Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाबळेश्‍‍वर, पाचगणी मधील हॉटेल्स, रिसॉर्टसवर कारवाई :, साहित्यासह मुलाबाळांना रस्त्यावर घेऊन येण्याची पर्यटकावर वेळ!

महाबळेश्‍‍वर, पाचगणी मधील हॉटेल्स, रिसॉर्टसवर कारवाई :, साहित्यासह मुलाबाळांना रस्त्यावर घेऊन येण्याची पर्यटकावर वेळ!


महाबळेश्‍‍वर : ऐन पर्यटन हंगामात महाबळेश्‍‍वर व पाचगणी येथील हॉटेल्सवर  झालेल्या कारवायांमुळे संबंधित हॉटेलच्या रूममध्ये वास्तव्यास असलेल्या पर्यटकांना नाहक मनस्ताप, त्रास सहन करावा लागला. या पर्यटकांना मुलाबाळांसह रस्त्यावर उभे राहून दुसऱ्या हॉटेलवर पर्यायी व्यवस्था पाहण्‍याची वेळ आली. 

त्यामुळे या पर्यटनस्थळांची प्रतिमा कुठे, तरी मालिन होत आहे. त्‍यामुळे जिल्हा प्रशासनाने अशा पद्धतीने कारवाया करताना संबंधित हॉटेल व्यावसायिकांना किमान मुदत देण्याची आवश्यकता असून, पर्यटकांची आबाळ होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

महाराष्ट्राची निसर्गरम्य थंड हवेची ठिकाणे असलेल्या महाबळेश्‍‍वर व पाचगणी या पर्यटनस्थळी उन्हाळी हंगामामुळे पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली आहे. त्‍यामुळे सर्वच छोटे- मोठे लॉजिंग, रिसॉर्ट्स खचाखच भरली आहेत. अशातच पाचगणी येथील हॉटेल द फर्न रिसॉर्टवर  जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करत ते सील बंद केले. त्यानंतर अग्रवाल कुटुंबीयांचे एमपीजी क्लब या महाबळेश्‍‍वरमधील आलिशान हॉटेलला देखील टाळे टोकून सील करण्यात आले. 

ही कारवाई करताना केवळ एक दिवस आधी व्यवस्थापनास नोटीस दिल्याची माहिती मिळत असली, तरी रिसॉर्ट वा हॉटेल्सचे एक- दोन महिन्यांपूर्वीच दोन ते तीन दिवसांसाठी आगाऊ आरक्षित केलेल्या पर्यटकांना अचानक जिल्हा प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे साहित्‍य व मुलाबाळांना घेऊन अक्षरशः रस्त्यावर येण्याची वेळ आली. हॉटेल्स, रिसॉर्ट्सवर अशा कारवाया करताना हॉटेल व्यवस्थापनास पुरेसा अवधी दिल्यास पर्यटकांना त्‍याचा नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. पर्यायाने महाबळेश्‍‍वर, पाचगणी पर्यटस्थळाची नावे खराब होणार नाही. त्यामुळे या सर्वच गोष्टींचा जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी हॉटेल असोसिएशनचे सचिव, हॉटेल गौतमचे रमेशभाई कौल यांनी केली. 
तसेच या आस्थापनावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील अचानक झालेल्या कारवाईमुळे त्यांच्या उदरनिर्वाह व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन त्यांना देखील मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत देखील शहरातून चर्चा सुरू होती. वास्तविक आजतागायत बेकायदेशीर व्यवसाय कुणाच्या पाठिंब्यामुळे सुरू होता? तसेच याबाबत प्रशासनाने कारवाईचा फार्स करून केवळ त्रास देत नागरिकांना वेठीला धरून काय साध्य होणार? असा प्रश्‍‍न शहरातून उपस्थित होत आहे, तर बेकायदेशीर बांधकामांबाबत कायमस्वरूपी तोडगा काढून येथील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कारवायांना विरोध नाही; पण...
आधीच अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट फुल्ल असताना पर्यायी व्यवस्था शोधण्यापासून त्यांची सुरुवात झाली, तर काही पर्यटकांना आल्या पावली परत घराकडे जाण्याची वेळ आली. महाबळेश्‍‍वर, पाचगणी येथे झालेल्या या कारवायांना विरोध नसून जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना होणाऱ्या त्रासाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.