सांगली : दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू असतानाही शिराळ्यात सोमवारी जिवंत नागाचे दर्शन घेण्यासाठी हजारो यात्रेकरूंनी गर्दी केली होती. अमाप उत्साहात प्रतिकत्मक नाग प्रतिमांच्या मिरवणुका आवाजाच्या भिंती लावून काढण्यात आल्या.
उच्च न्यायालयाचे प्रतिबंध असताना केंद्र शासनाच्या वन, पर्यावरण आणि हवामान बदल खात्याच्या वन्यजीव विभागाकडून ४१ जणांना शैक्षणिक उद्देशासाठी आणि प्रबोधन करण्यासाठी नाग प्रदर्शन करण्यास परवानगी दिली होती. यामुळे शिराळकरांचा नागपंचमी साजरी करण्यात मोठा उत्साह यावेळी दिसून आला. नाग प्रदर्शनात दुर्मिळ असलेल्या श्वेत नागाचे प्रदर्शन हे आजच्या उत्सवातील खास आकर्षण ठरले.
नागपंचमीच्या पारंपरिक उत्सवाला शिराळ्यात मोठी परंपरा आहे. गोरक्ष नाथ यांनी भिक्षा मागत असताना एका महिलेला जिवंत नागपूजेचे वरदान दिले असल्याचे मानले जाते. काही पर्यावरण वादी मंडळींनी याबाबत न्यायालयात धाव घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने जिवंत नागाची पूजा, प्रदर्शन, हाताळणी करण्यावर प्रतिबंध घातले. गेल्या वर्षापासून केंद्रिय वन, पर्यावरण, हवामान बदल मंत्रालयाच्या वन्यजीव विभागाकडून अटी व शर्थी ठेवून नाग प्रदर्शनास केवळ शैक्षणिक कार्यासाठी परवानगी दिली जात आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने जिवंत नागपूजा अथवा नागांची मिरवणुक काढण्यास प्रतिबंध कायम असून शैक्षणिक व प्रबोधनाच्या उद्देशाने ४१ जणांना नाग प्रदर्शनास वन विभागाकडून परवानगी देण्यात आली होती.
या परवानगी नुसार वेगवेगळ्या मंडळांनी शहरातील ४१ ठिकाणी आज जिवंत नागाचे प्रदर्शन केले.यामध्ये कच्याड युवा शक्ती मंडळाने प्रदर्शित केलेला श्वेत नाग यंदाच्या उत्सवातील प्रमुख आकर्षण ठरला. याशिवाय काही मंंडळांनी दीर्घ काळ फणा काढणारा नागही प्रदर्शनात ठेवला होता.
दुपारी महाजन यांच्या घरी पूजा झाल्यानंतर अंबामातेच्या मूर्तीची प्रमुख पेठेतून सवाद्य मिरवणुक मानकर्यासमवेत काढण्यात आली. शिंग, तुतारीच्या निनादात ही मिरवणुक ग्रामदैवत अंबामाता मंदिरापर्यंत काढण्यात आली. मानाच्या पालखीची मिरवणुक पार पडल्यानंतर मंडळाच्या प्रतिकात्मक नागप्रतिमांच्या मिरवणुकांना सुरूवात झाली. आवाजाच्या भिंतीसह निघालेल्या मिरवणुकीत तरूणाईचा जल्लोष होता. मुख्य बाजारपेठेत मिरवणूक आल्यानंतर सर्वच आवाजाच्या भिंतीचा आवाज असह्य झाल्याने अनेक यात्रेकरूंनी या मिरवणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.नागपंचमीच्या दिवशी बेकायदा सर्प हाताळणी अथवा प्रदर्शन होऊ नये यासाठी वन विभागाचे १५० अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते.. यासाठी दहा गस्ती पथके तैनात करण्यात आली होती. शहरातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही नजर ठेवली होती. तसेच १५ फिरते व्हिडिओ कॅमेरे घेऊन कर्मचारी परिसरात गस्त घालत होते.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागानेही तयारी केली होती. बसस्थानक, व्यापारी हॉल, पाडळी नाका, शनिमंदिर, समाज मंदिर, नायकुडापुरा आदी ठिकाणी सात आरोग्य पथके तैनात करण्यात आली होती. सर्पदंशाच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी ६०० सर्पदंश प्रतिबंधक लसींसह औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली होती. रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उपअधीक्षकांसह ६१७ अधिकारी व कर्मचारी शिराळ्यात बंदोबस्तासाठी तैनात होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.