Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कॉन्स्टेबल नीतूच्या घरात ती भयानक रात्र, सकाळी सापडले 5 मृतदेह, नेमकं काय घडलं?

कॉन्स्टेबल नीतूच्या घरात ती भयानक रात्र, सकाळी सापडले 5 मृतदेह, नेमकं काय घडलं?
 

भागलपूर: बिहारमधल्या भागलपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 13 ऑगस्ट 2024 रोजी भागलपूरच्या पोलीस लाइनमध्ये नीतू कुमारीच्या क्वार्टर नंबर-सीबी-38 बाहेर प्रचंड गर्दी होती. थोड्याच वेळात पोलीस आले आणि घरात शिरले.

घरातलं दृश्य भयंकर होतं. कारण त्या ठिकाणी एक-दोन नाही, तर पाच मृतदेह होते. कॉन्स्टेबल नीतूचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत होता. तिच्या डोक्यावर, चेहऱ्यावर व शरीराच्या इतर भागांवर हल्ल्याच्या खुणा होत्या. रक्त गोठलं होत. तिच्या शेजारी दोन मुलं आणि नीतूच्या सासूचा मृतदेह होता. त्यांचे गळे चाकूने चिरल्याच्या खुणा होत्या. जमिनीवर रक्ताचा सडा होता. त्यानंतर पोलीस दुसऱ्या खोलीत गेल्यावर त्यांना नीतूच्या पतीचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला.

सुसाइड नोटमध्ये काय लिहिलंय?
मृतदेहाजवळच एक सुसाइड नोटही होती. ही सुसाइड नोट नीतूच्या पतीनेच लिहिली होती. 'नीतूने माझी आई आणि दोन्ही मुलांचे खून केले. यानंतर रागाच्या भरात मी नीतूवर विटेने वार केले आणि नंतर चाकूने भोसकून तिची हत्या केली. आता माझं सगळं जग उद्ध्वस्त झालंय, मी जगून काय करणार? मी ही मरायला जात आहे,' असं सुसाइड नोटमध्ये लिहिलं होतं.

पोलिसांनी सुसाइड नोट ताब्यात घेतली, सर्व मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले. सुसाइड नोटमुळे स्पष्ट झालं, की आधी नीतूने मुलं व सासूची हत्या केली. त्यानंतर नीतूच्या पतीने तिचा खून केला आणि पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या सुसाइड नोटमध्ये कॉन्स्टेबल नीतू कुमारीचे कोणाशी तरी विवाहबाह्य संबंध असल्याचा उल्लेख केला आहे. आता पोलीस त्याचा तपास करत आहेत. कारण या प्रकरणात आणखी काही गोष्टी समोर येऊ शकतात.
सर्वांत आधी दूधवाल्याला समजलं
 
डीआयजी विवेकानंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2015 बॅचची कॉन्स्टेबल असलेल्या नीतू कुमारीचं घर आतून बंद होतं. सकाळी दूधवाला आला; पण दार उघडलं नाही, त्यामुळे त्याने व शेजाऱ्यांनी दाराला धक्का दिला. दार उघडल्यावर घरात पाच मृतदेह होते. काहींचे गळे आवळले होते तर नीतूच्या पतीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

लव्ह मॅरेजचा भयंकर अंत

आजूबाजूच्या लोकांची चौकशी केल्यावर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. लोकांनी सांगितलं की नीतूचा पती पंकज बेरोजगार होता. घरात नीतू एकमेव कमावणारी होती. पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणं होत होती. नीतू ही मूळची बक्सरची होती. तिची बदली भागलपूरला झाली होती, त्यामुळे ती कुटुंबासोबत इथे राहत होती. नीतू व पंकज यांचं लव्ह मॅरेज होतं; पण काही काळापासून या दोघांमध्ये रोज भांडणं व्हायची. पंकजला नीतूचं अफेअर असल्याचा संशय होता; पण नीतू नकार देत होती. आता सत्य काय आहे हे पोलीस तपासातच कळेल. नीतू व पंकज यांचे मोबाइल तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.