मणिपूर : संतप्त जमावाने मुख्य आरोपीचे घर जाळले
मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढल्या प्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी हुरेम हेरादास (32) याच्या घराला संतप्त जमावाने आग लावली. हेरादास याचे थौबुल जिल्ह्यातील यैरीपोक गावात घर होते. मणिपूरमधील दोन महिलांची नग्नावस्थेत धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल दोन महिन्यानंतर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यात हेरादास हा मुख्य आरोपी आहे. तर त्यासोबत आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
मणिपूरमध्ये 3 मे रोजी राज्यातील अनेक भागांत प्राणघातक हिंसाचार उसळला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 4 मे रोजी कांगपोकापी जिल्ह्यातील बी. फैनोम गावावर तब्बल हजार एक जणांच्या जमावाने हल्ला केला होता. त्यांनी गावातील अनेक घरे जाळली. त्यावेळी तीन महिला व दोन तरुण हे जंगलात पळून गेले होते. जमावातील हल्लेखोर त्या दोघांच्या मागे होते. मात्र त्याचवेळी पोलिसांनी त्या पाच जणांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. मात्र पोलीस संरक्षणात असलेल्या त्या पाचही जणांचे जमावाने पोलिसांच्या ताब्यातून अपहरण केले. त्यानंतर त्यातील एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तर तीन महिलांना त्यांचे कपडे काढून त्यांची धिंड काढण्यात आली. त्यातील एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यावेळी त्या तरुणीला वाचवायचा प्रयत्न करणाऱ्या भावाची देखील निर्घृण हत्या करण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
