Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरद पवारांना कोण मारणार? कोणापासून त्यांना धोका? केंद्राची झेड प्लस सुरक्षा दिल्यानंतर भाजप नेत्यांचा खोचक सवाल

शरद पवारांना कोण मारणार? कोणापासून त्यांना धोका? केंद्राची झेड प्लस सुरक्षा दिल्यानंतर भाजप नेत्यांचा खोचक सवाल
 
 
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आता केंद्राकडून झेड प्लस सुरक्षा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सध्या राज्याची झेड प्लस सुरक्षा शरद पवार यांना आहे. मात्र केंद्राची देखील झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. दरम्यान शरद पवारांच्या सुरक्षा वाढीवर भाजप नेते निलेश राणेंनी टीका केली आहे.

शरद पवारांच्या सुरक्षा वाढीवर भाजप नेते निलेश राणे म्हणाले, मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कोणापासून त्यांना धोका आहे?? हेच कळत नाही अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांवर शाब्दिक प्रहार केला आहे. त्यांनी याबाबतची पोस्ट आपल्या सोशल मिडियावरती केली आहे.


निलेश राणे काय म्हणालेत आपल्या पोस्टमध्ये?


शरद पवारांना झेड प्लस सिक्युरिटी मिळाली आहे, 55 CRPF त्यांना संरक्षण देणार. मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कोणापासून त्यांना धोका आहे?? बातमी वाचली आणि वाटलं की 50 वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही झेड प्लस संरक्षण मिळतं की काय??, अशा पोस्ट निलेश राणे यांनी आपल्या सोशल मिडियावरती केली आहे.  

शरद पवारांना केंद्राची अतिरिक्त सुरक्षा

शरद पवारांना केंद्राची अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे. आजपासून सीआरपीएफचे दहा जवान शरद पवारांसोबत असणार आहेत. नुकताच शरद पवारांसोबत सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांना सुरक्षेचा आढावा घेतला आणि त्यानंतर शरद पवारांना सुरक्षा प्रदान करण्याचे निश्चित करण्यात आलं आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

शरद पवारांच्या  घरी अनेक बैठका आणि भेटीगाठी होत असतात. रोज अनेक नागरिक किंवा कामकाजासाठी नेतेमंडळी त्यांना भेटण्यासाठी येत असतात. मात्र बदलापूर प्रकरणानंतर सध्या राज्यातील वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्याची शक्यता

शरद पवार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दौरे करणार आहेत. शरद पवार काही महिन्यांपूर्वी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी गेले होते. त्यावेळी रस्त्यात काही आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. आगामी काळात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी केंद्राकडून झेड प्लस सुरक्षा दिली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.