Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- उत्पन्न दाखल्यासाठी ' लाडकी बहीण ' रांगेत :, 1 दिवसात दाखला देण्याची सूचना

सांगली :- उत्पन्न दाखल्यासाठी ' लाडकी बहीण ' रांगेत :, 1 दिवसात दाखला देण्याची सूचना 


सांगली: महायुती सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाली आणि महिलांमध्ये त्याचीच चर्चा सुरू झाली. त्यासाठी जी कागदपत्रे लागणार, त्याची जमवाजमव करायला सगळ्या बहिणी आज बाहेर पडल्या. तलाठी कार्यालयांमध्ये पाय ठेवायला जागा राहिली नाही. उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला मिळवण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे. हा ताण सेतू कार्यालयांना सहन होणार नाही, असा सूर उमटू लागला. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः त्यात लक्ष घातले आणि गतीने दाखले देण्याबाबत यंत्रणेला सूचना दिल्या.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. ही योजना मध्य प्रदेशात प्रचंड यशस्वी ठरली आहे. त्याबाबत याआधी अनेकदा चर्चाही झाली होती. या योजनेतून अडीच लाख रुपयांपेक्षा कमी एकत्रित वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिला, विधवा, परितक्त्यांना दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार असल्याने महिला वर्गातून या योजनेसाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिलांना त्याचा लाभ होणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत १५ जुलैपर्यंत दिली आहे. त्याची आजपासून सुरुवात झाली आणि महिलांची एकच झुंबड उडाली.

आधी दाखला हाती आला पाहिजे, या भावनेतून महिलांचे लोंढे तलाठी कार्यालयावर धडकलेले पाहायला मिळाले. सांगलीत आज पाचशे महिलांनी अर्ज केले आणि सायंकाळी उशिरापर्यंत सगळेच्या सगळे दाखले तयार झाले, मात्र उद्यापासून ही गर्दी नियंत्रणात कशी आणायची याची चिंता आता यंत्रणेला लागलेली आहे.

ग्रामीण भागात तलाठी कार्यालयासमोर आज महिलांनी गर्दी केली. अर्ज दाखल केले. तातडीने दाखले द्या, अशी महिलांची मागणी होती. आता सेतू केंद्र, आपले सरकार केंद्रावर दाखल्यांसाठी प्रचंड ताण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फक्त पंधरा दिवसांच्या मुदतीत दहा ते बारा लाखांवर दाखले कसे काढले जाणार, याची चिंता आहे.

पद्धत बदलली तरच ताण घटेल
महसूल यंत्रणेतील काही जाणकारांना पुढील पंधरा दिवस यंत्रणा कोलमडेल, अशी भीती व्यक्त केली. दाखल्यांसाठी काही नव्या पद्धतीचा वापर करायला हवा, असा पर्यायदेखील सुचवला जात आहे. सरकारने विधानसभा आचारसंहिता लागू होण्याआधी किमान एक हप्ता महिलांच्या खात्यावर वर्ग करायचा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्याआधी सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. त्याचा ताण महसूल यंत्रणेला सोसावा लागणार आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाच्या दाखला आणि रहिवासी दाखल्यासाठी महिलांनी अर्ज केलेल्या दिवशीच त्यांना दाखला मिळावा, अशी व्यवस्था करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी प्रांत आणि तहसीलदारांना दिले आहेत. या प्रक्रियेबाबत त्यांनी सेतू केंद्र, आपले सरकार केंद्रचालकांनाही सहकार्याचे आवाहन केले आहे. खूप ताण आला तर दुसऱ्या दिवशी तरी दाखला मिळायलाच हवा, असे आमचे प्रयत्न आहेत.
- ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.