कानात ब्लूटूथ घालून पेपर सोडवला पोलीस होण्यासाठी 6 उमेदवारांची हायटेक कॉपी
पोलीस दलातील पोलीस शिपाई चालक व बँडसमन या पदाच्या लेखी परीक्षेसाठी अलिबाग, पेणमधील सहा उमेदवारांनी हायटेक कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या उमेदवारांनी चक्क कानात ब्लूटूथ घालून पेपर सोडवला. या सहा कॉपी बहाद्दरांना बेड्या ठोकल्या आहेत.
रायगड पोलीस दलातील 391 जागांसाठी लेखी परीक्षा शनिवारी अलिबाग आणि पेणमध्ये घेण्यात आली. अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केंद्रामध्ये एक हजार 940 पुरुष व एक हजार 175 महिला तसेच पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केंद्रामध्ये एक हजार 632 पुरुष उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. या लेखी परीक्षेसाठी पुरुष तीन हजार 572 व महिला उमेदवार एक हजार 175 असे एकूण 4 हजार 747 उमेदवार उपस्थित होते. अलिबाग आणि पेणमधील परीक्षा केंद्रांवर परीक्षा चालू असताना सहाजण कानाला ब्लूटूथ लावून पेपर सोडवत असल्याचे भरारी पथकाच्या लक्षात आले. त्यांनी उमेदवारांची तपासणी केली असता सहाजणांच्या कानामध्ये ब्लूटूथ आढळले. या सहाही जणांना ताब्यात घेण्यात आले.
कॉपी रोखण्यासाठी केंद्राबाहेर हॅण्ड हेल्ड मेटल डिटेक्टरचा वापर केला होता. परीक्षा सुरळीत, शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा कडेकोठ पहारा ठेवण्यात आला होता. केंद्रामध्ये प्रवेश देण्यापूर्वी उमेदवारांची कसून तपासणी करण्यात आली होती. मात्र तरी देखील सहा उमेदवारांनी परीक्षा केंद्रात इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस नेले कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.