Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जगप्रसिद्ध हायब्रीड कार प्रकल्प छत्रपती संभाजीनगरात ५० हजार कोटी गुंतवणार?

जगप्रसिद्ध हायब्रीड कार प्रकल्प छत्रपती संभाजीनगरात ५० हजार कोटी गुंतवणार?

छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध हायब्रीड कार उत्पादन करणाऱ्या कंपनीचा मोठा प्रकल्प लवकरच ऑरिक सिटीअंतर्गत असलेल्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडोअर (डीएमआयसी)मध्ये येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुमारे ५० हजार कोटींची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पाला ६०० एकरहून अधिक जमिनीची आवश्यकता आहे. या कंपनीची ऑरिकमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा कधी होते, याकडे उद्योगजगताचे लक्ष लागले आहे.

औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरपासून जवळच शेंद्रा येथे असलेल्या ऑरिक सिटीअंतर्गत दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडोअरच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात १० हजार एकर औद्योगिक जमीन आहे. जागतिक दर्जाच्या औद्यागिक सुविधा असलेली सर्वात मोठी लॅण्ड बँक म्हणून डीएमआयसीकडे पाहिले जाते. डीएमआयसीमध्ये मोठा ॲँकर प्रकल्प यावा, यासाठी सीएमआयए आणि मासिआचे पदाधिकारी मागील सहा वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. येथील वाळूज औद्योगिक वसाहत ही ऑटोमोबाइल इंडस्ट्रीज म्हणून ओळखल्या जाते. जगभरातील बहुतेक ऑटो उद्योगांना सुटे भाग पुरविणारी ही एकमेव एमआयडीसी आहे. येथील व्हेंडर चेन उत्कृष्ट असल्याने दोन बहुराष्ट्रीय ऑटोमोबाइल कंपन्यांचे मोठे प्रकल्प लवकरच ऑरिक सिटीमध्ये येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्य सरकार सोबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. संबंधित एका कंपनीच्या एजन्सींनी ऑरिक सिटीमध्ये येऊन शेंद्रा आणि बिडकीन डीएमआयसीतील जमिनीची पाहणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. येथील औद्योगिक वातावरण कसे आहे, मागील दहा वर्षांत एमआयडीसीला पाण्याचा कधी तुटवडा जाणवला का? उद्योजक संघटना इ. बाबींची माहिती घेतली गेली आहे. या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मोठे प्रकल्प येथे यावे, यासाठी सीएमआयए पदाधिकारी संबंधित कंपनी आणि शासनाच्या संपर्कात आहे.

उद्योगमंत्र्यांनीही दिले होते आश्वासन

लोकसभा निवडणूक कालावधीत उद्योगमंत्री उदय सामंत पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या प्रचारासाठी शहरात आले होते. तेव्हा सामंत यांनी स्थानिक उद्योजकांशी चर्चा करताना लोकसभा निवडणुकीनंतर ऑरिक सिटीमध्ये मोठी गुंतवणूक येईल, त्याची घोषणा करू असे आश्वासन दिले होते. नुकतीच लोकसभेची आचारसंहिता संपल्याने उद्योजकांना आता नव्या अँकर प्रकल्पाची उत्सुकता लागली आहे.

मराठवाड्याच्या उद्योगजगताला दिशा देणारा प्रकल्प

ऑरिकमध्ये उद्योगांना पूरक असे रेडी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सोबतच व्हेंडर बेस सर्वोत्तम आहे. रेल्वे, विमानसेवा, समृद्धी महामार्ग, धुळे- सोलापूर महामार्ग आणि प्रस्तावित पुणे- छत्रपती संभाजीनगर महामार्ग यामुळे कनेक्टिव्हिटी चांगली झाली आहे. परिणामी ऑरिकमध्ये एक हायब्रीड कार उत्पादक बहुराष्ट्रीय कंपनी येणार असल्याचे कळाले आहे. पण, संबंधित कंपनीचे नाव अद्याप समजू शकले नाही. हा प्रकल्प मराठवाड्याच्या उद्योगजगताला दिशा देणारा ठरेल.

- अनिल पाटील, माजी अध्यक्ष, मासिआ


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.