विधानसभा निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता :, जयंत पाटील
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता देशातील चार महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्याकडे सर्वांचेच लक्ष आहे. यामध्ये आगामी काळात महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत.
त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुका एक महिना पुढे ढकलल्या जाऊ शकतात, असे माध्यमांना सांगितले आहे.या निवडणुकांसाठी केंद्रिय निवडणूक आयोगाने तयारी देखील सुरु केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला यावर्षी सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. त्याचीही तयारी निवडणूक आयोग करत आहे. तसेच या राज्यांना 20 ऑगस्टपर्यंत मतदार यादी सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. मतदार यादी अपडेट केल्यानंतर निवडणूक आयोग चार राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यावेळी त्यांनी 9 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या शिव स्वराज्य यात्रेविषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले, शिवनेरीच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन आम्ही यात्रेला सुरुवात करणार आहोत. तसेच हा दिवस निवडण्याचा उद्देश म्हणजे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चले जाओ चळवळीचा नारा या दिवशी ऑगस्ट क्रांती मैदानातून देण्यात आला होता. तसेच त्या दिवशी जागतिक आदिवासी दिवस असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी शिव स्वराज यात्रेचा एक लोगो देखील सादर केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेला उद्यापासून सुरुवात होणार आहे.दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील इस्लामपूर येथे वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघाच्या वतीने राजारामबापू पाटील शिक्षण व उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांच्या स्नेहमेळाव्यात उपस्थित होते. तेव्हा ते कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी मला राज्यभर फिरावे लागणार आहे. त्यामुळे विरोधकांकडून लक्ष्य केले जाऊ शकते. मात्र कार्यकर्त्यांनी चिंता करण्याची गरज नसली, तरी गाफीलही राहू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.