तो येत नसल्याचाही आरोप स्वातीच्या नातेवाइकांनी केला आहे.

पती बेपत्ता असल्याची नोंद
दरम्यान, संशयित गणेश १९ डिसेंबरपासून बेपत्ता असल्याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात २३ डिसेंबरला झाली होती. लोणावळा येथे कामानिमित्त गेल्यानंतर तो परत आला नाही, अशी तक्रार गणेश याची पत्नी स्वाती यांनीच दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पत्नीला मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पती गणेश हुबाळे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करणार आहे.

- सुशांत चव्हाण, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.