🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सरपंचांचे उंबरठे झिजवणे व्यर्थ; शिरढोणमध्ये उत्पादन शुल्क अन् पोलिसांची केवळ 'नावालाच' कारवाई!

सरपंचांचे उंबरठे झिजवणे व्यर्थ; शिरढोणमध्ये उत्पादन शुल्क अन् पोलिसांची केवळ 'नावालाच' कारवाई!


महाराष्ट्र शासनाने ग्रामसभांना दिलेले अधिकार वापरत शिरढोणच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावात ‘दारूबंदी’चा ऐतिहासिक ठराव एकमुखाने मंजूर केला. ग्रामसभेत जेव्हा हा निर्णय झाला, तेव्हा आता गावात दारूचा थेंबही दिसणार नाही, अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतु, हा ठराव केवळ कागदावरच राहिला असून, प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र पार हवेत विरली आहे!

​गावात दारू चोरीछुपे नव्हे, तर अगदी उजळ माथ्याने आणि भरल्या पेल्याने विकली जात आहे. दारूबंदीचा ठराव करणाऱ्या ग्रामसभेच्या नाकावर टिच्चून गल्लीबोळांत अवैध दारूचा पूर आला आहे. गावाचे सरपंच सागर भंडारे यांनी आपली कर्तव्यनिष्ठा सिद्ध करत इचलकरंजीचे उत्पादन शुल्क विभाग आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवले. हातात कडक निवेदनाची प्रत घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांकडे कठोर कारवाईची ठाम मागणी केली.

​कारवाईचा केवळ 'फार्स'!
पोलीस आणि अबकारी विभागाने या निवेदनावर कारवाईचा मोठा 'फार्स' केला. "आम्ही आलो, आम्ही पाहिले, एखादी बाटली जप्त केली... आणि निघून गेलो!" अशा प्रकारच्या तोकड्या कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांचे धाबडं दणाणण्याऐवजी धाडस आणखीच वाढले आहे. पोलिसांच्या या पोरखेळावर दारूविक्रेतेही गालातल्या गालात हसत आहेत.
​महिला अन् ज्येष्ठ नागरिक वैतागले

गावातील मुबलक दारू पुरवठ्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शांतताप्रिय ग्रामस्थ पार वैतागले आहेत. संध्याकाळच्या वेळी रस्त्यावरून चालणे म्हणजे एखाद्या प्रसंगाला सामोरे जाण्यासारखे झाले असून गावातील सामाजिक स्वास्थ्य पार बिघडले आहे. 

आता तरी यंत्रणा जागी होणार का?
आता शिरढोणकरांचा प्रशासनाला एकच रोखठोक सवाल आहे— "ग्रामसभेचा हा दारूबंदीचा निर्णय काय फक्त कागदावरच ठेवण्यासाठी होता का?" संबंधित यंत्रणांनी आपली सुस्त भूमिका सोडून कागदावरच्या या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी आणि बेकायदेशीर दारूविक्रीचा कायमचा 'कार्यक्रम' करावा, हीच ग्रामस्थांची तीव्र भावना आहे. आता अबकारी खाते आणि पोलीस प्रशासन वेळीच जागे होणार की शिरढोणकर पुन्हा एकदा ग्रामसभेत आक्रमक पवित्र घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.