दीड लाखांसाठी 50 हजाराची मागितली लाच PMRDA चे अभियंता, इंजिनियरसह तिघांना अटक
पुणे :- पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुलासाठी मंजूर झालेल्या दीड लाख रुपयांचा हप्ता देण्यासाठी तब्बल ५० हजार रुपयांची लाच मागितली गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पीएमआरडीचे कनिष्ठ अभियंता, इंजिनिअर यांच्यासह खासगी व्यक्तीला ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. पीएमआरडीने घरकुल योजनेची कामे करुन देण्यासाठी कंत्राटी अधिकारी कर्मचारी नेमले असून त्यांनी सध्या धुमाकुळ माजविला आहे. त्यामुळे शासकीय योजनेची मदत त्यांच्यापर्यंत न पोहचता गरीब लोक नागावले जात आहे.
तेजस संपत तावरे ( वय ३२, कनिष्ठ अभियंता, कंत्राटी), हेमंत लालासो वांढेकर (वय २९, इंजिनिअर कंत्राटी दोघेही नेमणूक, पीएमआरडीए कार्यालय, आकुर्डी, पिंपरी चिंचवड) आणि रामदास ऊर्फ बाबू मारुती कटके (वय ४८, रा. भिवरी, ता. पुरंदर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावाने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला होता. या योजनेतून तक्रारदार यांना घरकुलाचे अडीच लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले होते. त्यापैकी पहिला हप्ता एक लाख रुपये तक्रारदार यांच्या बँक खात्यात जमा झाला होता. उर्वरित दीड लाख रुपये जमा करण्याचे आमच्या हातात आहे. ती रक्कम तक्रारदार यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी हेमंत वांढेकर व रामदास कटके यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती.तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीची पडताळणी करताना तेजस तावरे, हेमंत वांढेकर व रामदास कटके यांनी पीएमआरडी कार्यालयात ओळख असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे सासवड बसस्टँडसमोरील हॉटेल सिद्धेश्वर येथे बुधवारी सापळा रचण्यात आला होता. तक्रारदाराकडून ५० हजार रुपये घेताना तिघांना पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.