Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मृत्यूच्या दारातले "ते" ८० तास पुणे मुंबई शिवनेरी बस प्रवास अन् १६ तास रस्त्यावर बेवारस

मृत्यूच्या दारातले "ते" ८० तास पुणे मुंबई शिवनेरी बस प्रवास अन् १६ तास रस्त्यावर बेवारस

मुंबई: पुण्याहून मुंबईला येणाऱ्या एका व्यावसायिकाला कॉफीमध्ये गुंगीचे औषध देत त्याच्या अंगावरील सव्वापाच तोळे दागिने आणि पैसे घेऊन चोरट्याने पलायन केले. अशा घटना सतत घडतात. मात्र, यापेक्षाही भयंकर गोष्ट पहिल्यांदा घडली. माणुसकी कशी संपून गेली हेही विदारकपणे समोर आले. गुंगीत असणारा प्रवासी मुंबईला 'शिवनेरी'ने पोहोचला तेव्हा शिवनेरी स्टँडवरील कर्मचाऱ्यांनी हा माणूस नशेत असावा, म्हणून त्याला रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ फुटपाथवर सोडून दिले. तब्बल १६ तास हा माणूस फुटपाथवर बेवारस अवस्थेत पडून राहिला. त्यांचे कपडे, राहणीमान बघूनही कोणाला विचारपूस करावी वाटली नाही. शोधत आलेल्या नातेवाइकांनी त्यांना ओळखून रुग्णालयात नेले. त्यानंतर ८० तासाने ते गृहस्थ शुद्धीवर आले.

शैलेंद्र साठे हे पुण्यात पत्नी आणि मुलांसोबत राहतात. ते दुबईतून पुण्यात स्थायिक झाले आहेत. १४ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता वाकड येथून त्यांनी मुंबईसाठी शिवनेरी बस (बस क्रमांक ६६९७) पकडली. प्रवासादरम्यान शेजारी बसलेल्या अनोळखी प्रवाशाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. दुपारी दोनच्या सुमारास बस पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील खालापूर येथील फूडमॉलकडे थांबली. साठे खाली उतरले. आइस्क्रीम खाऊन पुन्हा बसमध्ये चढणार तोच सहप्रवासी कॉफी घेऊन त्यांच्या पुढ्यात आला. त्यांनी कोणतीही शंका न घेता ती कॉफी घेतली व बसमध्ये बसले. त्यानंतर काही मिनिटांतच ते बेशुद्ध झाले. प्रवासादरम्यान सहप्रवाशाने हातात रुमाल ठेवून ५३ ग्रॅम दागिने, मोबाइल, महागडे घड्याळ आणि किमती ऐवज लुटला. विशेष म्हणजे, बसमध्ये सीसीटीव्ही आणि अन्य प्रवासी असताना कोणाचेही त्याकडे लक्ष गेले नाही.

बस दादरला पोहोचली. बसमध्ये बेशुद्ध पडलेल्या साठे यांना शिवनेरीच्या कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी बसमधून उतरवून थेट कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या शेजारील फुटपाथवर ठेवून अनोखे कर्तव्य बजावले. साठे तब्बल १६ तास फुटपाथवर बेवारस पडून होते. टॅक्सी चालक, पादचारी त्यांना बघत होते. चौकशीही करत होते; मात्र कोणीही मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. पोलिसांनाही कळवले नाही.

...तर जीवावर बेतले असते

साठे यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीय घाबरले. मित्र, नातेवाइकांकडे चौकशी सुरू झाली. मोबाइल लोकेशन चेंबूर परिसरात बंद झाल्यामुळे गोवंडी पोलिस ठाण्यातही चौकशी केली. अखेर, त्यांच्या पत्नीने दादर परिसरात राहणाऱ्या त्यांच्या माहेरच्या मंडळींना याबाबत कळवून शोध घेण्यास सांगितले.

'शिवनेरी'ने चेंबूर येथे उतरणार असल्याने काही जणांनी चेंबूर येथे धाव घेतली तर, एका मेहुण्याने दादर शिवनेरी बसथांब्याकडे चौकशी सुरू केली. अखेर, चौकशीदरम्यान एक जण रस्त्यावर पडल्याची माहिती मिळाली.

त्यांनी तिथे धाव घेतली तेव्हा साठे बेशुद्धावस्थेत पडलेले दिसून आले. त्यांना तत्काळ जवळच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले. ते पूर्णपणे डिहायड्रेटेड झाले होते. त्यांना रुग्णालयात आणण्यासाठी थोडा उशीर झाला असता तर त्यांच्या जीवावर बेतले असते, असे डॉक्टरांनी सांगितले.

माझ्यासोबत घडले ते तुमच्यासोबत नको म्हणून...

शिवनेरी बस प्रवासादरम्यान असे काही घडेल, असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते. घटनेचे सीसीटीव्ही पाहिल्यानंतर अंगावर शहारा येतो. मुंबईत बेवारस पडून होतो. कोणीही मदतीचा हात पुढे केला नाही. खरे तर या दरम्यान माझ्यासोबत दोन गुन्हे घडले. एक प्रवासादरम्यान हातचलाखीने केलेली चोरी आणि दुसरे म्हणजे शिवनेरीच्या कर्मचाऱ्यांनी मदतीऐवजी दिलेली वाईट वागणूक. आज माझ्यासोबत झाले ते तुमच्यासोबत होऊ नये म्हणून अशा प्रवासादरम्यान नागरिकांनी अधिक सतर्क होणे गरजेचे आहे. - शैलेंद्र साठे, तक्रारदार

...अन् तपासाला वेग

कुटुंबीयांनी माटुंगा पोलिस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक चव्हाण यांची भेट घेत सर्व घटनाक्रम सांगताच त्यांनी तत्काळ तपास पथके नेमली. आरोपी चेंबूर परिसरात उतरल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी बस, घटनास्थळ येथील सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहे.

'ते' उठून जातील...

दुपारी दोनच्या सुमारास बस दादरमध्ये आली. संबंधित प्रवासी अर्धवट झोपलेल्या स्थितीत होते. त्यामुळे त्यांना उचलून समोरच्या फुटपाथवर ठेवले. ते अर्ध्या तासांत उठून जातील, असे तेथील सुरक्षा रक्षकांना वाटल्याने त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. - अभिजित भोसले, जनसंपर्क अधिकारी


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.