मणिपूरमधील दोन महिलांच्या नग्न धिंड प्रकरणाचे देशभर पडसाद
मणिपूरमध्ये जमाव दोन महिलांची नग्न धिंड काढत असल्याची चित्रफीत बुधवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर त्याचे देशभर तीव्र पडसाद उमटले. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या चित्रफितीची दखल घेऊन कामकाजाच्या सुरुवातीलाच महाधिवक्ते आर. व्यंकटरमनी आणि महान्यायवादी तुषार मेहता यांना पाचारण केले. ‘‘ ही चित्रफित अस्वस्थ करणारी आहे. हिंसाचारात महिलांचा साधन म्हणून वापर करणे हे घटनात्मक लोकशाही असलेल्या देशात स्वीकारार्ह नाही’’, असे ताशेरे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सरकारवर ओढले.
‘‘सरकारने हस्तक्षेप करून ठोस कारवाई करावी. त्यासाठी सरकारला काही वेळ देत आहोत. प्रत्यक्षात काहीच कारवाई न झाल्यास न्यायालय हस्तक्षेप करेल’’, असा इशाराही न्यायालयाने दिला.या प्रकरणातील आरोपींवर काय कारवाई केली आणि काय उपायोजना करण्यात आल्या, याबाबत सरकारने तपशीलवार माहिती सादर करावी, असे निर्देशही न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला दिले.
यासंदर्भात केंद्रीय गृहसचिव आणि राज्याच्या मुख्य सचिवांनी प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. ही चित्रफीत ४ मे रोजीची आहे, हे माहीत असले तरी त्याचे गांभीर्य कमी होत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. मणिपूरमधील परिस्थतीबाबत सरकार गंभीर असून, उपाययोजनांबाबत न्यायालयाला माहिती सादर करण्यात येईल, असे महान्यायवादी मेहता यांनी सांगितले. या प्रकरणी आता २८ जुलैला सुनावणी घेण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मणिपूरच्या मुद्यावर संसदेच्या आवारात भाष्य केले. ‘‘लोकशाहीच्या मंदिराशेजारी उभा असताना माझे हृदय वेदना आणि संतापाने भरून गेले आहे. मणिपूरची घटना कोणत्याही सुसंस्कृत राष्ट्रासाठी लज्जास्पद आहे’’, असे मोदी म्हणाले.
एका आरोपीला अटक
दोन महिलांच्या नग्न धिंड प्रकरणातील एका आरोपीला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असून, त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी सांगितले. मणिपूरची घटना कोणत्याही सुसंस्कृत राष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. माझे हृदय वेदना आणि संतापाने भरून गेले आहे. एकाही दोषीला सोडणार नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
