खासदारांच्या कंपनीला बेकायदेशीर कर्जपुरवठा..
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने खासदार संजय पाटील यांच्या डिवाईन फुडस् कंपनीला २७ कोटी २९ लाख रुपयांच्या तारण मालमत्तेवर ४१ कोटी १२ लाख रुपयांचे कर्ज दिले. याशिवाय या कंपनीला दिलेल्या कर्जातील १५ कोटी रुपये यशवंत कारखान्याच्या खरेदीसाठी वापरण्यात आल्याची बाब चौकशी अधिकाऱ्यांनी उजेडात आणली आहे.
बँकेच्या अजब व्यवहारांबाबत अहवालात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. डिवाईन फुडसची मालमत्ता २७ कोटीची असताना त्यांना जादा कर्जवाटप केले. पुन्हा ५२ कोटीच्या कर्ज थकबाकीपोटी याच कंपनीची मालमत्ता ३६ कोटी १९ लाखास खरेदी केली. त्यामुळे कंपनीकडे अद्याप १५ कोटी ८५ लाख येणे आहे. कंपनीची मालमत्ता खरेदी केली गेल्याने शिल्लक येणेबाकी विनातारणी झाल्याने कर्ज बुडीतचा धोका निर्माण झाला आहे.
डिवाईन कंपनीस मंजुर कर्जापैकी १५ कोटी रुपये यशवंत शुगरच्या करंट खात्यास जमा केली. हीच रक्कम नंतर यशवंत कारखान्याच्या खरेदीसाठी अनामत जमा करण्यात आल्याचे चौकशी अधिकाऱ्यांना दिसून आले, यावर गंभीर ताशेरे ओढले आहेत.
खासदारांची मालमत्ता तारणमुक्त
खासदार संजय पाटील हे डिवाईन फुडस कंपनीचे संचालक होते. त्यांनी चानक २७ एप्रिल २०१५ रोजी या कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. नियमानुसार कंपनीचे कर्ज पूर्ण फिटेपर्यंत कोणत्याही संचालकाला निवृत्त होता येत नाही. या अटीचे उल्लंघन करीत खासदारांची मालमत्ता तारणमुक्त करण्यात आल्याचा ठपका अधिकाऱ्यांनी ठेवला आहे.
११ कोटी ५० लाखाला विक्री
सूतगिरणीच्या विक्रीत शासनाची फसवणूक बाबासाहेब सूतगिरणीच्या कर्ज थकबाकीपोटी व एनपीए कमी करण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट मत अहवालात नमूद केले आहे. सूतगिरणीची मालमत्ता ४० कोटी ३९ लाखाची असताना ती सूतगिरणी केवळ ११ कोटी ५० लाखाला विकली. त्यामुळे इतर देणी देता आली नाहीत.
संचित तोटा, तरीही कर्जवाटप
खानापूर तालुका सहकारी सूतगिरणीस संचित तोटा असतानाही जिल्हा बँकेने त्यांना २० कोटी ९२ लाख कर्ज मंजूर केले. मशिनरी खरेदीसाठी पुन्हा ५२ कोटीच्या कर्ज थकबाकीपोटी धनादेश कोणाला दिले, याचाही तपशील नसल्याने नियमांचे उल्लंघन झाल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
