Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गर्भपात प्रकरणातील तिघांना अटक :, सात जणांवर गुन्हा दाखल

गर्भपात प्रकरणातील तिघांना अटक :, सात जणांवर गुन्हा दाखल 


कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील गर्भवती महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्याप्रकरणी बुधवारी (दि.२९) महालिंगपूर पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तर एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कविता बाडनवर ( रा महालिंगपूर), विजय संजय गवळी ( रा. दुधगाव , सांगली), डॉक्टर मारुती बाबासो खरात (रा. कुपवाड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यासह दुधगाव येथील संगीता गवळी, विजय गवळी, आथनी येथील डॉ. कोतवाले, महालिंगपूर येथील एका सोनोग्राफरसह सात जणांच्या विरोधात सांगली व महालिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांना जमखंडी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची जमखंडी कारागृहात रवानगी करण्यात आली. गुरूवारी (दि.२९) बागलकोट एस. पी. अमरनाथ रेडी महालिंगपुर येथे भेट देणार आहेत.

महालिंगपूर शहरातील बोगस डॉक्टर कविता बाडनवर हिच्या घरात सात जणांच्या मदतीने २६ मे रोजी रात्री कोल्हापुरातील आळते येथील सोनाली सचिन कदम या महिलेचा गर्भपात करण्यात आला होता. या महिलेला यापूर्वी दोन मुली असून तिसरी मुलगी असल्याचे सांगली येथे स्कॅनिंग केल्यानंतर कळाले. त्यामुळे गर्भपात करण्यासाठी महालिंगपूर येथील कविता बाडनवर या बोगस डॉक्टरकडे नातेवाईकांनी सोनाली यांना आणले. गर्भपात केल्यानंतर एका तासात महिलेचा अतिरक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला. तेथील डॉक्टरानी मृत्यू प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने सोनाली यांचे नातेवाईक मृतदेह घेऊन सांगलीत आले होते. मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शहरात फिरत असताना हा प्रकार सांगली पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

बागलकोटला गुन्हा वर्ग
बुधवार सांगली पोलिसांनी बागलकोटच्या एसपी ऑफिसला जाऊन गर्भपात प्रकरणाची माहिती दिली. एस पी अमरनाथ रेडी यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पोलीस ठाण्याच्या प्रमुख प्रवीण बिळगी व इतर पोलिसांनी महालिंगपूर शहरातील कविता बाडनवर या बोगस डॉक्टर महिलेला अटक करून चौकशी केली.
अधिकाऱ्यांच्या घरांवर छापा

या प्रकरणाचे माहिती मिळाल्यानंतर जिल्हा कुटुंब व कल्याण अधिकारी अरविंद पट्टणशेट्टी व मुधोळ तालुका आरोग्य अधिकारी व्यंकटेश मलघान, रबकवी तहसीलदार गिरीश स्वाधी, बनहटी सी पी आय संजीव बळगार व पीएसआय प्रवीण बिळगी आदींनी कविता बाडनवर यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर घरात गर्भपात करण्यासाठी वापरले जाणारे वैद्यकीय उपकरणे व औषधे मिळाली.

यापूर्वीही दोन वेळा छापा
दहा वर्षांपूर्वी शहरातील खाजगी इस्पितळात नर्स म्हणून काम करणाऱ्या कविता बाडनवर हिने मागील सात-आठ वर्षापासून बेकायदेशीरपणे गर्भपात करत असल्याचे समजते. विशेष म्हणजे ३० मार्च २०१९ व २२ ऑगस्ट २०२२ रोजी दोन वेळा मुधोळ तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी बाडणवर यांच्या घरात छापा टाकला होता. २०२२ साली अधिकाऱ्यांनी घराला सील ठोकले होते. याप्रकरणी देखील बनहट्टी न्यायालयात केस सुरू आहे. पण याच घरात मागील बाजूने घरात कविता बाडनवर पुन्हा बेकायदेशीर गर्भपात करत होती. गर्भपात करण्यासाठी कविता २० ते ८० हजारपर्यंत रक्कम घेत असून तिच्या मोबाईलवर अनेक उच्चभृ लोकांकडून रक्कम फोन पे केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखीन मोठे लोक असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.