गुजरातमधील अहमदाबाद शहरात बुधवारी, 7 ऑक्टोबर 2026 रोजी बॉम्बस्फोटाच्या धमकीच्या ई-मेलमुळे मोठी खळबळ उडाली. शहरातील जवळपास 10 खासगी शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली.
याशिवाय नरेंद्र मोदी स्टेडियम आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांचाही ई-मेलमध्ये उल्लेख करण्यात आला होता. धमकी मिळाल्यानंतर पोलिस, बॉम्ब शोधक व निकामी पथक, डॉग स्क्वॉड आणि अँटी-सॅबोटाज पथकांनी तातडीने संबंधित ठिकाणी तपासणी सुरू केली. मात्र, तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळल्यामुळे पोलिसांनी ही धमकी खोटी असल्याचे स्पष्ट केले.धमकी मिळालेल्या शाळांमध्ये वेजलपूरमधील झायडस स्कूल, सॅटेलाइटमधील बोडकदेव स्कूल फॉर चिल्ड्रन, छारोडीमधील SGVP स्कूल, संत कबीर स्कूल, ड्राइव्ह-इन रोडवरील एशिया स्कूल आणि मेमनगरमधील HBK स्कूल यांचा समावेश असल्याचे समोर आले. या ई-मेलमध्ये सकाळी बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली होती.
विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका
धमकीचा ई-मेल मिळताच संबंधित शाळांनी खबरदारी म्हणून विद्यार्थ्यांना वेळेआधी घरी पाठवण्याचा निर्णय घेतला. पालकांना शाळेत बोलावून मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात देण्यात आले. अहमदाबादचे जिल्हा शिक्षण अधिकारी रोहित चौधरी यांनी शाळांना स्थानिक पोलिसांना तातडीने माहिती देण्याचे आणि विद्यार्थ्यांना कोणतीही घबराट न निर्माण करता सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले.
नरेंद्र मोदी स्टेडियमलाही धमकी
या धमकीच्या ई-मेलमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमचाही उल्लेख होता. विशेष म्हणजे, त्यावेळी स्टेडियममध्ये भारत U-19 आणि ऑस्ट्रेलिया U-19 यांच्यात सामना सुरू होता. धमकीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी स्टेडियमची तपासणी केली. त्यानंतर ही धमकी खोटी असल्याचे स्पष्ट झाले.ई-मेलमध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये 1 नोव्हेंबर आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 21 नोव्हेंबर रोजी बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली होती. या दोन्ही तारखा गायक दिलजीत दोसांझच्या नियोजित कॉन्सर्टशी संबंधित आहेत. ई-मेल पाठवणाऱ्याने या कार्यक्रमांना उपस्थित राहू नये, असा इशाराही दिला होता.
पोलिसांचा तपास सुरू
या ई-मेलचा स्रोत शोधण्यासाठी पोलिस आणि सायबर सेल तपास करत आहेत. यापूर्वीही अहमदाबादमधील शाळा, न्यायालये आणि इतर संस्थांना अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत. मात्र, या प्रकरणात संबंधित ठिकाणी तपासणी केल्यानंतर कोणतीही स्फोटक सामग्री किंवा संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.