ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर आता ईडीचा वॉच!
देशातील ऑनलाईन गेमिंग कंपन्यांनी 23 हजार कोटी रुपयांची जीएसटी चोरी केल्याचा संशय केंद्र सरकारला आहे. एप्रिल 2019 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान ही कर चोरी करण्यात आल्याची माहिती आहे. सरकारने आता जीएसटी चोरीची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर इडीचा वॉच आहे, असे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले. चौधरी म्हणाले की, करचुकवेगिरीचा संशय असलेल्या कंपन्यांमध्ये भारतीय आणि विदेशी कंपन्यांचा समावेश आहे. कर अधिकाऱ्यांना शंका आहे की, ऑनलाइन गेमिंग व्यवसायाचा वापर उत्पन्न कमी दर्शवण्यासाठी केला जात आहे.
चौधरी म्हणाले, अंमलबजावणी संचालनालयाने सायबर आणि क्रिप्टो करन्सी संबंधित फसवणुकीशी संबंधित अनेक प्रकरणांचा तपास सुरू केला आहे. यामध्ये सुमारे एक हजार कोटी रुपयांची हेराफेरी करण्यात आली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने भारतात व्यवसाय करणाऱ्या काही भारतीय आणि परदेशी गेमिंग कंपन्यांविरुद्ध तपास सुरू केला आहे.
या प्रकरणांमध्ये, 6 डिसेंबर 2022 पर्यंत, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 (PMLA) च्या तरतुदींनुसार 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे जप्त केले आहेत. याशिवाय, परकीय चलन व्यवस्थापन कायदा, 1999 च्या कलम 37A अंतर्गत 289.28 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. गेमिंग कंपन्यांवर दीर्घकाळापासून जीएसटी चुकवल्याचा आरोप होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.