सांगलीत पुन्हा गोवा बनावटीची दारू पकडली, दोघांना अटक ६.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त जुनी धामणीजवळ एक्साईजची कारवाई
जिल्ह्यातील सोलापूर एक्सप्रेस वेवर जुनी धामणी (ता. मिरज) येथे कारमधून गोवा बनावटीच्या विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तस्करीसाठी वापरलेली कार, विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या असा ६.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने गेल्या आठ दिवसात दुसऱ्यांदा गौवा बनावटीची दारू पकडल्याची माहिती उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली.
निखील अनिलकुमार तोडकर (वय २८, रा. बुधवार पेठ, माधवनगर), प्रविण सदाशिव चंदप्पागोल (वय २३, रा. मावनूर हक्केरी, जि. बेळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यातील गोवा बनावटीच्या दारूची तस्करी आणि त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना अधीक्षक पोटे यांनी पथकाचे निरीक्षक राजकुमार खंडागळे यांना दिल्या आहेत. शनिवारी सोलापूर एक्सप्रेस वेवरून एका कारमधून गोवा बनाटीच्या दारूची तस्करी होणार असल्याची माहिती अधीक्षक पोटे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.
पथकाने जुनी धामणीजवळील रेल्वे ओव्हर ब्रिजजवळ सापळा रचला होता. मिळालेल्या माहिती प्रमाणे कार (एमएच ०७ एबी ४५०९) तेथे आल्यानंतर पथकाने ती थांबवली. कारची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये गोवा बनावटीच्या विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या आणि त्यांचे बॉक्स सापडले. त्यानंतर कारसह दारू जप्त करून दोघांनाही अटक करण्यात आली. दोघांनाही दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाने भरारी पथकाचे निरीक्षक राजकुमार खंडागळे, विनायक जगताप, अजितकुमार नायकुडे, युवराज कांबळे, सुवास पोळ, रमेश चंदूरे, स्वप्नील कांबळे, वसंत घुगरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.