माझी शेवटची ईच्छा पुर्ण करा; असे चिठ्ठीवर लिहिले आणि पोलीसा शिपायाने आपले जीवन संपवले
पुणे : पोलीस शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोहगाव भागात शुक्रवारी घडली. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नसून, पोलिसांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. वैभव दिलीप शिंदे (रा. खेसे काॅलनी, लोहगाव) असे असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.
वैभव शिंदे, त्यांची पत्नी कांचन, भाऊ आणि चार वर्षांचा मुलगा खेसे काॅलनी भागात राहायला आहेत. शिंदे पुणे पोलीस दलात मोटार परिवहन विभागात नियुक्तीस होते. शिंदे यांच्या घराजवळ चिंचेचे झाड आहे. छतावर झाडाची फांदी आहे. शिंदे यांनी शुक्रवारी पहाटे फांदीला टाॅवेल बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली. ‘पत्नी कांचन मला माफ कर. भाऊ आणि आई मला माफ करा. माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. भाऊ विजय याने पत्नीशी विवाह करावा,’ असे शिंदे यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. शिंदे यांना मूळव्याधीचा त्रास होता. दोन महिन्यांपूर्वी त्यांची मूळव्याधीवरील शस्त्रक्रिया झाली होती. ते पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षेची तयारी करत होते. शिंदे यांच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.