विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी उसळला जनसागर
पुणे : कोरेगाव भीमा येथे आज 205 वा शौर्य दिन साजरा करण्यात येत आहे. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा इथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी जनसागर उसळला आहे. कोरेगाव इथे 1 जानेवारी 1818 मध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली. ही लढाई इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाली होती. महार समाजातील सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले होते. हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभ बांधण्यात आला.
दरवर्षी कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. आज राज्यभरातून लाखो आंबेडकर अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आले आहेत. तर दुसरीकडे या ठिकाणी येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनेक राजकीय नेते येतात. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेतेही कोरेगाव भीमा या ठिकाणी येणार आहेत.
महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीला महाराष्ट्रसह देशभरातून आंबेडकर अनुयायी यांच्यासह इतरही लाखोंच्या संख्येनं लोक या ठिकाणी येतात. 1 जानेवारी 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.
बंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत. यंदाच्या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा परिसरात म्हणजेच शिक्रापूर आणि लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या कालावधीत मद्य विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.