संजय राऊत यांच्याबद्दलच्या ' त्या' वक्तव्यामुळे नितेश राणेच्या अडचणीत वाढ, अजामीनपात्र वॉरंट जारी
भाजप आमदार नितेश राणेंसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईतल्या माझगाव कोर्टाने नितेश राणे यांना मोठा धक्का दिला आहे. खासदार संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता. या प्रकरणात कोर्टाने त्यांना अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी नितेश राणेंना 17 ऑक्टोबर रोजी न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे.
अब्रुनुकसानीच्या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी कोर्टात काय घडलं ?
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते आणि खासदार संजय राऊत त्यांनी त्यांचे वकील मनोज पिंगळे यांच्यामार्फत कोर्टात केस दाखल केली आहे. राऊत यांनी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या अब्रुनुकसानीच्या प्रकरणामुळे आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी पार पडली. मात्र या सुनावणीला नितेश राणे हजर नव्हते. त्यांच्या वकिलांनी हजेरीतून सूट देण्याची मागणी केली.
प्रकरणाच्या सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहणाऱ्या नितेश राणे यांना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी हजेरीतून सुट देण्यास नकार दिला. तसेच त्यांनी नितेश राणे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावल्याची माहिती मिळाली आहे. याआधीदेखील नितेश राणे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. मात्र नितेश राणे या केसच्या बाबतीत गांभीर्याने वागत नसल्याचे कोर्टाने नमूद केले. तसेच याविषयी नाराजी व्यक्त केली. दरम्यान अब्रुनुकसानीच्या प्रकरणात अटक होऊ नये यासाठी नितेश राणेंना 17 ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहावे लागेल. आता या प्रकरणाच्या 17 ऑक्टोबरच्या सुनावणीत कोर्ट काय निर्देश देणार, हे पाहावे लागेल .
नितेश राणेंचे राऊत यांच्यासंदर्भातील वादग्रस्त विधान
नारायण राणेंचे पुत्र असलेले नितेश राणे अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत येतात. त्यांनी एकदा खासदार संजय राऊत यांचा उल्लेख साप असा केला होता. संजय राऊत म्हणजे असा साप आहे जो एका महिन्याच्या आत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील होईल. राणेंच्या या वादग्रस्त वक्तव्यांनंतर संजय राऊत यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये धाव घेतली. तसेच नितेश राणेविरोधात कारवाईची मागणी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.