एका दिवसात 3 लढती जिंकली, फायनल आधी अपात्र :, कुटुंबांनी केले गंभीर आरोप
विनेश फोगाटचं 50 ते 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यानं तिला ऑलिम्पिकमध्ये फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं. फायनलला तिची प्रतिस्पर्धी असलेल्या अमेरिकेच्या कुस्तीपट्टूला आता सुवर्णपदक दिलं जाईल. तर कांस्यपदकासाठी सामना होईल. विनेश फोगाटला अपात्र ठरवल्याने भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. वजन जास्त असल्यानं तिला अपात्र ठरवलं गेल्यानं आता आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. विनेशच्या कुटुंबियांकडून भारताच्या कुस्ती फेडरेशनवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
ऑलिम्पिकमध्ये फायनलला विनेशला अपात्र ठरवल्यानंतर तिच्या सासऱ्यांनी प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केलीय. विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यामागे कट असल्याची शंका त्यांनी व्यक्त केलीय. विनेशला अपात्र ठरवणं हा कट असल्याचं म्हणत विनेशच्या सासऱ्यांनी फेडरेशनवर गंभीर असे आरोप केले आहेत. विनेश फोगाटने याआधी कुस्तीपटूंच्या आंदोलनात बृजभूषण सिंह यांच्याविरोधात भाग घेतला होता. रस्त्यावर उतरून तिने आंदोलन केलं होतं.
ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकण्यापासून विनेश फोगाट फक्त एक लढत दूर होती. मात्र त्याआधीच तिचं स्वप्न भंगलंय. विनेश फोगाटने मंगळवारी एकाच दिवसात राउंड १६, क्वार्टर फायनल आमि सेमीफायनल जिंकून फायनल गाठली होती. ८ तासात तीन सामने खेळून जिंकलेल्या विनेशला फायनलआधी अशा पद्धतीने अपात्र ठरवल्यानं आता अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. ओव्हरवेट असल्याचं सांगत विनेशला अपात्र ठरवल्याच्या या निर्णयाला भारताने विरोध केला आहे.विनेश फोगाटने सेमीफायनलमध्ये क्युबाच्या युस्नेलिस गुजमान लोपेलजा ५-० अशी मात दिली. सुवर्णपदकापासून आता ती फक्त एक डाव दूर होती. ५० किलो वजनी गटात विनेशचा अंतिम सामना आज रात्री दहा वाजता होणार होता. ऑलिम्पिकमध्ये एका दिवसात तिने तीन कुस्तीपट्टूंना हरवून फायनल गाठली होती. मात्र आता वजन जास्त भरल्याने तिला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलंय.
विनेश फोगाट तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये खेळत आहे. याआधी २०१६ च्या ऑलिम्पिकमध्ये दुखापतीमुळे अगदी थोडक्यात तिचं कांस्य पदक हुकलं होतं. तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये ५३ किलो वजनी गटात तिचा पराभव झाला होता. तिथे रेपेजेजमध्ये तिला संधी मिळाली नव्हती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.