Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

असा कधी झाला नाही...असा पुन्हा होणे नाही...मधुकर भावे

असा कधी झाला नाही...असा पुन्हा होणे नाही...मधुकर भावे असा कधी 
झाला नाही...
असा पुन्हा 
होणे नाही...
उद्या १३ जून... 
आचार्य अत्रे यांची ५५ वी पुण्यतिथी. बघता-बघता ५५ वर्षे कशी गेली समजलेच नाही. असे वाटते की, आत्ताच सगळे घडले आहे. त्या रात्रीचा दै. मराठामधील तो सन्नाटा... 
डोळ्यांतून ओघळणारे अश्रू. केवळ मराठाचा पालक नव्हे... अख्ख्या महाराष्ट्राचा वैâवारी... महाराष्ट्रासाठी लेखणीची तलवार करणारा आणि वाणीचा तोफखाना करणारा हा एकमेव म्हणजे एकमेवच! यापूर्वी असा कधी कोणी झाला नाही आणि साहेबांच्याच भाषेत सांगायचे झाले तर... पुढच्या दहा हजार वर्षांत असा पुन्हा कधी होणे नाही. मराठी भाषिक राज्यासाठी १९४६ सालापासून... बेळगावच्या साहित्य संमेलनापासून १ मे, १९६० पर्यंत अखंड १६ वर्षे लेखणी आणि वाणी याची तलवार करणारा हा एकमेव... मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राची मुंबई आणि मुंबईचा महाराष्ट्र याची फारकत होऊ न देणारा हा एकमेव... १९५५ ते ६० हा पाच वर्षांचा अखंड लढा... त्या लढ्यात चारवेळा तुुरुंगवास. आणि त्याचबरोबर बेळगाव-कारवार सीमा प्रश्नासाठी त्या जिद्दीने शेवटच्या श्वासापर्यंत लढलेला सुद्धा हाच एकमेव! साहेबांवर किती लिहिले आणि किती लिहिले जाईल. त्यांनी स्वत:च एवढे लिहून ठेवलेय आणि इतक्या क्षेत्रात त्यांचे व्यक्तिमत्त्व इतके उत्तुंग आहे की, मराठी भाषा, मराठी नाटक, मराठी चित्रपट, मराठी पत्रकारिता, मराठी प्रस्तावनाकार, वक्ता... हा एकमेव असा आहे की, ज्याच्या व्यक्तिमत्त्वात दहा व्यक्तिमत्त्व होती. आज हे सारे आठवते आहे. नाटककार अत्रे मोठे, चित्रपटकार अत्रे मोठे की पत्रकार अत्रे मोठे... आणि शेवटी असा निर्णय होतो की, सर्वच क्षेत्रातील आचार्य अत्रे यांच्या उंचीचा कोणीही सापडत नाही. अशा या अत्रेसाहेबांच्या सोबत आयुष्याची उमेदीची दहा वर्षे दहा हजार वर्षे एवढी मोलाची वाटतात... आज ५५ व्या पुण्यतिथी दिनी स्वर्गात असलेल्या आचार्य अत्रे यांना... 

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य झाले, याचा केवढा मोठा आनंद असेल आणि या राज्याचे नाव ‘महाराष्ट्र’ ठेवले गेले तेही केवळ या एकमेव व्यक्तिमत्त्वामुळे. महाराष्ट्राला हे माहितीही नसेल. हे मराठी राज्य निर्माण करायचे ठरले तेव्हा त्या राज्याचे नाव ‘मुंबई राज्य’ असे ठरले होते. हाच एकमेव लढवय्या पुढे आला आणि त्यांनी ‘मराठा’तून गर्जून सांगितले... ‘आमचे नाव महाराष्ट्रच, याद राखा हेच नाव राहील’ आणि सरकारने २४ तासांत मुंबई राज्याच्या ऐवजी ‘छत्रपतींच्या या महाराष्ट्राचे नाव ‘महाराष्ट्र राज्य’ असेच ठेवले’ तो दणकाही याच एकमेव नेत्याचा होता.

मराठी राज्य झाले त्यासाठी कामगार आणि शेतकरी लढले. १०६ हुतात्मे झाले, हजारो लोकांना अटक झाली, शिक्षा झाल्या, अनेकजण पंगू झाले. पण मायमराठीसाठी जगाच्या पाठीवर हा लढा होणे नाही. संतप्त महाराष्ट्र काय असू शकतो? आणि त्याचे नेते किती ताकदीने लढू शकतात, या सार्‍यांची इतिहासात नोंद झाली म्हणूनच आज तो सगळा लढा डोळ्यासमोरून सरकतो आहे. ते लाखोचे मोर्चे, घेराव, ते लाठीमार, ते गोळीबार, ते जनता कर्फ्यू... चौपाटीवर मराठी माणसांनी उधळलेली मोरारजींची ती सभा... ते सेनापती बापट, ते कॉम्रेड डांगे ते एस. एम. जोशी, ते उद्धवराव पाटील, ते प्रबोधनकार, ते क्रांतीसिंह नाना पाटील, ते दादासाहेब गायकवाड आणि अमरशेख, अण्णाभाऊ, आत्माराम पाटील यांनी उठविलेले रान त्यांचा त्याग केवढा मोठा. त्यांना कोण विसरेल... एक नव्हे शेकडो नेते आणि लाखो संतप्त मराठी जनता. पूर्वी असे कधी घडले नाही आणि पुन्हाही घडणार नाही... अशा त्या साहेबांच्या सगळ्या आठवणी समोर येतात. पण साहेबांना सगळ्यात मोठे दु:ख असेल ते ४० लाख मराठी सीमावासीय यांना अजून न्याय मिळू शकला नाही. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या भागातील मराठी माणूस ६५ वर्षे लढतो आहे. शेवटी हा सीमाप्रश्न २००४ साली सर्वोच्च न्यायालयात गेला. गेली २० वर्षे ४० लाख लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न, त्यांच्या भाषेचा प्रश्न, त्या तरुणांच्या भविष्याचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयापुढे साधा सुनावणीलासुद्धा येत नाही. १५ पंतप्रधान, अनेक मुख्यमंत्री या सर्वांना प्रश्नाची बाजू पटल्यानंतरही सीमाभागाला न्याय मिळत नाही, 
ही लोकशाहीची सगळ्यात मोठी थट्टा आहे आणि अत्रेसाहेबांना स्वर्गामध्ये हीच एकमेव सल असेल. कारण सीमाप्रश्नासाठी अत्रेसाहेबांनी नुसत्या खस्ता खाल्या नाहीत. ‘मिसा’ कायद्याखाली तीनवेळा त्यांना सीमाप्रश्नाच्या चळवळीसाठी शिक्षा झाली. कॉ. कृष्णा मेणसे यांच्या बरोबरीनेच या लढ्यात अत्रेसाहेब लढत होते. बाबूराव ठाकूर, सायनाक, सुंठणकर असे अनेक नेते होते. पण बेळगावपासून ५०० मैलावर राहून अत्रेसाहेबांना सीमाप्रश्न सुटत नाही यामुळे जे दु:ख होते... ते एकमेव असे आहेत की, विधानसभेने सीमाप्रश्न महाराष्ट्रात सामील करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर केल्यानंतर (५ ऑगस्ट १९६६) त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून आमदारकीचा राजीनामा देणारा दुसरा कोणीही आमदार नाही. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील १०६ हुतात्म्यांपैकी हुतात्मा अनंत गोलतकर याला पोलिसांनी लाथा-बुक्क्यांनी तुडवून मारलेले आहे, ही गोष्ट महाराष्ट्राला ओरडून सांगणारे आणि पोलिसांनी त्याच्या खिशात खोटे प्रेमपत्र कोंबून, त्याने आत्महत्या केली आहे, हे जे नाटक रचले त्याची चिरफाड करून अनंत गोलतकर हा महाराष्ट्रासाठी हुतात्मा झाला... १०५ नव्हे १०६ हुतात्मे हे आचार्य अत्रे यांच्यामुळेच जगाला कळले, त्याचप्रमाणे सीमाभागात नागप्पा नावाच्या एका पैलवानाला पोलिसांनी बदडून त्याचा मृत्यू झाला असताना त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे बनावट कारस्थान रचले गेले. हे कारस्थान बेळगावात झाले. अत्रेसाहेब मुंबईत. ते स्वत: बेळगावला गेले. एखाद्या वार्ताहराने एखादे प्रकरण खणून काढावे, त्या पद्धतीने अत्रेसाहेबांनी नागप्पाच्या मृत्यूची सगळी माहिती घेतली आणि त्यावेळच्या बेळगावच्या कलेक्टर विरोधात सडकून टीका केली. रानडे नावाचे कलेक्टर होते, त्यांच्याविरोधात अत्रेसाहेबांनी बिनतोड युक्तिवाद केला. त्या रानडेसाहेबांनी अत्रेसाहेबांवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला. खटल्यासाठी अत्रेसाहेब बेळगावला आले. त्यांचे वकील अ‍ॅड. सुशिल कवळेकर होते. साहेबांनी असे म्हटले होते की, ‘कोणत्या गाढवाच्या लेकाने रानडे यांना कलेक्टर केले.’ याच एका वाक्यावर रानडे यांनी अब्रू नुकसानीचा खटला केला. बेळगावचे न्यायाधीश मैत्राणी यांच्यासमोर खटला चालला. अत्रेसाहेब काय होते? हे समजून घेण्याकरिता हा खटला त्यावेळी महाराष्ट्र्रात खूप गाजला. किती आघाड्यांवर अत्रेसाहेब लढले त्या आघाड्या मोजता येणार नाहीत. पण कायदेशीर आघाडीतही अत्रेसाहेबांसारखा असा झाला नाही, असा होणार नाही...
खटला उभा राहिला. उलटतपासणीत अशी प्रश्नोत्तरे झाली...
अ‍ॅड. कवळेकर : आपले नाव काय?
आ. अत्रे : प्रल्हाद केशव अत्रे
अ‍ॅड. कवळेकर : आपले शिक्षण?
आ. अत्रे : बी.ए.बी.टी.टी.डी.(लंडन)
अ‍ॅड. कवळेकर : आपण नाट्यलेखन खूप केले आहे का?
आ. अत्रे : होय. साष्टांग नमस्कार, मोरूची मावशी, लग्नाची बेडी अशी अनेक नाटके मी लिहिली आहेत.
अ‍ॅड. कवळेकर : तुम्ही चित्रपट देखील निर्माण केले आहे का?
आ. अत्रे : हो. श्यामची आई या माझ्या चित्रपटाला राष्ट्रीय सुवर्णपदक मिळाले आहे. म. फुले यांच्यावरील चित्रपटाला रौप्यपदक मिळाले आहे.
अ‍ॅड. कवळेकर : थोडक्यात, आपण थोर साहित्यिक आहात? तेव्हा असं सांगा की, शब्दांना किती अर्थ असतात. 
आ. अत्रे : शब्दांना आठ प्रकारचे अर्थ असतात... शब्दार्थ, भावार्थ, रूढार्थ, मतितार्थ, व्यंगार्थ, हेत्वार्थ, संकेतार्थ आणि अन्वयार्थ.
अ‍ॅड. कवळेकर : तेव्हा आता सांगा... ‘कोणत्या गाढवाच्या लेकाने याला कलेक्टर केले आहे?’ याचा अर्थ काय?
आ. अत्रे : याठिकाणी ‘शब्दार्थ’ घ्यायचा नसतो. गाढवाच्या लेकाने म्हणजे मूर्ख माणसाने. मी कलेक्टर रानडे यांना मूर्ख म्हटलेले नाही तर ज्याने त्यांना कलेक्टर नेमले त्या मोरारजी देसाईना मी मूर्ख म्हटले आहे. त्यामुळे माझ्या लेखातून रानडे यांची अब्रू गेली, असे होत नाही. त्याचप्रमाणे ‘त्याचा बाप नरकात गेला असता का?’ या वाक्याचा अर्थ हुतात्मा नागप्पा याचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले असते तर काय बिघडले असते. माझ्या या वाक्यामुळे रानडे यांची बदनामी होत नाही.

अत्रेसाहेबांच्या निवेदनानंतर न्यायाधीश मैत्राणी यांनी लगेच निकाल देऊन टाकला आणि त्यांनी सांगितले की, आचार्य अत्रे यांचे साहित्य क्षेत्रातील मौलिक योगदान ध्यानात घेऊन मी सौम्य दृष्टीने या खटल्याकडे पाहतो आणि त्यांना ५०० रु. इतका दंड जाहीर करतो. (Taking in to considration the meritiorious recors of Mr. P. K. Atre in the filed of literature i take the lenient view and fine him Rs. 500/- only.)
आरोपीच्या पिंजर्‍यातून आचार्य अत्रे बाहेर येताच रानडे यांच्याकडे बघून ते हलक्या आवाजात म्हणाले, ‘या रानडे यांची अब्रू फक्त ५०० रुपयांची.’ कोर्टात प्रचंड गर्दी जमली होती. त्यांनी आचार्य अत्रे यांचा जयजयकार केला. आचार्य अत्रे यांची कायदेशीर बुद्धीमत्ता समजण्याकरिता हा किस्सा फार पुरेसा आहे.
आणि हो, महत्त्वाचे सांगायचे राहिले... १ मे, १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र झाला त्या दिवसाच्या आनंदोत्सवात किंवा आदल्या दिवशीच्या ३० एप्रिलच्या शिवाजी पार्कच्या सभेत आचार्य अत्रे उपस्थित नव्हते. ज्या महाराष्ट्रासाठी ते लढले होते ते राज्य मिळाल्यावर त्या राज्यात सीमाभाग सामील झाला नाही म्हणून १ मे, १९६०  रोजी आचार्य अत्रेसाहेब बेळगावातील जनतेमध्ये जाऊन पुन्हा एकदा सीमा लढा कसा लढवायचा? याची घोषणा करत होते आणि त्या दिवशी त्यांनी जाहीर केले... संयुक्त महाराष्ट्र झाला असला तरीही संपूर्ण महाराष्ट्र झालेला नाही आणि १३ जून, १९६९ पर्यंत सीमा प्रश्नासाठी ते लढत राहिले. त्यांचे ते स्वप्न अपुरेच राहिले आणि महाराष्ट्राला आज सीमाप्रश्नाचे काहीही पडलेले नाही आणि ज्या संयुक्त महाराष्ट्रासाठी शेतकरी आणि कामगार लढला, हेच दोन्ही घटक गेल्या ६५ वर्षांत चिरडले गेले आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढले कोण? रक्त सांडणारे कोण? बलिदान देणारे कोण? आणि ६५ वर्षांत गब्बर झाले कोण? आज आचार्य अत्रे असते तर सीमाप्रश्नासाठी त्यांनी आकाश-पाताळ एक केले असते. आज महाराष्ट्रात जे काही चालले आहे त्या प्रवृत्तीचा त्यांनी चेंदामेंदा करून टाकला असता. म्हणूनच आज राहून राहून वाटते... साहेब आज हवे होते... साहेब आज हवे होते... पण ते नाहीत म्हणून एवढेच म्हणता येईल...
असा कधी झाला नाही...
असा कधी होणे नाही...📞9869239977

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.