Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'ना साहेबांची भीती ना 'लाचलुचपत'ची, 'आरटीओ ' तील खुर्चीवरही ' गोपाळराज '

'ना साहेबांची भीती ना 'लाचलुचपत'ची, 'आरटीओ ' तील खुर्चीवरही ' गोपाळराज ' 


कोल्हापूर : प्रवेशद्वारापासून ते महत्त्वाच्या ठिकाणापर्यंत आरटीओत बाहेरचीच यंत्रणा कार्यरत आहे. नागरिकांना सहकार्य करण्यासाठी असलेले काही बाहेरील खासगी व्यक्ती (एजंट) थेट अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर, खुर्चीला खुर्ची लावून बसणाऱ्यापर्यंत त्यांचे लाड झाले आहेत.

नेहमीच्या व्यावसायिकांना कोण कोणाचा माणूस हे आता सातबारा नोंदीप्रमाणे अधोरेखित झाले आहे. सीसीटीव्ही बंद करून येथे खुलेआम 'कारभार' सुरू आहे. नवीन अधिकाऱ्यांकडून या यंत्रणेत बदल होईल, अशी अपेक्षा आहे.

शहरातील हे कार्यालय नेहमी या ना त्या कारणावरून चर्चेत असते. अलीकडेच पोलिसांनी कारवाई करून या कार्यालयाच्या कारभारावर तिखट मीठ चोळले. यापूर्वी अशा यंत्रणेमुळे वरिष्ठ अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीशीवर उत्तर द्यावे लागले.

काही अधिकृत कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. मात्र, ज्यांच्यामुळे हे घडले ते मोकाट राहिले. साहेब कोणीही येवोत त्यांची यंत्रणा सक्रिय आहे. त्यांना कोणीही तेथून हालवू शकत नाही अशी त्यांची मक्तेदारी आहे. स्थानिकांसह परगावाहून आलेल्यांनी येथे चांगलेच बस्तान बसविले आहे. एका सरकारी कार्यालयातील खुर्चीवर बाहेरील एजंट कसा बसून काम करतो याचेही उदाहरण नुकताच पुढे आले आहे. पासिंगबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ट्रॅव्हलर्स पकडल्या. 
पण, त्यानंतर प्रादेशिक परिहवन कार्यालयातील यंत्रणा यामध्ये कशी सक्रिय होती किंवा त्यांनी याकडे कानाडोळा कसा केला, इथपर्यंत अजूनही तपास पोहचलेला नाही. काही घडलेच तर ते कसे थोपवायचे यात येथील यंत्रणेचा हात कोणीही धरणार नाही, अशी त्यांची ख्याती (?) आहे.

'अंदर-बाहर' बाहेरचीच यंत्रणा
कार्यालयातील लायसेन्स विभागासह अन्य ठिकाणी सरकारी खुर्चीवर बाहेरील खासगी व्यक्ती बसतात. काहीजण ते एजंट असल्याचे सांगतात. काही चेष्‍टेत 'सातबारा' त्यांच्याच नावावर आहे असे सांगतात. कोणीही अधिकारी आला तरीही येथील अंदर-बाहरची यंत्रणा बाहेरचीच आहे. 

अधिकाऱ्यांनाही त्यांच्या सोबत सरकारी कार्यालयात बाहेरील व्यक्ती कशा चालतात हे 'ओपन सिक्रेट' आहे. सीसीटीव्ही बंद असल्यामुळे येथे सर्व खुलेआम आहे. कार्यालयातील सर्व सीसीटीव्ही सुरू केले तर त्यांना चाप बसण्याची शक्यता आहे.
'ती'मुभा कोणत्या अधिकारात दिली?

अधिकाऱ्यांची अशी कोणती कामे खासगी व्यक्ती सरकारी खुर्चीवर बसून करतात ? सर्व सामन्यांची सरकारी कागदपत्रे हातळण्याची मुभा खासगी व्यक्तींना कोणी, कोणत्या अधिकारात दिली ? असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने पुढे येतात. नुकताच या कार्यालयाला नवीन अधिकारी मिळाले आहेत. त्यांच्याकडून हा सर्व कारभार सुधारला जाईल ही अपेक्षा आहे.

ना साहेबांची भीती ना 'लाचलुचपत'ची
येथे राजकीय पक्षांच्या नावावर दोघे-तिघे कारभारी झाले आहेत. त्यांना कोणाचीही भीती नाही. ना साहेबांची, ना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची. कारण येथे गेल्या दहा वर्षात एकदाही लाच लुचपतचा छापा पडल्याचे आठवत नाही. येथे छापा का पडत नाही याचेही गौडबंगाल येथील प्रत्येकाला चांगले माहिती आहे. त्यामुळे जे चालले आहे ते बिनधास्त सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.