महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला लवकरच सुरुवात होत आहे. यंदा ११ ऑक्टोबर २०२६ ला घटस्थापना होणार असून, त्यापूर्वी ३ ते १० ऑक्टोबर या कालावधीत आई तुळजाभवानी देवी 'मंचकी निद्रेत' असणार आहे.
या काळात तुळजापूर येथील मंदिरात भाविकांना देवीचे नेहमीप्रमाणे थेट चरणस्पर्श दर्शन घेता येत नाही. जगात तुळजापूरची श्री तुळजाभवानी ही एकमेव 'चलमूर्ती' आहे, जी वर्षातून तीन वेळेस पलंगावर विश्रांती घेते. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही अनोखी परंपरा का पाळली जाते आणि यामागील पौराणिक व धार्मिक महत्त्व काय आहे, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
मंचकी निद्रेची संपूर्ण रूपरेषा अन् धार्मिक विधी
शनिवारी, ३ ऑक्टोबर २०२६ ला सायंकाळपासून आई तुळजाभवानीच्या या घोर मंचकी निद्रेस प्रारंभ झाला आहे. या कालावधीत मंदिरात धार्मिक नियम पाळले जातात-विशेष पूजा अन् अभिषेक: ३ ऑक्टोबर ला सायंकाळी ७ वाजता मातेचा पंचामृत अभिषेक पार पडला.मानाची आरती अन् भंडारा: रात्री ८ वाजता पुजाऱ्यांच्या मानाच्या आरत्या ओवाळल्या गेल्यानंतर देवीच्या अंगाला भंडारा (हळद) लावण्यात आला.चांदीच्या पलंगावर गमन: या विधींनंतर जगदंबेच्या चलमूर्तीला खांद्यावर घेऊन मंदिरातील विशेष चांदीच्या पलंगावर निद्रेसाठी स्थानापन्न करण्यात आले.१० ऑक्टोबरपर्यंत विश्रांती: मातेची ही घोर निद्रा ३ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबरपर्यंत चालू राहील. त्यानंतर ११ ऑक्टोबर ला घटस्थापनेच्या दिवशी देवीची मूर्ती पूर्ववत सिंहासनावर विराजमान केली जाईल.
मंचकी निद्रेमागील पौराणिक कथा अन् भक्तांचा भाव
शास्त्र आणि परंपरेनुसार, तुळजाभवानी मातेच्या या निद्रेमागे अत्यंत सुरेख धार्मिक अन् मानवी श्रद्धा दडलेली आहे-
शक्ती संपादन आणि युद्धाची तयारी: पौराणिक कथेनुसार, महिषासुर राक्षसाशी लढा देण्यासाठी आणि त्याचा वध करण्यासाठी भगवती श्री तुळजाभवानीने शस्त्रे धारण केली. नऊ दिवसांच्या अखंड युद्धापूर्वी देवीने पूर्ण शक्ती आणि ऊर्जा संपादन करावी, या विचारातून ही विश्रांती दिली जाते.
भक्तांचे वात्सल्य: देवी हेच साक्षात जगताचे शक्तीरूप आहे; पण "जगाचा भार सांभाळून आपल्या आईलाही थकवा येत असेल" या भक्तांच्या भाबड्या आणि संवेदनशील विचारातून ही परंपरा सुरू झाली आहे.
झोपमोड टाळण्याचे नियम: कोणी झोपमोड केल्यास मन अशांत होते, तसाच त्रास मातेला होऊ नये म्हणून या काळात भाविक देवीच्या दर्शनाचा अट्टाहास धरत नाहीत आणि मातेला पूर्ण विश्रांती घेऊ देतात.
वर्षातून ३ वेळा अन् एकूण २१ दिवसांची निद्रा
श्री क्षेत्र तुळजापूर येथे आई तुळजाभवानी देवीला वर्षातून एकूण तीन टप्प्यांत २१ दिवसांची मंचकी निद्रा दिली जाते-शारदीय नवरात्रापूर्वी (८ दिवस): महिषासुराशी होणाऱ्या युद्धापूर्वी ऊर्जा मिळवण्यासाठीसीमोल्लंघनानंतर (५ दिवस): नवरात्रोत्सवातील विजयादशमी आणि युद्धाच्या श्रमानंतर मिळणारी विश्रांती.शाकंभरी नवरात्रापूर्वी (८ दिवस): पौष महिन्यात सृष्टीला सुजलाम-सुफलाम करणाऱ्या अन्नपूर्णा रूपातील देवीचा थकवा दूर करणारी विश्रांती.
संवेदनशील संस्कृतीचे प्रतीक
थंडीच्या दिवसांत देवाला शाल पांघरणे, गणपतीचा पाहुणचार करणे किंवा तुळजाभवानीला पलंगावर विश्रांती देणे, या सर्व गोष्टी भारतीय संस्कृतीतील सहृदयता दर्शवतात. निसर्ग, देव आणि मानवामध्ये असणारे हे संवेदनशील नाते जपण्याचे काम तुळजापूरची ही मंचकी निद्रेची परंपरा युगांयुगांपासून करत आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.