मुन्नाभाई सोमय्या! डॉक्टरेट बोगस असल्याचा गंभीर आरोप, मुंबई विद्यापीठाकडून माहिती देण्यास टाळाटाळ
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मिळवलेली डॉक्टरेट बोगस असून त्याबाबत माहिती देण्यास मुंबई विद्यापीठ टाळाटाळ करत आहे, असा आरोप करत युवासेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘मुंबई विद्यापीठाचा मुन्नाभाई किरीट सोमय्या… कारवाई कधी होणार?’ असे फलक झळकावत आज युवासेना कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या कालिना पॅम्पसमध्ये जोरदार आंदोलन केले. सोमय्या यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी करत युवासेनेने घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांना बीकेसी पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली.
किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनी अवघ्या 16 महिन्यांत मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली आहे. ही डॉक्टरेट वादाच्या भोवऱयात अडकली असताना किरीट सोमय्या यांच्या पीएचडी अर्थात डॉक्टरेटवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे. सोमय्या यांच्या पीएचडीसंदर्भात उपलब्ध प्रमाणपत्रे व अन्य कागदपत्रांच्या मागणीसाठी मागील सहा महिन्यांपासून युवासेना पाठपुरावा करीत आहे. त्यासाठी माहिती अधिकार कायद्यांतर्गत 31 मे रोजी रीतसर अर्जदेखील करण्यात आला होता. मात्र, या अर्जावर विद्यापीठाकडून आजतगायत ठोस माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप सिनेट सदस्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची सत्यता बाहेर येण्यासाठी महिनाभरापूर्वी कुलगुरू आणि कुलपतींना निवेदनही देण्यात आले. माहिती अधिकारअंतर्गत अपील देखील केले. मात्र कोणतीही माहिती अद्याप देण्यात आली नसल्याने संशय आणखीच बळावला आहे. या प्रकरणाला वाचा पह्डण्यासाठी आज युवासेनेने विद्यापीठ परिसरात आंदोलन केले. या आंदोलनात युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शीतल देवरूखकर-शेठ, अॅड. वैभव थोरात, मिलिंद साटम, शशिकांत झोरे, धनराज कोहचाडे यांच्यासह युवासेना उपसचिव नीलेश महाले, विस्तारक प्रथमेश वराडकर, आशिप पाटील सहभागी झाले. यावेळी आंदोलनकर्त्यांना बीकेसी पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली.
मुन्नाभाईच्या वेशातील फोटो व्हायरल
‘मुंबई विद्यापीठाचा मुन्नाभाई किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई कधी होणार?,’ असा सवाल करणाऱया असंख्य पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. किरीट सोमय्या यांचा मुन्नाभाईच्या वेशातील फोटोही सोशल मीडियावर फिरत होता.
विधिमंडळात दाद मागणार
प्रशासनाने कितीही दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तरी युवासेना सिनेट सदस्य या प्रकरणाचा पाठपुरावा करून वस्तुस्थिती समोर आणणार आहे. याप्रकरणी आता युवासेना विधिमंडळात दाद मागणार असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना या प्रकरणाची सर्व माहिती देऊन अधिवेशनात हे प्रकरण मांडण्यात येणार असल्याचे सिनेट सदस्यांनी स्पष्ट केले.
पीएचडीसाठी किरीट सोमय्या यांनी दिलेला प्रबंध विद्यापीठाच्या कॉमर्स विभाग, थिसेस विभाग व लायब्ररीत असणे अपेक्षित आहे. या विभागात माहिती अधिकार अर्ज देऊनही माहिती दिली जात नाही. त्यामुळे सोमय्यांनी खरेच प्रबंध सादर केला का, असा प्रश्न युवासेनेने केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.