"राज्यपाल महोदयांना सद्बुद्धी लाभो.'; अजित पवारांची खोचकल टीका.!
पुणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. "छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श होते. तर तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल बोलत होते.
यावेळी भाषण करताना राज्यपालांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली. आता यावरून चांगलेच राजकारण तापले असून मनसेने देखील राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. राज्यपालांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी अनेक राजकीय नेत्यांनी केल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यावर आता महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजित पवार म्हणाले., “महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला.
छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची, पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे. राज्यपाल महोदयांना सद्बुद्धी लाभो, ही प्रार्थना…” अशा शब्दात अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.