Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आई मुलासाठी जामीन घेऊन आली, पोलीसांनी चक्क मृतदेहच दिला

आई मुलासाठी जामीन घेऊन आली, पोलीसांनी चक्क मृतदेहच दिला 


अमरावती:  पोलीस कस्टडीतून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या संशयीत आरोपी युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.१४) अमरावतीत उघडकीस आली. विशेष म्हणजे त्याची आई वकिलासह जामीन घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात आपल्या मुलाला भेटायला आल्यावर पोलिसांनी चक्क मृतदेहच समोर आणल्याने कुटुंबाने एकच आक्रोश केला.

पोलीस कस्टडीतच मारहाणीमुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाला आहे, असा आरोप आईसह कुटुंबातील इतर सदस्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी कुटुंबाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदनगृहासमोर ठिय्या मांडला होता. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहून अखेर कुटुंबाची समजूत काढली. मृतदेह अकोला येथे इन कॅमेरा शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतरच रितेश मेश्रामचा मृत्यू कसा झाला याचा उलगडा होणार आहे.
काय आहे प्रकरण :

चांदुर रेल्वे येथील रितेश अशोक मेश्राम याच्यावर चार वर्षांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान त्याची जामीनावर सुटका देखील झाली होती. त्यानंतर तो तारखेवर दोनदा गैरहजर असल्यामुळे त्याच्या नावाचा वॉरंट निघाला. दि. १० जून रोजी चांदुर रेल्वे पोलीस त्याला घरातून घेऊन गेले. त्यानंतर पोलीस कस्टडीत तो आजारी पडल्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातील कैद्यांच्या वार्डात दि. ११ जून रोजी दाखल करण्यात आले. तेथेच त्याचा अचानक मृत्यू झाला. ही माहिती कुटुंबाला मिळताच त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली आणि एकच आक्रोश केला.

कस्टडीतच मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप :
रितेश मेश्राम याचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाला आहे. पोलीस त्याला घेऊन गेले तेव्हा तो ठणठणीत होता. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी त्याला घरातून नेले तेव्हा त्याची प्रकृती चांगली होती. त्याच्या शरीरावर कुठलेच व्रण नव्हते किंवा त्याला कुठलीच दुखापत नव्हती.

कुटुंबातील लोक जेव्हा पोलीस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना पोलिसांनी भेटू दिले नाही. कोर्टातून जामीन घेऊन या आणि त्याला घेऊन जा असे सांगण्यात आले. कुटुंब जेव्हा पहिल्या दिवशी जिल्हा सामान्य रुग्णालयात मुलाला पाहायला आले तेव्हा त्याला तिथेही भेटू दिले नाही.

शुक्रवारी (दि.14) जेव्हा रितेशची आई जामीन घेऊन आली तेव्हा सकाळी त्याचा मृतदेहच पोलिसांनी कुटुंबाच्या स्वाधीन केला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून इन कॅमेरा केलेल्या शववच्छेदन अहवालातूनच खरा उलगडा होणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.