मुंबई : बदलापूरच्या घटनेनंतर शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांसाठी खबरदारीच्या उपाययोजना जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील पालिका शिक्षण विभागानेदेखील सर्व शाळांना मार्गदर्शक सूचना दिल्या असून विद्यार्थी आणि पालकांच्या समुपदेशनाचे निर्देश दिले आहेत.
यासाठी पालिकेच्या शाळांसोबत तीन स्वयंसेवी संस्था काम करत असून त्या संस्था विद्यार्थ्यांना समुपदेशनाचे धडे देत आहेत. याशिवाय शाळांनी पालक सभांचे आयोजन करून पालकांचेही त्यांच्यामार्फत समुपदेशन करावे, अशा सूचना शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत.
बदलापूर घटनेनंतर शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालक व विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करून शाळेतील सुरक्षितता निश्चित करण्यासाठी पालिका शिक्षण विभागाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. यात पालिका शाळांच्या ११३ इमारतींमध्ये जवळपास ५ हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्यासाठीची निविदा तातडीने मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याशिवाय शाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या तक्रार पेट्यांचा तातडीने आढावा घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हाऊसकिपिंगसाठी महिला-
१) पालिका शाळांमध्ये हाऊसकिपिंगचा स्टाफ बहुतांशी महिलाच आहे.पालिका शाळांत २४ तास मदतनीस-
२) शाळेतील प्रवेशापासून ते बाहेर पडेपर्यंत विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली असतील याची खबरदारी शाळेने घ्यावी.
३) पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टचचे धडे देण्यासाठीही समुपदेशन केले जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
१) सर्व पालिका शाळांमध्ये संपूर्ण २४ तासांसाठी अटेंडंट नियुक्त करण्यात आले आहेत.
२) शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची तोडफोड, शाळांमधील संगणक, महागडे फर्निचर यासारख्या वस्तूंची चोरी आणि वैयक्तिक हल्ले रोखण्यासाठी तसेच समाजकंटकांपासून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्याकडून लक्ष ठेवले जात आहे. शाळेच्या प्रवेशद्वाराचे संपूर्ण नियंत्रण या अटेंडंटकडे देण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.