बसस्थानकावर थांबलेल्या 6 महिलांना भरधाव कारने चिरडले; तिघींचा जागीच मृत्यू
नेहमीप्रमाणे बसची वाट पाहत असलेल्या महिलांना एका कारने चिरडले. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तीन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या तीनही महिला मासे विक्रीच काम करत होत्या. हा अपघात रविवारी सकाळी पॉण्डेचेरीतील कोट्टकपुरमजवळील किलपुथुपट्टू येथील बस स्थानकावर झाला.
लक्ष्मी (48), गोविंदम्मल (47) आणि गेंगम्मल (45). या तीनही मृत महिला पुदुकुप्पम येथील रहिवासी आहेत.अपघातामध्ये कारमधील चार जण जखमी झाल्याचे देखील समजते. यावेळी रस्त्यावर नेहमीपेक्षा कमी गर्दी होती त्यामुळे कार कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट महिलांना येऊन धडकल्याने समजते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिला बस स्टॉपवर बसमध्ये चढण्यासाठी थांबल्या होत्या तेव्हा चेन्नईहून पुद्दुचेरीला जाणाऱ्या एका भरधाव कारने त्यांना धडक दिली. सहापैकी तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तीन हेमला, प्रेमा आणि नायगम यांना पाँडिचेरी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीआयएमएस) मध्ये दाखल करण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांनी चेन्नईतील नुंगमबक्कम येथील कक्कन कॉलनीतील जी. विघ्नेसरण (22) याला अटक केली आहे. जोरात वाहन चालवणे आणि अपघातास कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
