Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ईद - उल - अजहा : इस्लाम, ज्यू, ख्रिश्चनआणि हींदू धर्मात प्राण्याची कुर्बानी का दिली जाते?

ईद - उल - अजहा : इस्लाम, ज्यू, ख्रिश्चनआणि हींदू धर्मात प्राण्याची कुर्बानी का दिली जाते?


प्रेषित इब्राहिम यांना अल्लाहसाठी आपल्या मुलाचा बळी द्यायचा होता. पण अल्लाहने त्यांना रोखलं आणि आपल्या मुलाऐवजी मेंढीची कुर्बानी देण्यास सांगितल्याचं मुस्लीम धर्मातील लोक मानतात. इब्राहिम यांना ख्रिश्चन आणि ज्यू धर्मात अब्राहम म्हणून ओळखले जाते. असं मानलं जातं की, प्रेषित इब्राहिम यांनी एकदा त्यांच्या स्वप्नात पाहिलं की अल्लाहने त्यांना निष्ठा दाखवण्यासाठी आपला मुलगा इस्माईलचं बलिदान देण्यास सांगितलं.

प्रेषित इब्राहिम यांनी या स्वप्नाला अल्लाहचा संदेश मानला आणि त्याबद्दल आपल्या मुलाला सांगितलं. तेव्हा अल्लाहच्या आदेशाचे पालन करावं, असं त्यांच्या मुलानं वडिलांना सांगितलं त्यानंतर इब्राहिम अल्लाहसाठी आपल्या मुलाची कुर्बानी देणार होते. त्याच क्षणी अल्लाहने इब्राहिम यांना रोखलं. अल्लाहने सांगितले की, त्यांचा हेतू केवळ इब्राहिम यांची परीक्षा घेण्याचा होता आणि मुलाचा खरोखर बळी देण्याची गरज नाही.

त्यावेळी अल्लाहने त्याला एक मेंढी दिली आणि मुलाऐवजी या प्राण्याची कुर्बानी देण्यास सांगितलं. बलिदानाची ही परंपरा इस्लाम धर्म उदय होण्याच्या आधीपासून चालत आलेली आहे. सध्या जगभरातील मुस्लिम धर्मीय विविध प्रकारच्या प्राण्यांचा बळी देत ​​आहेत.

जर एखाद्या व्यक्तीकडे आवश्यकतेपेक्षा जास्त मालमत्ता असेल तर त्यांनी प्राण्यांचा बळी देणं बंधनकारक असतं, असं मानलं जातं. पण प्राण्यांचा बळी देण्याबाबत ज्यू, ख्रिश्चन आणि हिंदू धर्मात काय सांगण्यात आलं आहे? जाणून घेऊया.

ज्यू धर्म

इस्लामचा इतिहास आणि ज्यू, ख्रिश्चनांच्या इतिहासात अनेक साम्य आहेत. ब्रिटनमधील लिओ बेक कॉलेजमधील प्रा. रब्बी गॅरी सोमर्स म्हणतात की, ज्यू धर्मग्रंथांमध्ये अनेक प्रकारच्या यज्ञांचा उल्लेख आहे. त्यासाठी विशिष्ट वेळ आणि विशिष्ट ठिकाणही नमूद केलं आहे.
"आजकाल आपण बळी देण्याच्या सर्व विधी पाळत नाहीत. कारण ज्या ठिकाणी बलिदान केलं जायचं ती जागाच आता अस्तित्वात नाही. म्हणून सध्या बळी देण्याऐवजी आपल्या प्रार्थनेत त्या त्याविषयीचा उल्लेख केला जातोय," असं सोमर्स सांगतात.

अमेरिकन ज्यू विद्यापीठातील डॉ.आर्टसन ब्रॅडली शाविट सांगतात, "रोमन योद्ध्यांनी दुसरं टेंपल उद्ध्वस्त केल्यापासून ज्यू धर्मात प्राण्यांच्या बलिदानाला परवानगी नाही. यावर कायमची बंदी घालण्यात आली आहे, असे अनेक लोक मानतात. पण मसीहाच्या अवतारानंतर ही परंपरा साजरी करण्याचा ट्रेंड वाढला आहे."

ज्यूंसाठी टेंपल म्हणजे जेरुसलेमच्या जुन्या शहरात असलेला टेंपल माउंट. आज जिथे अल-अक्सा मशीद उभी आहे. त्यांच्या प्रार्थनेतून, ज्यू लोकांनी टेंपल पुन्हा एकदा बांधलं जावं अशी इच्छा करतात. पुन्हा एकदा टेंपल बांधल्यावर ते त्याठिकाणी प्राण्यांचा बळी देऊ शकतील असा त्यांचा विश्वास आहे. टेंपल नसल्यामुळे, बहुतेक ज्यू धर्मीय सध्या प्राणी बलिदानाच्या परंपरेचं पालन करत नाहीत.

पण जेरुसलेममधील काही गट, जसे की समॅरिटन, अजूनही काही सणाच्या वेळी बळीची प्रथा पाळतात. तर इतर काही गट जनावरांच्या किमतीएवढी रक्कम दान करतात. मेंढ्या, म्हैस किंवा बकरी असा कोणताही बळी असला तरी तो प्राणी बलिदानासाठी 'योग्य' असलाच पाहिजे म्हणजेच 'कोशेर' असला पाहिजे.

हिब्रूमध्ये 'कोशर' म्हणजे 'तयार' किंवा खाण्यासाठी योग्य, असा अर्थ होतो. जे पदार्थ ज्यूंच्या आहाराच्या नियमांनुसार असतात त्यांना कोशर पदार्थ म्हणतात. ज्यूंमध्ये कालांतराने प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा कमी झाली. पण मांस खाणं हा अजूनही अनेक सणांचा एक महत्त्वाचा भाग आहे.

ज्यूंमध्ये पशू बलिदानासाठी विविध प्रकारचे धार्मिक विधी आहेत आणि ते बलिदानाच्या उद्देशानुसार बदलतात. पूर्वी ज्यू धर्मात तीन धार्मिक सण होते, जे पशुबलिदानाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. हे सण म्हणजे पेसाह (पॅसव्ह), शावुत (आठवड्यांचा सण) आणि सुकोट (मंडपांचा सण).
रब्बी गॅरी सोमर्स नमूद करतात की रोश हशनाह (ज्यू नवीन वर्ष) आणि योम किप्पूर (प्रायश्चिताचा दिवस) यांसारख्या इतर सणांवर देखील प्राण्यांचे बलिदान केले जात असे. पैगंबर अब्राहमच्या बलिदानाची कथा ज्यू धर्मग्रंथांमध्येही आढळते. मात्र, प्राण्यांचा बळी देण्याचा आदेश नंतर आला आणि ज्यूंसाठी तो थोडा वेगळा होता.

ख्रिश्चन धर्म

ख्रिश्चन धर्माचे मूळ ज्यू धर्मात आहे. ज्यू धर्मग्रंथांमध्ये अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा बायबलच्या जुन्या करारात उल्लेख आहे. ओल्ड टेस्टामेंटची पुस्तके, विशेषत: लेव्हिटिकस 17 आणि ड्युटेरोनोमी, प्राण्यांचे बलिदान कसे केले जाते याचे तपशीलवार वर्णन करतात.
बांगलादेशमधील काफ्रूल कॅथलिक चर्चचे पाद्री डॉ प्रशांतो टी. रिबेरो म्हणतात की, तेव्हा संध्याकाळी प्राण्यांचे बलिदान केले जात असे. त्या वेळी नकारात्मक प्रवृत्तींना दूर ठेवण्यासाठी प्राण्यांचे बळी दिले जात होते. या दरम्यान ख्रिश्चम धर्मात प्राण्यांना बळी देण्याची प्रथा थांबली. या धर्मात येशू ख्रिस्ताच्या मृत्यूलाच सर्वात मोठे बलिदान मानले जाते. ख्रिस्ती धर्मात येशू ख्रिस्ताला 'देवाचे कोकरू' म्हणून पाहिले जातं.

डॉ. रिबेरो म्हणतात की, ख्रिश्चन धर्मात सध्या बलिदानाची कोणतीही धार्मिक तरतूद नाही. पण देवाला नवस केला असेल अजूनही काही ठिकाणी प्राण्यांचा बळी दिला जातो. ज्यूंशी संबंध सोडला तर देवाच्या नावावर प्राण्यांच्या बळी देण्याबाबत ख्रिश्चन धर्मात विशेष प्रथा नाही. पण, ख्रिश्चन धर्मात मांस खाण्याबाबत कोणत्याही प्रकारचे निर्बंधही नाहीयेत.
बऱ्याच देशांमध्ये, ज्यू वल्हांडण सणाच्या वेळी मांस खातात. रिबेरो सांगतात की, इटलीच्या प्रवासादरम्यान त्यांच्या लक्षात आले की इस्टर सण सुरू होण्याआधी ख्रिश्चन धर्मात मांस खाणं जवळजवळ अनिवार्य होतं. पण ज्यू धर्मात जसं पशूबळी आहे, तसंच ख्रिश्चन धर्मात बलिदानाची परंपरा नाही.

हिंदू धर्म

हिंदू धर्मात पशूबळीच्या मुद्द्यावरून वाद आहेत, परंतु हिंदूंचे काही लोक पशुबलिदानाची प्रथा पाळतात. उदाहरणार्थ, भारत आणि बांगलादेशच्या अनेक भागांमध्ये, दुर्गा पूजा आणि काली पूजा यांसारख्या धार्मिक विधींमध्ये प्राण्यांचे बळी दिले जातात. महाराष्ट्रात म्हसोबा, खंडोबा, वेगवेगळ्या देवी यांच्या नावाने प्राणी बळी देतात.
बांगलादेशातील चितगाव विद्यापीठाच्या संस्कृत विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. कुशल वरण चक्रवर्ती म्हणतात, "हिंदूंच्या अनेक धार्मिक पुस्तकांमध्ये रामायण आणि महाभारत आणि पुराणांसारख्या पवित्र ग्रंथांमध्ये पशुबळीचा उल्लेख आहे." हिंदू धर्माचा प्राचीन ग्रंथ ऋग्वेदात ज्या प्राण्याला बळी दिला जातो, तो बंधनातून मुक्त होतो असं नमूद केलं आहे. असं मानलं जातं की इसवी सनाच्या 500 ते 1500 वर्षे आधी सर्व हिंदुमध्ये प्राणी बलिदान सामान्य होतं.

बळी दिलेल्या प्राण्यासं मांस प्रथम देवाला प्रसाद म्हणून अर्पण केले जाते. त्यानंतर नातेवाईक आणि जवळच्या लोकांना जेवण दिले जाते. याशिवाय काही प्राचीन मंदिरांमध्ये थेट पशुबळी देण्याची प्रथा अजूनही आहे. बांगलादेशातील ठकेश्वरी आणि भारतातील त्रिपुरा सुंदरी, कामाख्या आणि कालीघाट काली मंदिरांची उदाहरणे दिली जातात.

दुसरीकडे डॉ. चक्रवर्ती सांगतात की, हिंदू धर्मातील आध्यात्मात सध्या आत्मसमाधानाला जास्त महत्त्व दिलं जात आहे. तर प्राण्यांचा बळी दिल्याने मंदिराचे पावित्र्य कमी होते असाही त्यांचा विश्वास आहे. भारतात वेगवेगळ्या समाजातील लोकांनी स्वेच्छेने विविध मंदिरांमध्ये होणारे पशुबलिदान बंद केले आहे. श्रीलंकेतील हिंदू लोकांना मंदिरात प्राण्यांचा बळी देण्यास बंदी घालण्यात आली आहे.
नेपाळमधील अनेक लोकांनी सणांच्या काळात प्राण्यांचा बळी देणे स्वेच्छेने बंद केले आहे. पूर्वी हिंदू राज्याचा एक भाग असलेला नेपाळ आता एक स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक आहे. पण तिथे कायदेशीररित्या पशू बलिदानावर बंदी नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.