🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बेडगच्या सरपंच उपसरपंचावर एट्रासिटीचा गुन्हा दाखल

बेडगच्या सरपंच उपसरपंचावर एट्रासिटीचा गुन्हा दाखल 


मिरज तालुक्यातील बेडग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निर्माणाधिन स्वागत कमान पाडल्याच्या आरोपाखाली बेडग गावचे लोकनियुक्त सरपंच उमेश शंकर पाटील आणि उपसरपंच संभाजी उर्फ मल्हारी नागरगोजे व एक अनोळखी अशा तिघांविरुध्द अखेर मिरज ग्रामीण पोलिसात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ.महेशकुमार महादेव कांबळे (वय -43) यांनी फिर्याद दिली आहे.स्वागत कमान पाडापाडी प्रकरण सरपंच आणि उपसरपंचांच्या चांगलेच अंगलट आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान,सरपंच,उपसरपंचावरील या कारवाईनंतर बेडग गाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

दरम्यान, स्वागत कमान पाडापाडी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करीत दलित समाजाने बेडग गाव सोडल्याच्या घटनेची राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने शनिवारी सकाळी बेडग गावाला भेट दिली. स्वागत कमान पाडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. कमान अनधिकृत ठरविण्याची कारणे, पाडकाम करण्यामागचा हेतू आणि दलित समाजाला गाव सोडावे लागणे याबाबतचा संपूर्ण अहवाल सात दिवसात सादर करण्याचे निर्देश अनुसुचित जाती आयोगाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिले आहेत.

नेमके प्रकरण काय?

तालुक्यातील बेडग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे स्वागत कमान उभारली जात होती. मात्र, सदर कमान अनधिकृत ठरवून ग्रामपंचायत प्रशासनाने 16 जून रोजी पाडून टाकली. सरपंच उमेश पाटील, उपसरपंच संभाजी नागरगोजे यांच्या सांगण्यावरुन तसेच जातीयवाद करुन कमान पाडल्याचा आरोप दलित समाजाने केला. दोषींवर ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाईसाठी सात दिवस उपोषण, मोर्चा, मुंडण आंदोलन केले. तरीही दोषींवर कारवाई झाली नसल्याने दलित बांधवांनी बेडग गावातून बाहेर पडत मंत्रालयावर लाँग मार्च काढला. उपमुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले. राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाने गावाला भेट देऊन आढावा घेतला. त्यानंतर सरपंच, उपसरपंच आणि एक अनोळखी अशा तिघांविरुध्द ऍट्रॉसिटी दाखल करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.