Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कॅन्सरने गेलेले डॉ. शंतनू अभ्यंकर जेव्हा लिहितात, 'आपुले मरण पाहिले म्या डोळा.'

कॅन्सरने गेलेले डॉ. शंतनू अभ्यंकर जेव्हा लिहितात, 'आपुले मरण पाहिले म्या डोळा.'
 

त्याचं असं झालं की रोजच संध्याकाळी मला 98-99 असा ताप यायला लागला. मधूनच किरकोळ अंगदुखी वगैरे. बस्स. बाकी काही नाही. ना खोकला, ना सर्दी, ना काही. अशा परिस्थितीत एक शहाणा डॉक्टर जे करतो तेच मी केलं. परिस्थितीकडे साफ दुर्लक्ष करून आज क्रोसीन खा, उद्या कॉम्बिफ्लाम खा, असं करून काम करत राहिलो. होता होता पंधरा दिवस झाले.

रोज किंचित ताप येणार, अंग दुखणार असं चालूच राहिलं. आता थकवा जरा जास्तच जाणवू लागला. मी स्वतःला विविध तपासण्यांच्या चरकातून पिळून काढला. काहीही रसनिष्पत्ती झाली नाही. माझ्या ‘ताप स्पेशालीस्ट’ मित्राला विचारलं तर तो म्हणाला, ‘अशा परिस्थितीत तू तुझ्या पेशंटला काय देतोस?’

‘पाच दिवस अँटीबायोटिक देतो.’
‘मग तू पण तेच खा!’ असं म्हणत त्यांनी माझाच सल्ला माझ्या गळ्यात मारला. मग रीतसर अँटीबायोटिक खाणे झालं. काहीच फरक पडला नाही. मग उरलेल्या काही तपासण्यांच्या चरकात जाणे झाले. पुन्हा सगळे रिपोर्ट नॉर्मल! पण त्यात, रीकेटशीया नामे आजाराची एक धूसर शक्यता दिसून आली. मग त्याकारणे डॉक्सिसायक्लीन खाणे झाले. पण उपयोग झाला नाहीच. होता होता दीड महिना उलटला होता.

एके दिवशी सर्व शक्ती पणाला लावूनच मला ऑपरेशन उरकावी लागली आणि पुढे ओपीडी बघायला अंगात त्राणच उरला नाही. काही दिवस शांत असलेला तापही आता 100 पर्यंत चढला. आता मात्र याचा काय तो सोक्षमोक्ष लावायचाच असं ठरवून, जणू सर्वसंगपरित्याग करून, मी नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर पडलो आणि एका बड्या इस्पितळात माझ्या वर्गमित्राच्या देखरेखीखाली दाखल झालो.
त्यांनी पहिली गोष्ट काय केली तर माझ्या साऱ्या तपासण्या पुन्हा करायला लावल्या. मी त्या निमुटपणे केल्या. गावातल्या रिपोर्टवर तो भरवसा ठेऊ शकत नव्हता. ते सहाजिक होतं. गावातल्या लॅब प्रमाणीकरण झालेल्या नव्हत्या. त्यासाठी लागणारा पैसा, मनुष्यबळच तिथे नव्हतं आणि ह्याचे महात्म्य समजून त्याची किंमत देऊ करतील असे पैसेवाले पेशंटही नव्हते. भारतातला मी डॉक्टर आता इंडियात आलो होतो आणि इंडियाचे ऐकणे भागच होते.

पण इथेही तीच रड. तपासण्याही साऱ्या नॉर्मल. काही म्हणता काही दोष नाही! रिपोर्टही जैसे थे आणि तक्रारीही जैसे थे! मला मानसिक आजार तर नाही ना अशी शंका त्याला आली असणार. पण ताप तर थर्मामीटरवर दिसत होता आणि अंगदुखी, थकवा माझ्या चेहऱ्यावरच दिसत होता. पण मी, आणि आता तो ही, इरेला पेटलो होतो. दीड महिना होत आला होता. दीड महिना सौम्य ताप आणि अजूनही निदान नाही, ही आव्हानात्मक परिस्थिती होती. एका ‘ताप पेशालिस्ट’नेही तपासले.

त्याने तर, एखाद्या होमिओपथिक डॉक्टरच्या उत्साहाने, माझी तासभर मुलाखत घेतली. मी कोणता जगावेगळा ज्वर-बाधित पेशंट तपासला का? मला उंदीर, कुत्रा, पोपट, माकड असे काही प्राणी चावले होते का? गोगलगायी, ओक्टोपस असे काही अभक्ष्य भक्षण केले होते काय? सातासमुद्रापार कोणत्या सरोवरात पोहायला गेलो होतो काय? सप्तपर्वतांच्या पार कोणत्या गुहेत शिरलो होतो काय? स्वर्गातली, जळातली अथवा पाताळातली भासवी अशी कोणी अप्सरा, यक्ष वा किन्नर माझ्यावर फिदा झाल्याचे स्मरते काय????? असे त्याचे प्रश्न ऐकून मी जीएंच्या कथेतला शापित नायक आहे असं मला वाटायला लागलं.

पण सगळा नन्नाचा पाढा. आता टीबी आणि काही प्रकारचे ब्लड कॅन्सर, थायरॉयडायटीस, एंडोकारडायटीस, ऑटोइम्यून असे मातब्बर आजार असू शकत होते. मग त्या त्या तज्ञांना मला नजर करणे झाले. त्यांनी काही काही तपासण्या करणे झाले. त्यांनीही नेती नेती म्हणून झालं.

रिपोर्ट नॉर्मल आहेत याचा अर्थ; काहीही आजार नाही, आजवरचे पैसे वाया गेले, डॉक्टरनी आपल्याला उगीचच लुटले, असा विचार न करता; रिपोर्ट नॉर्मल आहेत याचा अर्थ आजवरच्या तपासण्यात न दिसणारा असा काहीतरी आजार आहे; हे आम्ही मनोमन ठरवलं. मी आणि पत्नी डॉक्टर असल्याचाही थेट फायदा झाला. अधिकाधिक तपासण्या करण्याचा, महाग असूनही त्या करायचा आम्ही आग्रह धरला. तो मानला गेला.

आपल्याला जे होतंय ते किरकोळ नाही, काहीतरी वेगळं आहे ही जाणीवही मला मनोमन होती. निव्वळ अशक्तपणामुळे, मी माझे पेशंट सोडून घरी कधीच राहिलो नव्हतो. यावेळी मात्र तसं घडलं. आणि मी या सुतावरून स्वर्गच गाठला म्हणा ना!

आता पेट-सिटी नावाची तपासणी करायची ठरली. ही एक अत्याधुनिक तपासणी. आधी मला एक किरणोत्सर्गी औषध टोचले गेले. मग बाटलीभर पाण्यातून ते पाजले गेले. काही वेळात ते शरीरभर पसरले. मग पेट-सिटी करून शरीराचे बारीक बारीक छेद घेत फोटो घेतले गेले. त्या औषधात किरणोत्सर्गी ग्लुकोज होते.

अधिक कार्यमग्न पेशी ग्लुकोज अधिक शोषून घेणार. सूज आलेले भाग, अतिजलद विभाजित होणाऱ्या पेशी (कॅन्सर) या अधिक कार्यमग्न. त्या त्या अवयवाच्या त्या त्या भागात ग्लुकोजची गर्दी होणार. किराणोत्साराद्वारे ग्लुकोज आपला नेमका ठावठिकाणा दाखवत रहाणार. नेमक्या कुठल्या अवयवातील कुठल्या पेशींमध्ये ते अधिक प्रमाणात आहे हे आता पेट-सिटी-स्कॅनमध्ये स्पष्ट दिसणार.

आणि दिसलंच ते स्पष्ट. माझी सावलीसारखी प्रतिमा आणि त्यात अंगप्रत्यंगात दिवे लागल्यासारखा दिसणारा एक रिपोर्ट माझ्या पुढ्यात आला. ‘याराना’तल्या अमिताभसारखी माझी रूपरेषा दिसत होती. पण या साऱ्याचा अर्थ फारच अशुभ होता. यानुसार, बहुतेक माझ्या फुफ्फुसामध्ये एक कॅन्सरची गाठ होती.

अगदी रायआवळ्याएवढी. त्या गाठीनी आपली सीमा केव्हाच ओलांडली होती. मानेमध्ये, उरात (mediastinum), मणक्यात, हातापायात असा सर्वत्र तो पसरला होता. दुसरीही एक शक्यता होती. लिंफोमा नावाचा एक रक्ताचा कॅन्सर असतो. पेट-सिटीवर त्याचीही दिव्यशोभा अशीच दिसते. दोन्हीपैकी कोण हे आता ठरवणे होते.

आपल्याला दीड महिना चित्रविचित्र काहीतरी होतंय म्हणजे काही ना काही दुखणं असणार, हे तर मी ओळखलं होतं. पण अशा परिस्थितीत सर्वांचे लाडके निदान म्हणजे टीबी. हे महाशय केव्हा कोणतं रूप धारण करतील काही सांगता येत नाही. काहीही शोध लागत नसेल तेंव्हा बेलाशक टीबीला बोल लावावेत असा मुळी वैद्यकीय संकेतच आहे.

त्यामुळे मणक्यात किंवा अन्य कुठेतरी सांदीकोपऱ्यात टीबी सापडेल अशी मला आशा होती आणि हाच सापडावा अशी अभिलाषा होती. असं असतं तर काही महिने औषध घेऊन हे शुक्लकाष्ठ संपले असते. रक्ताचा कॅन्सर असेल अशीही एक शक्यता होती. पण तसेच उघडपणे मी, पत्नी डॉ. रूपालीला, किंवा तीनी मला, बोलून दाखवले नव्हते. पण तशी आवश्यकता नव्हती. परस्परांच्या मनातले आम्ही सहजच ओळखू शकतो. फुफ्फुसाचा कॅन्सर मात्र कोणाच्याही ध्यानीमनीही नव्हता.

पण चित्र-संकेत तर फुफ्फुसाचा किंवा लिम्फोमा (रक्ताचा) कॅन्सर हाच होता. त्यातल्या त्यात लिम्फोमा बरा. पण आता निदान पक्के करण्यासाठी, कुठून तरी या कॅन्सरचा चिमणीच्या दातांनी तुकडा तोडायला हवा होता (biopsy). मानेतली गाठ ही त्यातला त्यात सहजप्राप्य होती. तिथला तुकडा काढून तपासायला पाठवायचं ठरलं. त्याचबरोबर रक्ताचा कॅन्सर आहे की नाही हे ठरवण्यासाठी हाडातील मगज काढायचे ठरलं. दुसऱ्या दिवशी हे दोन्ही सोपस्कार पार पडले.

भूल उतरली तेंव्हा हे ऑपरेशन करणारे दोन्ही मित्र माझ्या शेजारीच होते. त्यांचे चेहरे गंभीर होते. माझा हात हातात घेत धीर देत ते म्हणाले, ‘बॉस, इट्स नॉट लिम्फोमा. इट्स बॅड न्यूज. अॅडीनोकारसीनोमा आहे. मोस्ट प्रोबॅबली लंग. वी विल हॅव टु वेट फॉर फर्दर रिपोर्ट्स.’

लंग कॅन्सरचे निदान कळूनही मी अगदी शांत होतो. अगदी हेच जरी नाही तरी असंच काही असेल अशी शंका मला देखील होतीच. प्राप्त परिस्थितीला भिडण्याशिवाय दुसरा उपाय तरी काय होता? तो सांगत होता, ते ऑपरेशनच्या वेळेला, झटपट म्हणून केलेलं, तात्पुरतं निदान होतं. काही रिपोर्ट तीन चार दिवसांनी उपलब्ध होणार होते.

खूप सखोल आणि सविस्तर तपासण्या करणं गरजेचं होतं. त्या करायला तब्बल 15-20 दिवसाचा कालावधी लागणार होता. त्यातून कॅन्सरचा प्रकार, प्रसार आणि विखार लक्षात येणार होता. नेमके उपचार आणि यशापयशाची संभाव्यता त्यावरच ठरणार होती. हे लक्षात घेता, ‘फाय इअर सर्व्हायव्हल किती?’ हा प्रश्न मी विचारलाच नाही. फाय इअर सर्व्हायव्हल, हे कॅन्सरचे मोजमाप.

किती टक्के पेशंट पुढे पाच वा अधिक वर्ष जगतात ह्याची आकडेवारी. कॅन्सर झालेला डॉक्टर, कॅन्सरच्या डॉक्टरला विचारतो तो हा पहिला प्रश्न. मी कॅन्सर झालेला डॉक्टर होतो, माझा मित्रच कॅन्सरचा डॉक्टर होता, पण सध्या हा प्रश्नच गैरलागू होता.

प्रथमदर्शनी तरी भविष्य अंध:कारमय होतं. पण हे मला कळायच्या आत कितीतरी गोष्टी परस्पर घडून गेल्या होत्या. ह्या साऱ्या मित्रांनी जणू मला दत्तकच घेतलं होतं. साऱ्यांनी एक व्हाट्सप ग्रूप बनवला होता. त्यात मला आणि कित्येक परदेशस्थ मित्रांनाही घातलं होतं आणि अत्याधुनिक निदान आणि उपचाराची माहिती त्यात सतत उमटत होती.

‘अमेरिकेला सॅम्पल पाठवू का?’

‘नको, इंडिया इज गुड इनफ!’. अमेरिकेतला पॅथॉलॉजीस्ट मित्र.

‘मुंबईला येऊ दे का त्याला?’

‘नको, ऑनलाईन कन्सल्ट करत राहू, बोलत राहू. दॅट शुड सफाईस!’ मुंबईकर तज्ञ.

‘कोणतेही मेडिसिन लागू दे, आय कॅन अरेंज!’ औषधकंपनीतला अमेरिकन मित्र.

त्या ग्रुपवर अशा सवाल-जवाबांचा खच पडला होता. मला डोके चालवायला त्यांनी संधीच ठेवली नव्हती. मला गूगल करण्याचेही कष्ट करायची गरज उरली नाही आणि नाहीच केले मी ते कष्ट. न्हाव्याहाती डोई देऊन आपण जसे निवृत्त मनाने बसतो तसा मी त्यांच्या स्वाधीन झालो. सर्वोत्तम आणि सगळ्यात खात्रीशीर उपचार आपल्या मित्राला मिळावे म्हणून हे सारे जण जीवाचं रान करत होते. मला धीर आला.

साधारणपणे संकटसमयी मनाच्या काही ठराविक अवस्था असतात. सर्वप्रथम बातमीवरती आपला विश्वासच बसत नाही. हे खोटं आहे, हे स्वप्न आहे असं आपण स्वतःला समजावू पाहतो. माझा मात्र पूर्ण विश्वास होता कारण बातमी मला विश्वासार्ह सूत्रांकडूनच तर मिळत होती. ही वार्ता विघ्नाची माझ्यापर्यंत पोहोचवण्यापूर्वी दहा लोकांनी त्या बायोप्सीच्या स्लाईडस् दहा वेळा नजरेखालून घातल्या असणार. तेंव्हा बातमी खात्रीची होती.

मग येतो राग, वैताग, हतबलता. मग नशिबाला, वैऱ्याला, व्यवसायातील स्पर्धकांना, ग्रह-ताऱ्यांना, दैवी कोपाला, अवकृपेला, वाट्टोळ करणाऱ्या नजरेला, जादूटोण्याला बोल लावले जातात. मग त्यावर तत्सम उतारे केले जातात. ही देखील अवस्था माझ्या वाट्याला आली नाही. सुदैवाची आणि दुर्दैवाची कारणे अनैसर्गिक शक्तीत न शोधता भौतीकातच शोधणारा मी माणूस आहे. तेंव्हा गंडे, दोरे, मंत्रतंत्र, आरती, अभिषेक, अंगारे-धुपारे, उतारे, पूजापाठ, नवस-सायास वगैरे सगळे आपोआपच कटाप झाले.

अर्थात या साऱ्याला आजवर नकार दिल्यामुळेच हे दुरित माझ्या वाट्याला येऊन माझी भली खोड मोडली, आता मी वठणीवर येईन; असं वाटणाऱ्या महाभागांचे तळतळाट माझ्या आसपास होतेच. पण असलाच तो सर्वेश्वर तर तो इतक्या कोत्या मनाचा आणि डूख धरणारा नक्कीच नसणार अशी माझीच खात्री असल्यामुळे, मी त्यांना मनोमन माफ करून टाकलं. वैताग, राग वगैरे मी शांतपणे गिळून टाकले.

वैतागानंतर येते नैराश्य. बरेचदा अशी माणसं जगापासून तोडून घेतात. व्यसनांच्या आहारी जातात. पण माझ्या वाचनानी मला ह्याही अवस्थेतून वाचवलं. डॉ. सुनंदा अनिल अवचट यांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे कळले तेंव्हा त्यांची प्रतिक्रिया अगदी जगावेगळी होती. त्यांनी विचार केला, बरं झालं बाई ब्रेस्ट कॅन्सरच झाला. उगीच हार्ट ॲटकने अचानक, फटकन मरण्यापेक्षा हे बरं.

आता उरलेलं आयुष्य मला नीट प्लॅनिंग करून, माझ्या मर्जीने जगता येईल. कामाची सोय लावता येईल. काय जी निरवानिरव करायची ती करता येईल; आणि त्या धीराच्या बाई, खरंचच तसं आयुष्य जगल्या. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर होताच, आता तो आचरणात आणायचे आव्हान होते.

या साऱ्यातून पार पडतापडता स्वीकार हा पडाव येतो. मी जवळपास थेट या पायरीला पोहोचलो. ‘भावनेच्या भरात, निव्वळ आयुष्य लांबवणारे निरुपयोगी उपचार करू नका. मृत्यू शांतपणे, वेदनारहित आणि आदबशीरपणे होईल एवढे पहा. धार्मिक अंत्यसंस्कार न करता देहदान जमले तर उत्तम. कदाचित मी हे खूप लवकर लिहित असेन पण मन आणि मेंदू थाऱ्यावर असतानाच हे लिहायला हवं.

मृत्यूबद्दल आपण सहसा बोलत नाही. पण या तीन गोष्टी तरी तुम्हाला माहित हव्यातच.’ अशी एक पोस्ट मी त्याच दिवशी उत्तररात्री बायको आणि मुलांना पाठवली. मला खूप हलकं हलकं वाटलं.

पोस्ट वाचून, मला समजुतीच्या चार गोष्टी सांगायला, भल्या पहाटे सारे माझ्याभोवती गोळा झाले. माझा आश्वासक आणि शांत स्वर ऐकून वातावरण जरा निवळले. मग मृत्यूबद्दल आम्ही खूप गप्पा मारल्या. किती जगला हे महत्वाचे आहेच पण कसा जगला हे अधिक महत्वाचे आहे.

शरीराशिवाय मनाला, इच्छा-आकांक्षांना वेगळे अस्तित्व नाही. तेंव्हा आत्मा, भुते वगैरे बाता आहेत. शरीर आणि त्याचे कार्य हे अणु-रेणूंच्या काही विशिष्ठ रचनेने साध्य झालेले आहे. अशी सुघटीत रचना अनैसर्गिक आहे. थर्मोडायनामिक्सच्या दुसऱ्या नियमाविरुद्ध आहे हे! तेंव्हा मरण आणि विघटन हे निसर्गाच्या जवळ जाणे आहे. असं जरी असलं तरी अकाली मरणाने आर्थिक आणि भावनिक नुकसान मात्र अमाप होते. त्याची तयारी करायला हवी....असं आम्ही बरेच काही काही बोलत बसलो.

त्या दिवशी मुलाचा वाढदिवस होता. हॉस्पिटलमधेच आम्ही तो साजरा केला. त्याला शुभेच्छा देताना मात्र मला भडभडून आलं. आम्ही चौघांनी मनसोक्त रडून घेतलं. मुला-मुलीच्या कार्यकर्तृत्वाला आकार द्यायला, ते कौतुकायला आता मर्यादा आहे; पत्नीला नातिचरामी म्हणून दिलेले वचन आता मला पाळता येणार नाही, ही विषण्ण जाणीव साऱ्यांना व्यापून राहिली आणि अंतर्मुखही करून गेली.

या परिस्थितीतला, सगळ्यांच्या मनात उगवणारा प्रश्न म्हणजे, ‘मीच का?’, ‘हे भोग माझ्याच वाट्याला का आले?’, ‘मी असं कुणाचं काय वाईट केलंय?’. पण हा प्रश्नच फिजूल असल्याची माझी वैचारिक बैठक असल्याने हाही प्रश्न मला पडला नाही. जगात भल्या लोकांचं भलं होतं आणि वाईटांचे ताबडतोब वाईट होऊन फिट्टंफाट केली जाते, असा दैवी न्याय अस्तित्वात नाही.

नाहीतर पोलीस आणि न्यायालये कशाला लागली असती? आपल्या आजाराची कारणे, आपण स्वतः, आजाराचे कारक घटक आणि परिसरातील कारक घटक (Agent, Host and Environment) यामध्ये शोधायची असतात ही तर आधुनिक वैद्यकीची प्राथमिक बैठक.

हा कॅन्सर काही कोण्या जंतूंमुळे होत नाही आणि कॅन्सर होण्याएवढ्या बिड्याही मी ओढल्या नाहीत. अन्यही व्यसन, डायबेटीस, ब्लडप्रेशर वगैरे मला नाही. कॅन्सरचा प्रसाद मिळावा अशा वातावरणातही मी कधी नव्हतो. तरीही मला कॅन्सर झाला याचं कारण स्पष्टच आहे. हे सगळे करूनही कॅन्सर न होणारे काही लोक आहेत, तसेच एकही व्यसन न करता कॅन्सर होणारे काही आहेत.

त्यातला मी. व्यसन आणि कॅन्सर यांचे नातं निव्वळ संख्याशास्त्रीय शक्यता दर्शवणारे आहे. इतकं साधं, गंगौघासारखं नितळ एक्सप्लेनेशन उपलब्ध असतात पापाची टोचणी आणि पुण्याची मोजणी हवीच कशाला?

राहता राहिले माझ्याच जनुकीय कुंडलीतील काही वक्री ग्रह. यांनी माझ्याच पेशींमध्ये ‘दुराचार करा’ असे संदेश पेरले असणार. या दुराचारी पेशींना वेळीच अटकाव करणे शक्य झालं नसणार, परिणामी या पेशी वाढत जाऊन आतून माझे शरीर पोखरत होत्या. ‘मीच का?’, हा प्रश्न विचारून हाती फारसं काही लागणार नव्हतं. पण या वाममार्गी पेशींची जनकीय कुंडली मांडून नेमके उपचार करता येतील अशी एक शक्यता होती.

माझा मित्र मला तेच सुचवत होता. नव्या तंत्रज्ञानाने, काढलेल्या तुकड्यावर जनुकीय तपासण्या  शक्य होत्या. त्यानुसार त्या पेशींत नेमके कोणते जनुकीय दोष आहेत हे समजणार होते. यातल्या काही दोषांवर नेमकी, दोषहारक औषधे उपलब्ध होती.

ती इतकी नेमकी आणि लक्ष्यभेदी होती की इतर पेशींना ती जराही दुखापत करत नाहीत. त्यामुळे त्यांचे साईडइफेक्ट जवळपास नाहीतच. कधी कधी फक्त एका गोळीवर काम भागतं, पण ही रोज आणि आयुष्यभर घ्यावी लागते. नव्या औषधांच्या वरदहस्ताने पेशंट पुन्हा पूर्ववत आयुष्य जगू शकतो.

पण हा रिपोर्ट यायला तीन आठवडे लागणार. माझ्या बारीक तापामागे आणि अंगदुखीमागे हा अंगभर पसरलेला कर्करोग हे कारण होतं तर. पण तोवर काही विशेष न होणाऱ्या मला, त्याच रात्री कर्करोगाचा पहिला फटका बसला. प्रचंड पाठदुखी सुरु झाली. मणक्यात पसरलेल्या कॅन्सरचा हा प्रताप. ह्या प्राणांतिक वेदनेचे वर्णन पुस्तकांत वाचून ठाऊक होते पण अनुभव पहिलाच.

काही केल्या माझी तळमळ कमी होईना. पाठोपाठ चार प्रकारची औषधे झाली. शेवटी मॉर्फीनची मात्रा लागू पडली. मित्र म्हणाला तुला एवढा त्रास होतोय तर आपण कॅन्सरविरोधी नेहमीची केमोथेरपी चालू करू. नेमका रिपोर्ट आल्यावर नेमकी औषधे सुरू करता येतील. अर्थात मी त्याला राजी झालो आणि केमोथेरपीचा पहिला डोस प्राप्त करता झालो. त्या दिव्यातून पार पडताच मला बरेच बरे वाटू लागले. ताप गेला, अंगदुखीने अंग काढून घेतले आणि बायकोने माझ्या खाण्यापिण्याचा ताबा घेतला.

अगदी, ‘इथे इथे बैस रे मोरा, चारा खा, पाणी पी’, या चालीवर तिनी सेवा सुरु केली. त्या हॉस्पिटलमध्ये माझे बरेच डॉक्टर मित्रमैत्रिणी कार्यरत होते. मग त्यांच्या भेटी सुरु झाल्या. चमचमीत डब्यांबरोबर, खुसखुशीत गप्पाटप्पा आणि खळाळत्या हास्यविनोदानी खोली दुमदुमून गेली. मित्र, मैत्र आणि विनोद या इतका उत्तम इमयूनो बूस्टर दुसरा कुठला नसेल. लवकरच मी ‘पडू आजारी, मौज असे ही भारी’ अशा अवस्थेला पोहोचलो.

तिकडे गावाकडे वेगळेच रामायण चालू होतं. एक चालताबोलता, हिंडताफिरता, धडधाकट डॉक्टर अचानक अंतर्धान पावला म्हटल्यावर; बडे हॉस्पिटल, महागड्या तपासण्या, कॅन्सर अशा अर्धवट माहितीवरून अनेकांनी मला मृत्यूच्या दारात नेऊन ठेवले, शेवटचे आचके द्यायला लावले, मग त्याच्या दाढेतून मला मागे खेचले आणि मला उपचारासाठी अमेरिकेला पोहोचवले.

अर्थात चुकीच्या माहितीवर सगळ्यात उत्तम उतारा म्हणजे बरोबर माहिती देणे. मित्रांच्या ग्रुपवर मी सत्य परिस्थिती कथन करणारी एक छोटीशी पोस्ट टाकली आणि गोकुळवासियांचे शांतवन झाले!

कॅन्सर म्हटलं की आता हा माणूस मरणार हे लोकांच्या मनात आहे. खरंतर वैज्ञानिक प्रगतीमुळे पूर्वीपेक्षा आज परिस्थिती खूपच सुधारली आहे. माणसं थोडं अधिक आणि थोडं अधिक अर्थपूर्ण आयुष्य जगतात आणि मग मरतात. म्हणूनच कॅन्सरचे निदान लपवावे असं मला कधीच वाटलं नाही. उलट माझ्यातला लोक-शिक्षक जागा झाला.

कॅन्सर जनजागृतीची ही संधी आहे असं मला वाटायला लागलं. आजकाल नटनट्या नाही का, आपल्याला डिप्रेशन आल्याचं उजळ माथ्याने सांगत फिरतात; तसंच हे.

ह्याच दरम्यान एकदा, सोनोग्राफीच्या दारात उभा होतो. माझा नंबर यायचा होता. इतक्यात एक्स-रे विभागातून आमचे गाववाले दादा लंगडत बाहेर येताना दिसले. मला पहाताच ते आश्चर्यचकित झाले. त्यांना माझ्या आजाराबद्दल सुतराम कल्पना नव्हती.

‘काय झालं दादा?’, त्यांचा प्लास्टर मधील पाय पाहून मी विचारलं. त्यांना काय झालं ते मला सहजच दिसत होतं; मला काय झालंय हे मात्र त्यांना दिसणे शक्यच नव्हतं.

‘फ्रॅक्चर झालं होतं, आता बरंय. पण तुम्हाला काय झालंय?’

‘मला ना, फुफ्फुसाचा कॅन्सर झालाय!’ स्पष्ट, खणखणीत आवाजात मी थेटपणे सांगून टाकले. माझ्यातला लोकशिक्षक जागृत झाल्याचा हा परिणाम. दादांना जबरदस्त धक्का बसला. कसंबसं त्यांनी स्वतःला सावरलं. नसतं सावरलं तर तिथेच कोसळून त्यांचा दुसरा पायही मोडला असता! त्यांचा चेहरा अगदी कसानुसा झाला.

हा प्रश्न आपण विचारला हेच आपलंच चुकलं असा अपराधी भाव दाटून आला. धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरं, असं त्यांना वाटून गेलं असणार. त्यांना काही बोलवेना. मला शुभेच्छा पुटपुटत गडबडीने त्यांनी काढता पाय घेतला. मी मात्र लोकशिक्षणातला एक महत्वाचा धडा शिकलो. समोरच्याच्या मानसिकतेचा विचार न करता दिलेले शिक्षण धक्कादायक आणि धोकादायक ठरू शकतं.

मग समाचारे मंडळींचा आणि फोनचा ओघ सुरु झाला. हे बहुतेक सगळे पत्नी डॉ.रुपालीने झेलले. मला केमोथेरपीचा त्रास झाल्यामुळे, मी बोलण्याच्या परिस्थितीत नव्हतो, डॉ. रुपाली मला फोनवर बोलू देण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि माझ्याशी थेट बोलण्याच्या मनस्थितीत फोन करणारे नव्हते. माझी, तिची आणि आजाराची चौकशी झाली की काही लोकं मुद्द्यावर यायचे. प्रेमाचे सल्ले द्यायचे.

किवी, नोनी, ड्रॅगन फ्रूट अशी फिरंगी फळं; गव्हांकुर, दुर्वांकुर, सेंद्रिय गूळ अशी खूळं; हळद, जिरे, मिरे असे पंचपाळ्यातले अतिपरिचित; ब्रोकोली, आक्रोड, केशर असे भारदस्त जिन्नस; या साऱ्याची आलटून पालटून शिफारस झाली. हिमालयातले चमत्कार करणारे अनेक बाबा, बुवा, साधू, तांत्रिक, मांत्रिक यांचे जादुई आणि चमत्कारिक किस्से झाले. झेन, विपश्यना, योग, ट्रान्स्केनडेंटल मेडीटेशन, मंत्रोच्चार, रेकी, ताई ची, हिप्नोटीझम अशा अनंत प्रकारच्या शांतीविद्या झाल्या.

‘तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात डॉक्टर, तुमच्या विल पॉवरनेच तुम्ही यातून बाहेर याल. बास, आपण फक्त पॉजीटीव रहायचं, ट्रेस घ्यायचा नाय आणि पॉजीटीव तर तुम्ही हायेच’; हेही झालं. इतकी वर्ष रुग्ण सेवेचे पुण्यप्रद काम केल्यामुळे तुम्ही यातून तरुन जाणार, अशीही खात्री देणारे होते. मित्र-नातेवाईक परस्परच जप, अभिषेक, ध्यानधारणा, अनुष्ठाने, ज्योतिषी, शांत, अभिषेक वगैरे करत होते. मला प्रसाद, अंगारे, गंडे पोहोचवत होते. त्यांचे प्रेम आणि आपुलकी पाहून माझे डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते, वहात होते, वहात होते वहात होते... रितेच होत नव्हते!

आपुलकीचा हा गहिवर पाहून एकदा मलाच गहिवरून आलं, वाटलं, आत्ता आपण पटकन मरून गेलो तर बरं, निदान लोकं आपल्याबद्दल बरं बोलत आहेत तवर मेलेलं उत्तम. एवढ्या प्रेमादराने, कळवळ्याने, माणसे येत होती, भेटत होती, धीर देत होती, सहानुभूती दाखवत होती, मदत देऊ करत होती, तऱ्हेतऱ्हेचे आग्रह धरत होती.

डॉ. रुपाली ऐकत होती. बोलणाऱ्याच्या भावना सच्च्या होत्या. त्यांचा अनमान तर कल्पनेतही अशक्य. त्यामुळे श्रवणभक्ती एवढाच मार्ग होता. तेवढं ती भक्तिभावाने करत होती. मी मुळात तर्कनिष्ठ, विज्ञाननिष्ठ वगैरे म्हणून मी बदनाम असल्याने माझ्या वाटेला फारसे कोणी जात नव्हते. माझ्या मूल्य-विवेकाशी इमान राखून त्यांच्या सच्च्या भावनांचा यथायोग्य आदर राखणे भागच होते

आपले कोण कोण परिचित कॅन्सरवर मात करत कसे कसे तगून आहेत, ह्याच्या स्टोऱ्या लोकं आळवत होती. मी आणि ते, माझा आजार आणि त्यांचा आजार, माझी अवस्था आणि त्यांची अवस्था यांची तुलना अशक्य आणि अनाठायी आहे हे मला स्पष्ट दिसत असे.

पण हे सारं सांगणारी लोकं तर दिलासा शोधत होती. माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठीसुद्धा! ही जाणीव झाली आणि मी सह-अनुभूती घेऊ लागलो.

अमक्याला दाखवा तमक्याला दाखवा असेही आग्रह होते. चेन्नईच्या डॉक्टर मित्रानी तर वेगळाच मुद्दा मांडला. त्याचे म्हणणे, ‘तिथे सगळे तुझे मित्र आहेत आणि हाच प्रॉब्लेम आहे. तू सरळ चेन्नईला ये!’ त्याचे म्हणणे थोडेफार खरेच होते. कोणी फार ओळखीचा, जवळचा किंवा व्हीआयपी पेशंट असला की उलट डॉक्टर भांबावून जातात आणि चुका होतात.

ह्याला डॉक्टरांच्या भाषेत ‘व्हीआयपी सिंड्रोम’ असा समर्पक शब्दही आहे. मग टाटा मेमोरिअल (मुंबई), चेन्नई (तामिळनाडू), मेमोरिअल स्लोन(अमेरिका) अशी त्रिस्थळी यात्रा ऑनलाईन पार पडली. तीनही ठिकाणी ओळखीपाळखी निघाल्या. मग अगदी व्हीआयपी वागणूक मिळाली. मग त्या ‘व्हीआयपी सिंड्रोम’च काय झाले कुणास ठाऊक!

पण आश्चर्याची आणि दिलासादायक गोष्ट अशी की साऱ्यांचे जवळपास एकमत होते. यालाही कारण होते. बऱ्याच आजारांच्या निदान आणि उपचारांचे आता गणिती फॉर्म्युले तयार आहेत. थोड्याफार फरकाने हेच जगभर वापरले जातात. उलट टाटा मेमोरिअलने प्रसृत केलेली मार्गदर्शिका वापरा, भारतीय पेशंटचा अभ्यास करून असल्याने तीच लागू आहे असं अमेरिकेतील डॉक्टरनी सांगितलं! या साऱ्या सल्यांतील सुसंगतीमागे आणखीही एक कारण आहे.

मी ठिकठिकाणी जाऊन अमृत शोधत नव्हतो! माझ्या अपेक्षा रास्त होत्या. स्वस्त, मस्त, निर्धोक आणि रामबाण इलाज नाही हे स्पष्टच होतं. उपचारांना मर्यादा असणार हे मला मान्य होते. प्राप्त परिस्थितीत उत्तम काय एवढाच माझा वस्तुनिष्ठ प्रश्न होता आणि त्याचे उत्तर सगळीकडे सारखेच होतं. जगभरचा डाटा आता सतत एकत्र केला जातो, सतत तपासला जातो आणि त्यातून जगभरची मंडळी सतत शिकत, बदलत असतात. त्यामुळे असे होणारच.

पण बाजारात अमृत खरेदी करायला जाणारे बरेच असतात. गिऱ्हाईक आहे म्हटल्यावर विक्रेते भेटणारच. मग अमृताचे लेबल लावून कोणी पाणी विकतो, कोणी लोणी विकतो, कोणी आणखी काही.

ऐन उमेदीतल्या मला असं काही होईल ह्याचा धक्का जबरदस्त होता. साऱ्यांनाच. माझा एक डॉक्टर मित्र, मी ॲडमिट होतो त्याच हॉस्पिटलमध्ये काम करत होता. त्याच्या हातात चुकून माझी फाईल पडली आणि स्कॅनभर साकळलेली ती मृत्यूछाया त्याला पुरती गारद करून गेली. ह्या धक्क्यातून सावरायला त्याला अर्धा तास लागला.

मग जीवाचा धडा करून तो माझ्या खोलीत आला आणि मला पहाताच त्याला गदगदून आलं. त्याला सावरण्यासाठी मलाच उभे रहावे लागले. अशी अवस्था अनेकांची झाली. मग थेट माझ्याऐवजी माझ्या पत्नीला फोन, कॉमन मित्राला फोन, नुसताच मेसेज अशा सुसह्य वाटा अनेक सुहृदांनी चोखाळल्या


‘सॉरी तुला फोन करायचं मनच झालं नाही.’ मित्र.

‘इट्स ओक, आय नो, इट्स नॉट बिकॉज ऑफ लॅक ऑफ कन्सर्न, बट करेज!’ मी.

‘अरे एवढ्यातल्या एवढ्यात कॅन्सर झालेला तू तिसरा डॉक्टर मित्र!’

‘काय?’

‘हो न. एकाचा कोव्हिडसाठी सिटी केला, त्यात चेस्ट क्लीअर आली पण ॲब्डोमेनमध्ये सस्पिशिअस शॅडो दिसली. परत ॲब्डोमिनल सिटी केला तर सिए पॅन्क्रिआज (स्वादुपिंडाचा कॅन्सर)! दुसरा सर्जन मित्र. त्याची बायको रेडीओलोजिस्ट. त्याच्या अनेस्थेटिस्टच्या पोटात दुखत होतं. म्हणून हा बरोबर गेला. तिनी युएसजी केली. अनेस्थेटिस्टला काहीही निघालं नाही.

मग ही सहजच नवऱ्याला म्हणाली, झोप, तुलाही बघते. आणि पाहते तो काय, त्याच्या पोटात लीम्फोमाचे हे एवढाल्ले मासेस!! या दोघांनाही, शंका घ्यावी, असे एकही लक्षण नाही. अगदी निर्मळ आणि नॉर्मल आयुष्य निःशंकपणे जगणारे. या दोन्ही अनुभवांनी मी तर हादरून गेलो. आणि आता तुझं कळलं. फोन करायची हिम्मत आणु कुठून?’

तो हे सांगत होता आणि प्रतिमा विज्ञानातल्या अफाट प्रगतीचा अचंबा माझ्यात दाटून आला होता. तीस वर्षापूर्वी मी कॉलेज शिकलो, तेंव्हा एक्सरे हे आजोबा झाले होते. सोनोग्राफी हे नवजात आणि कौतुकाचे बाळ होते. बाकी सिटी, एमआरआय, पेट, पेट-सिटी हे सारे क्षितिजावरचे मिणमिणते तारे होते. आज हे तारे मध्यान्हीच्या सूर्यासारखे तळपत आहेत.

ह्यांच्याच उजेडात शरीर-सृष्टीचे अदृष्य कोपरे उजळले जात आहेत. शरीर न खोलता (मुतारीतल्या जाहिरातीच्या भाषेत, विना चिरफाड) बरेच काही दृष्यमान होत आहे. हे प्रकार नसते तर मी आणि माझ्या मित्राचे ते दोन्ही मित्र अजून कितीतरी महिने निश्चित निदानापासून वंचित राहिलो असतो.

पूर्वी होऊन गेलेल्या कोव्हिडचा, किंवा डेंग्यूचा हा दूरस्थ प्रताप असावा अशी अटकळ बांधली गेली असती. काही दिवस वाट पाहू आपोआप त्रास कमी होईल, असा सल्ला मिळाला असता. मी जरा जास्तच ‘करतोय’ असं समजून चार वेदनाशामक आणि चार नैराश्यरोधक गोळ्याही तावातावाने खरडल्या गेल्या असत्या. मीच डॉक्टर असल्याने ही मखलाशी चालणार नाही हे ओळखून मंडळी खट्टूही झाली असती... आणि नाहीच काही फरक म्हणताच माझ्या कोणत्या ना कोणत्यातरी मित्राने मला टीबीची औषधे देऊन तीन-चार आठवडे उगी रहायला सांगीतलेच असते.

बरं वाटलं तर टीबी, नाही तर दुसरं काहीतरी. बुडला तर बेडूक उडला तर पक्षी, हाच खाक्या होता. अन्य पर्यायही नव्हता. खोकला, दम, बेडका, बेड्क्यात रक्त, छातीत पाणी असं काही नसताना कोण कशाला लंग कॅन्सरची शंका घेईल? आधुनिक तपासण्या नव्हत्या तेंव्हा हाच तर वैद्य-धर्म होता. आणि सारेच तो पाळत होते.

यथावकाश तो जनुकीय चाचण्यांचा रिपोर्ट आला. त्या नाठाळ पेशीमध्ये एक दुर्मिळ म्युटेशन झाले होते. पण ह्यासाठी उपचार उपलब्ध होते. अलेक्टीनिब, लोर्लाटिनिब अशी अगदी अपरिचित औषधांची नावे आता माझ्या जिभेवर रुळू लागली. पण या साऱ्याच्या किमती ऐकून माझी पाचावर धारण बसली. ‘कमवा आणि जगा’ योजनेशिवाय मला पर्याय नव्हता.

भावनेच्या आहारी जाऊन महागडे उपचार घेणे, अमुक एक गोष्ट करणे म्हणजेच आपण सर्व प्रयत्न केले असा भ्रम बाळगणे, या नेहमीच्या चुका आहेत. या मला टाळायच्याच होत्या. आपल्या प्रियजनांचे देखील काही एक मूल्य असतं आणि त्यानुसारच त्या प्रिय व्यक्तीवर खर्च करायला हवा, हे तत्व मला मान्य होते. आजार आणि विशेषतः मरणासन्न आजार बरीच किंमत वसूल करत असतो; मानसिक, शारीरिक, भावनिक आणि आर्थिक.

काहीही निष्पन्न होणार नाही हे माहित असूनही केलेला खर्च हा अंतिमतः त्या कुटुंबाचा आर्थिक बट्ट्याबोळ घडवून आणतो. म्हणूनच काय करायचं, काय नाही आणि कुठे थांबायचं याचा सारासार विचार मात्र सुरुवातीपासून केलेला असायला हवा. असा विचार करायचा मला पूर्वानुभव नव्हता. म्हणून मुद्दाम एकदा एका परिहार-वैद्यकीतील तज्ञ डॉक्टर मॅडमना भेटलो.

उपचार संपले आहेत, आता मरणोन्मुख अवस्था तेवढी आहे. चित्तात घालमेल आहे, पेशंटच्या आणि नातेवाईकांच्याही. पैसा, मनुष्यबळ, नातेसंबंध अशा साऱ्याच आघाड्यांवर युध्द पेटले आहे आणि सारीकडे वाताहात तेवढी दिसते आहे. अशा अवस्थेतल्या पेशंट आणि कुटुंबियांना सहाय्य करण्याचेही एक शास्त्र आहे.

खरी, प्रमाणिक आशा जागवण्याचेही शास्त्र आहे. पॅलिएटीव्ह मेडिसिन. परिहार-वैद्यक. त्यांच्या याच विषयावरील एका उत्तम पुस्तकाच्या निमित्तानी त्यांचा परिचय झाला होता. पण प्रत्यक्ष भेट झाली ती अशा विचित्र परिस्थितीत. मी सध्यातरी मरणोन्मुख नव्हतो पण आधीच त्यांच्याशी बोलावं असं वाटलं.

त्यांच्या पुढ्यात मी काही थेट प्रश्न ठेवले.

‘इथून पुढे फाय इयर सर्व्हायव्हल किती आहे?’

हा त्यांच्या प्रांतातला प्रश्न नव्हताच तेंव्हा, ‘तुमच्या डॉक्टरनी काय सांगितले आहे?’ हा अपेक्षित प्रतिप्रश्न आला.

‘50%’ मी.

‘मग तेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर.’

‘म्हणजे निम्मे रुग्ण पाच वर्षाच्या आतच आटोपतात!’

‘हो.’, मॅडम थेट आणि नेमके बोलत होत्या. ते मला पटत तर होतच पण आवडतही होतं. उगीच गुळमुळीत चर्चेला काही अर्थ नाही. औषधे १००% खात्रीची नाहीत. औषधे घेऊनही आजार पुन्हा डोके वर काढतोच, फक्त कधी हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नाही. तेंव्हा आला दिवस साजरा करायचा हेच धोरण रास्त.

‘महिन्याला लाखो रुपये खर्च करून काय साधणार आहे? माझे उपयुक्तता मूल्य किती? ते कसे काढायचे? माझ्यावर इतका खर्च म्हणजे माझ्या कुटुंबियांसाठीचा वाटा मी हिरावून घेतोय! अंतिमतः अपेशी उपचारांवर इतका खर्च करण्यापेक्षा न करणे आणि परिस्थितीचा स्वीकार अधिक उत्तम.’

‘अगदी बरोबर. पण जेंव्हा हे उपचार अपेशी ठरतील तेंव्हा. सध्यातरी या औषधांनी तुम्ही पूर्ववत कार्यशील होऊ शकाल असं दिसतंय. अर्थात पुढे ही परिस्थिती बदलेल, उपचार निरुपयोगी ठरतील, तेंव्हा याचा पुनर्विचार करता येईल. आत्ता तुम्ही उपचार घ्याच!’

मला कॉलेजमध्ये शिकवलेली आरोग्याची व्याख्या आठवली. जो माणूस सामाजिक किंवा आर्थिकदृष्ट्या उत्पादक काम करू शकतो, तो निरोगी! सध्या तरी मी या व्याख्येत बसत होतो. जोवर या व्याख्येत आहे तोवर उपचार, तद्नंतर बंद; अशी मी मनाशी खुणगाठ बांधली. या दरम्यानची सारी मानसिक स्थित्यंतरे, आंदोलने, त्यातल्या यशापयशासकट यथातथ्य कागदावर उतरवायची अशीही खुणगाठ बांधली.

अर्थात मनाशी ठरवणे आणि आचरणात आणणे यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. हे अंतर लंघून जाण्याची क्षमता माझ्यात वसो आणि या प्रामाणिक, पारदर्शी, जमाखर्चाला अखेरपर्यंत लिहिता हात लाभो एवढीच आकांक्षा. आपुल्या मरणाचा सोहळा, याची डोळा पहाता आलाच तर तो अनुपम्य करण्याचा हाच तर मार्ग आहे.

( पूर्वप्रसिद्धी - अनुभव, ऑक्टो-नोव्हेंबर दिवाळी अंक 2022)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.