लवंग्यात साधूंना मारहाणप्रकरणी सातजण ताब्यात पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांची माहिती
सांगली : लवंगा (ता. जत) येथे मुळे पळवणारी टोळी समजून भगव्या कपड्यातील साधूंना मारहाण करणाऱ्या सातजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मारहाणीची घटना घडली होती. याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी काही संशयित आहेत का याचा शोध सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितले.
आमसिद्धा तुकाराम सरगर, लहू रकमी लोखंडे, सागर तांबे, नागराज पवार, रमेश कोळी, सचिन बिराजदार, शिवाजी सिद्धराम सरगर अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. मंगळवारी सकाळी भगवे कपडे घातलेले चार साधू लवंगा येथील मलकारसिद्ध मंदिरात आले होते. त्यावेळी त्यांना मुले पळवणारी टोळी समजून गावातील काही लोकांनी त्यांना चामडी पट्टा, लाथा बुक्क्यांनी मारहाण करून पकडून ठेवले होते. याची माहिती गावच्या सरपंचांनी उमदी पोलिस ठाण्यास दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन साधूंकडे चौकशी केली. त्यावेळी राजू गोसावी, पप्पू गोसावी, नेमचंदनाथ गोसावी, प्रेमशंकर यांना मारहाण केल्याचे स्पष्ट झाले. नंतर चौघेही पोलिसांत तक्रार न देता तेथून निघून गेले. नंतर संशयितांविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करून सातजणांना ताब्यात घेण्यात आले. अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मागर्दशर्नाखाली उमदीचे सहाय्यक निरीक्षक पंकज पवार अधिक तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
