बागणी (जि. सांगली) : फाळकेवाडी (ता. वळवा) येथील अनिल तेरदाळे यांच्या उसाच्या फडात लपलेल्या मादी बिबट्याच्या तीन निरागस बछड्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेमुळे परिसरातून वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
केले जात असून, नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. घटनास्थळावरून
मिळालेली माहिती अशी, फाळकेवाडी (ता. वळवा) येथे नागाव रोड जोतिबा पावदका
मंदिराजवळ अनिल तेरदाळे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात उसाचे पीक आहे. या
उसामध्ये मादी बिबट्याने आपल्या तीन बछड्यांना सुरक्षिततेसाठी लपवून ठेवले
होते. मात्र, शेतावरून गेलेल्या विद्युततारांमध्ये शॉर्टसर्किटने अचानक
उसाला आग लागली.
वाळलेल्या पाचटामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याने बछड्यांना पळ काढण्यासाठी संधी न मिळाल्याने दोन बछड्यांचा जागीच मृत्यू झाला; तर एका बछड्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आपल्या पिल्लांच्या मृत्यूमुळे बिथरलेली मादी बिबट्या परिसरात डरकाळी फोडत फिरत आहे. पिल्लांच्या वियोगामुळे ही मादी अधिक हिंसक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन वावरत आहेत.काही दिवसांपूर्वीच फाळकेवाडीतील जाधव यांच्या उसाच्या फडात पांढऱ्या रंगाच्या बछड्याचे दर्शन झाले होते. त्याचा रंग पूर्णपणे पांढरा असल्याने तो कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय ठरला होता. वनविभागानेही याची दखल घेऊन त्या भागात देखरेख वाढविली होती. दरम्यान, या घटनेने ग्रामस्थांत हळहळ व्यक्त होत आहे. लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे ही दुर्घटना घडल्याने महावितरण विभागाचा निष्काळजीपणा उघड झाला असून, महावितरण विभागावरही कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
बछड्यांच्या मृत्यूमुळे परिसरात मादी
बिबट्याचा वावर असल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तरीही
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाकडून वेळोवेळी भागात शोधमोहीम
राबविण्यात येत आहे.
- भिवा कोळेकर, वनरक्षक, बावची
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.