Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दोन तासात शिवसेनेच्या 3 नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

दोन तासात शिवसेनेच्या 3 नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट 


मुंबई : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारचा शपथविधी 9 जून रोजी पार पडला. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान महाराष्ट्रातून होण्यासाठी मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र असे असतानाही नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना निमंत्रण न दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने गुरुवारी (13 जून) तातडीची बैठक बोलावली आहे. मात्र याचदरम्यान, आज दोन तासात शिवसेना शिंदे गटाच्या तीन नेत्यांनी राज ठाकरेंचं शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

महायुती सरकारमधील मंत्री तानाजी सावंत, ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के आणि शिवसेनेचे मुंबई पदवीधर उमेदवार डॉ. दीपक सावंत या तीन नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. तिन्ही नेत्यांच्या भेटीचं नेमकं कारण काय याबाबत अद्याप माहिती समोर आली नसली तरी नरेश म्हस्के यांनी भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. आजच्या भेटीत राज ठाकरेंनी दिल्लीत गेलात म्हणून मराठी माणसाला विसरू नका, अशी दरारायुक्त सूचना केल्याचे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.

नरेश म्हस्के म्हणाले की, विद्यार्थी दशेपासून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांचा आदर्श समोर ठेवत मी शिवसेनेच्या कामाला सुरुवात केली. विद्यार्थी सेनेचे काम करत असताना राज ठाकरे हे आमचे बॉस होते. त्यानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मला उमेदवारी घोषित झाल्यानंतर राज ठाकरेंना भेटायला गेलो आणि त्यांचे आशीर्वाद घेऊनच प्रचाराला सुरुवात केली होती. त्यांनी खास माझ्यासाठी आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी ठाण्यात सभा घेतली. त्या सभेला उदंड प्रतिसाद मिळाला. राज ठाकरेंचे भाषण हे संपूर्ण देशाचं आकर्षण बिंदू असतं. त्यांच्या सभेने आम्हाला जिंकून येण्याचा मोठा आत्मविश्वास दिला. सभा संपल्यावर पाठीवर हात ठेवत त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि त्याचं फलित आज समोर आहे, असा आनंद नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर राज ठाकरेंचे आशीर्वाद घेण्यासाठी आज मी त्यांची भेट घेतली, असे नरेश म्हस्के यांनी सांगितले. ते म्हणाले की, सोबत माझे सगळे कार्यकर्ते आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे सुद्धा होते. राज ठाकरे यांनी दिलखुलास गप्पा मारत दिल्लीत गेलात म्हणजे मराठी माणसाला विसरू नका. मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी तुम्हाला दिल्लीत पाठवलं आहे, अशा सूचना केल्या. त्यांची प्रत्येक सूचना आम्हाला मोलाची आहे. त्यामुळे राज ठाकरेंना एवढचं सांगेन की, मराठी माणसाचा आवाज आम्ही बुलंद करूच, पण आपल्या या मातीतल्या माणसांचे जिव्हाळ्याचे प्रश्न समस्या आणि विषय यांना वाचा फोडण्याचं कामही नक्कीच करू आणि तुमचा विश्वास सार्थ ठरवू, असे म्हणत नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

नरेश म्हस्के म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. पण काही विशिष्ट समाजाचे लोक तुष्टीकरण करत आहेत. एकिकडे हिंदू म्हणतात आणि दुसरीकडं पाठीमागच्या दरवाजाने मदत घेत आहेत. जागा वाटप हे मीडिया समोर येऊन करायचं नसतं. बैठक होईल त्यामधे त्यांनी भूमीका मांडायला हवी. पण सोमवारी शिवसेना भवनात झालेल्या बैठकीत खासदारांना धमकावण्यात आलं. खासदारांवर अविश्वास दाखवण्यात आला आहे. आम्हाला सुपारी बाज म्हणता, मग आमच्या मतांवर तुम्ही निवडून का आलात? असा प्रश्न उपस्थित करत नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांना खासदारकीचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. तसचे जर आम्ही काम केलं नसतं, मतं दिली नसती तर तुम्ही खासदार झाला नसता हे लक्षात ठेवा, असं देखील नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.