जनतेची पदयात्रा... - मधुकर भावे
राहुल गांधी यांची पदयात्रा महाराष्ट्रात पोहोचली आणि त्याचे पडसाद देशपातळीवर उमटले. ही पदयात्रा आता राहुल गांधी यांची रािहली नाही... ती जनतेची पदयात्रा झाली आहे. आणि तेच या पदयात्रेचे यश आहे. वाहिन्यांनी या पदयात्रेला मिळालेल्या प्रतिसादाची दखल घेतली नाही तरी, त्यामुळे काही अडले नाही. ज्या वृत्तपत्रांनी अर्ध्या यात्रेपर्यंत फारशी दखल घेतली नव्हती, त्या वृत्तपत्रांना महाराष्ट्रात यात्रा आल्यानंतर दखल घ्यावी लागली. त्यांनी दखल घेतली नसती तरी मिळणाऱ्या प्रतिसादात फरक पडला नसता. व्यक्तिचे किंवा ज्या कारणाने पदयात्रा निघाली त्या कारणाचे महत्त्व वृत्तपत्रांमुळे लोकांपर्यंत पोहोचले, असे समजण्याची गरज राहिलेली नाही. वृत्तपत्रांना यात्रेच्या मागे फरपटत यावे लागले आहे. राहुल गांधी यांच्याबद्दल किंवा त्यांनी काढलेल्या पदयात्रेच्या भूमिकेबद्दल, उमाळा किती आणि नाईलाज म्हणून दिलेली प्रसिद्धीची उबळ किती.... यातील फरक ग्रामीण भागातील फार न शिकलेल्या माणसांनाही आता कळू लागलेला आहे. त्यामुळे आपली गाऱ्हाणी आणि दु:ख व्यक्त करण्याकरिता ग्रामीण भागातील ही मंडळी दोन-पाच कोस चालत येवून आपली दु:ख राहुल गांधी यांच्याकडे सांगत आहेत.
राहुल गांधी आपलेपणाने ती दु:ख ऐकत आहेत... त्यांच्याशी समरस होत आहेत... ही पदयात्रा राजकीय नाही. स्वातंत्र्यापूर्वीचा भारत जसा मनाने आणि प्रदेशाने एक होता.... त्यात जात-धर्म-भाषा या नावावर भेदभाव केला जात नव्हता. तीच भावना पुन्हा एकदा देशात निर्माण केली पाहिजे. जाती-धर्मांत भेदा-भेद करून, राजकीय वातावरण दुषीत करणाऱ्यांना या यात्रेने मोठा तडाखा मिळालेला आहे. गेल्या ८ वर्षांत देशात जे वातावरण खराब केले गेले.... विरोधकांना शत्रू मानले गेले... शासकीय यंत्रणा वापरून विरोधकांची मुस्कटदाबी केली गेली... आता या यात्रेने ते सगळे भय वाहून गेले आहे. िब्रटीशांना न घाबरलेला हा देश आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी जे भयग्रस्त वातावरण निर्माण केले होते.... शासकीय यंत्रणांना वापरून मुस्कटदाबी केली होती, त्या सगळ्याला या यात्रेच्या प्रचंड प्रतिसादाने आपोआप उत्तर मिळालेले आहे. शिवाय लोकही आता धीट होत आहेत.
कोणत्याही मुस्कटदाबीने ही यात्रा आता थांबणार नाही. आणि किती प्रयत्न केला तरी लोक या यात्रेला प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. हे आता स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे जे कोणी कोंबडं झाकू पहात होते, तेच तोंडावर पडले... आणि प्रचंड प्रतिसादात महाराष्ट्राने या यात्रेला डोक्यावर घेतले. स्वातंत्र्याच्या चळवळीत हाच महाराष्ट्र महात्मा गांधी यांना डोक्यावर घेत होता. महात्मा गांधी मूळचे गुजरातचे... पण त्यांची स्वातंत्र्याची मुख्य चळचळ मुंबई-महाराष्ट्रात झाली.... त्यांचा आश्रम महाराष्ट्रात उभा झाला... ‘सेवाग्राम’ हे सेवेचे आणि एकात्मतेचे केंद्र बनले. मुंबई हे लढ्याचे केंद्र झाले. याच मुंबईतून दोन शब्दांचा नारा दिला गेला... ‘चले जाव....’. आज तेच शब्द राजकीयदृष्ट्या पुन्हा एकदा जनतेची घोषणा होणार आहेत... २०१९ च्या निवडणुकीपर्यंत विचारले जात होते की, ‘आताच्या केंद्रीय सत्ताधाऱ्यांना पर्याय काय....’ आता त्याची चर्चा कोणी करत नाही.
गेल्या तीन वर्षांत देश आर्थिकदृष्ट्या गर्तेत गेला... रिझर्व्ह बँकेने महागाई रोखण्याची आपली जबाबदारी पार पाडली नाही. अनेक बँका बुडू लागल्या. रिझर्व्ह बँकेची राखीव गंगाजळी सरकारने वापराकरिता ‘उचल’ म्हणून घेतली आणि ती परत केली नाही, ती रक्कम पाच लाख कोटींच्या पुढे आहे... सामान्य माणसाला हे समजत नाही... स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा शासनाच्या धोरणाविरोधात रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने राजीनामा दिला... आजपर्यंत रिझर्व बँकेच्या गव्हर्नरने धोरणाला विरोध करून राजीनामा दिलेला नव्हता. आज रिझर्व्ह बँकेची गंगाजळी सरकार आपल्या तिजोरीत भरत आहे. दुसरीकडे जात-धर्माच्या भावनेवर देशात फूटपाडे राजकारण सुरू आहे. नोटाबंदीने काय आर्थिक संकट आणले, याची चर्चा लोकं करत नाहीत... ज्ञाानव्यापीसारख्या धार्मिक उन्मादात लोक गुंतून पडतात. त्यामुळे रिझर्व्ह बँकेची गंगाजळी कशी आटली, याकडे सामान्य माणसं लक्ष देत नाहीत.... नोटाबंदीने रोजगार कसे गेले, जी. एस. टी.ने महागाई कशी वाढली.... गेल्या दोन- चार वर्षांत श्रीमंतांची धन कशी झाली... ठराविक लोकांना कसे श्रीमंत केले गेले... गरिबांचे मरण कसे ओढवले... शहरे स्मार्ट करण्याच्या घोषणा किती फसव्या होत्या... दोन कोटी रोजगार देण्याची घोषणा किती खोटी होती... ‘नोटाबंदीतून काळापैसा उघड होईल’, या घोषणाही किती उघड्या पडल्या. रुपया कसा तळाला गेला.... रुपयाची पत राहिली नाही. पण सरकार आपली पत झाकून ठेवण्याकरता महागाईने हैराण झालेल्या जनतेला देव-धर्माच्या विषयांत गुंतवून ठेवून दुसरीकडे राजकीय तोडफोड करण्यात व्यस्त होते. इतके घाणेरडे राजकारण या देशात यापूर्वी कधीही झाले नव्हते. राहुल गांधी यांच्या ‘भारत-जोडो’ यात्रेने आज या प्रत्येक विषयावर प्रकाश पडत आहे. सामान्य माणसाला गेल्या काही वर्षांतील हे सगळे राजकारण आता समजू लागले आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत लोक उघडपणे शांततामय मार्गाने या सगळ्या चुकीच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरतील.... आपला निषेध व्यक्त करतील.... तेवढे सामर्थ्य या पदयात्रेने देशातील जनतेला आपोआप मिळत गेलेले आहे. त्यामुळेच ज्यांनी या यात्रेकडे दुर्लक्ष केले होते त्याच मंडळींना आता दखल घेण्याखेरिज पर्याय नाही. राहुल गांधी यांची भूमिका ‘माझे फोटो छापा,’ अशी नाही. ‘माझ्या बातम्या द्या’, अशी अजिबात नाही... ही पदयात्रा राजकीयही नाही.... पण, राजकारण नसतानाही त्यातील ‘मर्म’ लोकांना आपोआप कळत चाललेले आहे. जनतेचा रेटा काय असतो, याची आता कल्पना येवू लागलेली आहे.
शिवाय या पदयात्रेत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे सामील झाल्या. इथून पुढे महाराष्ट्रात भाजपाविरोधात लढणायचे असेल तर सर्व विरोधकांनी कायम एकत्र राहण्याची भूमिका घेतली पाहिजे. मी याच जागेवर एकदा लिहिले होते, ‘ही आघाडी मनापासून झालेली आहे.... असे दाखवून द्यायचे असेल तर, काँग्रेसच्या मोठ्या सभांमध्ये शरद पवार साहेबांनी यावे... किंवा त्यांच्या अध्यक्षांनी. आणि राष्ट्रवादीच्या सभांमध्ये काँग्रेच्या अध्यक्षांनी जावे... इतके विरघळून गेल्याशिवाय कार्यकर्त्यांच्या मनातील संशय दूर होणार नाहीत. त्याची आज गरज आहे. ’
समाधानाची आणखी एक घटना अशी की, न्यायालयेही आता आपल्या भूमिका उघडपणे स्पष्ट करू लागली. सर्वोच्च न्यायालय असो... किंवा सत्र न्यायालय असोत.... शासकीय यंत्रणांचा वापर करणाऱ्या सरकारी यंत्रणांविरोधात न्यायमूर्तीनी रामशास्त्री बाण्याने जे फटकारे मारले आहेत, ते पाहिल्यानंतर ही सालटी कोणाची काढली गेली... ईडी यंत्रणेला न्यायमूर्तीनी सोलून काढले... पण हे सोलणे त्या यंत्रणेसाठी नाही... ती यंत्रणा ज्या सरकारने वापरली त्या सरकारवर हे रट्टे आहेत. महाराष्ट्राच्या सरकारने दसरा मेळाव्याला शिवसेनेने मागितलेली परवानगी अडवून ठेवली होती... तो विषय न्यायालयात गेला... न्यायमूर्तींनी महापालिकेचे आयुक्त चहल यांच्यावर ताशेरे ओढले. ते ताशेरे चहल यांच्यावर थोडेच होते..? ही परवानगी कोणी अडवून ठेवली होती? लोकांना कळत होते.... ऋतुजा लटके यांचा राजीनामा कोणी मंजूर करू दिला नव्हता.... ते ही लोकांना कळत होते... त्यामुळे न्यायमूर्तींचे फटकारे दिसायला आयुक्तांविरुद्ध असले तरी प्रत्यक्षात ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात होते. आताचेही फटकारे ईडीविरुद्ध असले तरी ईडीचे अिधकारी काय करणार?
ते हुकुमाचे ताबेदार... ती यंत्रणा राबवणारे काेण? त्यांनाच हे थेट तडाखे आहेत... शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो, असे म्हणतात... पण, या सरकारमध्ये बसलेल्यांना त्यामुळे किती फरक पडेल हे समजून घ्यायला वेळ लागेल. कारण ‘विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा नाही,’ असे ज्या पक्षाचे धोरण आहे, त्या पक्षाचेच सरकार आहे.... विरोधकांना शत्रू मानणारे सरकार आहे... त्यांना संपवून टाकायचे, ही भूमिका उघडपणे घेणारे सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते जाहीरपणे तसे सांगत आहेत, त्यामुळे राजकारणातील आजची कटूता- हा शब्दही अपुरा आहे- खरं म्हणजे शत्रूत्त्व कोणी निर्माण केले? याचाही एकदा पंचनामा करायला हवा... राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस अत्यंत साळसूदपणे आता आव आणून सांगत आहेत की, ‘राजकारणात कटूता असता कामा नये, हे मला मान्य आहे....’ पण, फडणवीस साहेब, स्पष्ट विचारतो.... या कटूतेची सुरुवात कधी झाली? कोणी कोली? कुठून केली? चर्चा करायची तयारी आहे तुमची? सगळ्याच विषयांचा पंचनामा करायची तयारी ठेवा... महाराष्ट्राचे एकेकाळचे चांगले वातावरण तोड-फोड करून तुम्ही सुरू केले आहेत. यापूर्वी फाटा-फूट झाली नव्हती, असे नाही.... शिवसेनाही फुटली नव्हती, असे नाही... पण जे काही राजकारण झाले... त्यात शत्रूत्त्वाची भावना नव्हती... तुमच्या कारकीर्दीत त्याची सुरुवात झाली... नुसती विरोधकांबाबत नाही... तर तुमच्याच पक्षातल्या लोकांना खासगीत विचारा... खडसेंचा काटा कसा काढला गेला? भाजपासाठी राबलेले विनोद तावडे यांचे तिकीट कसे कापले गेले... बावनकुळे यांना तिकीट का मिळाले नाही... विरोधी पक्षातील माणसं फोडायला कोणी सुरुवात केली? त्यांच्यामागे चौकशा लावायला कोणी सुरुवात केली? संजय राऊत यांना अटक झाली तेव्हा तुम्ही म्हणाला होतात... ‘जर कर नसेल तर डर कशाला.... न्यायायात सगळे स्पष्ट होईल...’ न्यायालयाने ही अटक बेकायदेशीर ठरवली.... नुसतीच बेकायदेशीर नाही तर ईडीला सोलून काढले... हे ताशेरे ईडीवर आहेत, असे मानता? या सगळ्या घाणेरड्या राजकारणाची सुरुवात तुमच्यापासून झाली, ते स्पष्ट सांगितले पाहिजे.... तुमची चर्चेची तयारी असेल, तर कुठेही चर्चा करू... विरोधकांचे सोडा... तुमच्या पक्षाच्या नितीन गडकरी यांना कसं वागवलं गेलं... त्याविरुद्ध तुम्ही एका शब्दाने बोललात का? गडकरी यांची महाराष्ट्रात एक उंच प्रतिमा आहे...
त्याला धक्का बसवण्याचा प्रयत्न झाला.. त्यांची खाती काढून घेतली... तुमच्या आगोदरपासून भाजपासाठी राबलेले गडकरी आहेत... तुम्ही आयत्या ताटावर आणि पाटावर येवून बसलात... जी माणसं जनसंघासाठी आणि नंतरच्या भाजपासाठी याच महाराष्ट्रात राबली, ती किती सुसंस्कृत होती. कोणाचा द्वेष करत नव्हती. शत्रूत्त्व करत नव्हती... वसंतकुमार पंडित असतील... रामभाऊ म्हाळगी असतील... राम कापसे असतील... रामभाऊ नाईक असतील... वामनराव परब असतील... हशु अडवाणी असतील... उत्तमराव पाटील असतील... मधु देवळेकर असतील... गोपीनाथ मुंडेसुद्धा.... काँग्रेसविरोधात आक्रमक होते... पण, त्यात द्वेष नव्हता... शत्रूत्त्व नव्हते... त्या माणसांची राजकारणातील उंची कितीतरी मोठी होती. आज तुम्ही ते राजकारण गटारगंगेत रूपांतरीत केलेत. फोडा-फोडीचा दुसरा अर्थ काय....? निवडणुकीत तुम्ही बहुमत मिळवू शकला नाहीत.. २०१४ ला तुम्ही अिधकारावर आल्यानंतर ५ वर्षे सरकार चालवलेत... केंद्राचा तुम्हाला पाठींबा होता... तुम्हाला बहुमत मिळवता आले नाही... तुमचे १७ आमदार कमी झाले... बहुमतांनी तुम्ही राज्य करा... कोणाचाही विरोध असणार नाही... लोकशाहीच्या या सगळ्या सुसंस्कृत पद्धती न मानता तुम्ही फोडाफोडीचे प्रयोग केलेत... विखे- पाटील यांच्या गावात गेलात.... त्यांना फोडलेत.... ही यादी खूप मोठी आहे... विखे-पाटील म्हणाले हाेते, ‘काँग्रेस माझ्या रक्तात आहे... मी काँग्रेस कशी सोडणार....’ तुम्ही एक टाचणी लावून ती काँग्रेस शोषून घेतलीत. आज त्यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे त्यांची गरज भागली. पण फोडा-फोडीत जे तुमच्याकडे आले त्यापैकी प्रत्येकाला बोलावून त्याचा आतला आवाज विचारा.... तुमच्याबद्दल हे लाेक काय बोलतात, हे खाजगीत ऐका.... एक विषय नाही.... दहा विषय बोलता येतील... शरद पवार यांना गोपीनाथ मुंडे यांनी विरोध केला होता.. पण, ‘बारामतीला घेरण्याची’ भाषा त्यांनी केली नव्हती.... त्यांच्याविरुद्ध निवडणुका लढवल्या गेल्या होत्या.... त्याचा तपशील हवा तर देतो... पण, ‘घेरण्याची भाषा’ कोणत्याच मतदारसंघात कोणीही केली नव्हती. तुम्ही ती केलीत... राजकारणात विरोेध करा...
पण, सूडाने पेटून उठल्यासारखे एका मतदारसंघाला घेरण्याकरिता केंद्रीय मंत्र्यापासून सगळेच उतरत आहेत... आणि परिणाम काय झाला.? तुम्ही महादेव जानकरांना सुपि्रया सुळे यांच्याविरोधात लढवलेत.... काय झाले? आज जानकर तुमच्याबरोबर आहेत का? तुमच्याबद्दल ते आज काय बोलतात.. मािहती करून घ्या... अजितदादा यांच्याविरुद्ध तुम्ही गोपीचंद पडळकर यांना उतरवलेत... सगळी ताकद लावलीत... अजितदादा महाराष्ट्रात सर्वाधिक मतांच्या फरकाने निवडून आलेत... काय शोभा राहिली...? आता निर्मला सितारामन या केंद्रीय अर्थमंत्रीपदावर असलेल्या एका उच्चविद्याविभूषित भगिनीला तुम्ही बारामतीत आणून बसवले आहे.... त्या स्वत:हून आलेल्या नाहीत. तुमच्या दिल्लीतील नेत्यांनी त्यांना पाठवलेले आहे. निर्मलाताईंची राजकीय-सामाजिक प्रतिमा चांगली आहे... बारामतीच्या निकालानंतर अपयशाचे खापर फोडण्यासाठी तुम्हाला बाहेरचे कोणीतरी हवे होते म्हणून त्यांना आणले का? यशाचे धनी तुम्ही होता, अपयशाचे धनी व्हायची तयारी ठेवा... निर्मलाताईंना कशाला आणता? हे उद्योग करण्याचा तुमचा उद्देश लोकांना समजतो... पण, अशी बाहेरची माणसं आणून पवारसाहेबांची बारामती जिंकता येईल... असा सल्ला तुम्हाला कोण देतो? कटूता वाढण्याची कारणं तुम्हाला नीट समजून घ्यावी लागतील... त्याची सुरुवात तुमच्यापासूनच कशी झालीय, याची एक नाही दहा उदाहरणे आहेत.. तुम्हालाच बोलता येते... असे समजू नका... उपाध्ये आणि साठे यांनाच वृत्तपत्रांत लिहिता येते, असेही समजू नका... ज्या गावच्या बोरी आहेत... त्याच गावच्या बाभळी आहेत...
५० वर्षांपूर्वीचे महाराष्ट्राचे राजकारण खरंच करायचे असेल, तर शत्रूत्त्व सोडा... महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र या... महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला पळवत आहेत... तुम्ही त्याचे समर्थन करत आहात, महाराष्ट्रातर्फे बोलण्याचा तुम्हाला काय अिधकार आहे? तुम्ही फार लहान वयात मोठे यश मिळवलेत, त्याच्याबद्दल आनंद आहे. तुमच्या पिताश्रींशी माझे खूप चांगले संबंध होते.. एका नागपूर अिधवेशनात मधु देवळेकर, वामनराव परब यांच्यासोबत तुमच्या आदरणीय मातोश्रींच्या हातचे जेवलो आहे. गंगाधरराव फार भला माणूस होता... पण, तुम्ही स्वत:हून विरोधकांशी वाकड्यात गेलेले आहात. मुख्यमंत्री झाल्यानंतरचे तुम्ही आणि आजचे तुम्ही, यात फरक वाटतोय... ‘महाराष्ट्राला मोठे करण्यासाठी झपाटलेला नेता’ अशी तुमची प्रतिमा राहिलेली नाही. राजकीयदृष्ट्या तोडफोड करणाऱ्या कंपनीचे संचालक असल्यासारखे तुम्ही वागत आहात. अनेक कार्पोरेट कंपन्या एकाच इमारतीत असतात... पण, १० व्या मजल्यावरील कंपनी ११ व्या मजल्यावरील दुसऱ्या कार्पेारेट कंपनीला कसे बदनाम करता येईल, याचे डावपेच १० व्या मजल्यावर सुरू असतात.
आज महाराष्ट्राच्या राजकारणाची हीच अवस्था आहे. राजभवन तुम्ही भाजपाचा आखाडा केला होतात.. दिवस-दिवस तिथे बसून होतात... महाराष्ट्र हे सगळं पहात होता... आताही तोड-फोड करून तुम्ही सत्ता मिळवली अाहे... येणाऱ्या निवडणुकीत तुमच्या पक्षाला लोकांनी निर्भेळ बहुमत दिले तर लोकांचा तो निर्णय महाराष्ट्र मान्य करेल. पण, तुम्हालाच स्वत:ला तो विश्वास नाही म्हणून तोड-फोड करून कोणाच्यातरी खांद्यावर बंदूक ठेवून तुमचा गोळीबार सुरू आहे. हे फार दिवस चालत नसते. महाराष्ट्र म्हणजे बिहार-उत्तरप्रदेश नाही... इथली माती वेगळी आहे. शहरातील लोकांना जवळ करून ग्रामीण भागाला वाऱ्यावर साेडणाऱ्यांना महाराष्ट्रातील लोक दणका दिल्याशिवाय राहणार नाहीत. शिवाय फडणवीस साहेब, एक लक्षात घ्या.... तुम्ही आता भाजपाचे नेते राहिलेले नाहीत... २०१४ साली तुम्ही भाजपाचे नेते होतात... आता तुम्ही तोड-फोडवाल्यांचे नेते आहात. २०२४ चे आजच सांगून ठेवतो... तेव्हा मी असेन किंवा नसेन... तुमच्या या नवीन उद्योगांमुळे भाजपाला यश मिळवून देता येईल, हे गृहीत धरू नका.. मतदारांना गृहित धरणाऱ्यांची फजिती होते.
सध्या एवढेच....
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.