अचानक मागे आलेल्या एसटीच्या धडकेत फार्मसीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत; अपघातात वडिलांचा पाय फ्रॅक्चर
महाविद्यालयामध्ये बी. फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी संजना व तेथेच लिपिक म्हणून नोकरीला असणारे तिचे वडील आनंद मोटारसायकल (एमएच ०९, ईएन ७५९८) वरून महाविद्यालयाकडे जात होते.
गडहिंग्लज : उतारावर गिअर टाकताना अचानक मागे आलेल्या एसटी बसच्या धडकेत मोटारसायकलवरील तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
संजना आनंदा हुदली (२१, रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) असे तिचे नाव आहे. तिचे वडील आनंदा कलाप्पा हुदली (४७) जखमी झाले. गडहिंग्लज-हलकर्णी मार्गावरील भडगावपैकी बेरडवाडी चढावाच्या वळणावर काल सकाळी दहाच्या सुमारास अपघात झाला.
दरम्यान, एसटीच्या चुकीमुळे अपघात घडल्याचा आरोप करीत आक्रमक झालेले ग्रामस्थ एसटी आगारावर चाल करून गेले. एसटीचे डीटीओ संतोष बोगरे यांना नागरिकांनी धारेवर धरले. याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी : हसूरवाडी रस्त्यावरील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी आगाराची स्वतंत्र बसफेरी आहे.
आजची बस (एमएच ०७, सी ९००१) सकाळी दहाच्या सुमारास बेरडवाडीचा चढावाजवळ आली. त्यानंतर चालकाने गिअर बदलण्याचा प्रयत्न करतानाच अचानक एसटी मागे येऊ लागली. काहीसा उतार असल्याने त्यांना ती बस आवरत नव्हती. डाव्या बाजूला दरीसदृश भाग असल्याने त्यांनी उजव्या बाजूच्या दिशेला बस वळविली.दरम्यान, त्याच महाविद्यालयामध्ये बी. फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी संजना व तेथेच लिपिक म्हणून नोकरीला असणारे तिचे वडील आनंद मोटारसायकल (एमएच ०९, ईएन ७५९८) वरून महाविद्यालयाकडे जात होते. आनंद मोटारसायकल चालवित होते. ते बसमागेच होते; पण अचानक मागे आलेल्या बसमुळे त्यांना काही कळायच्या आतच त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक बसली. त्यात संजना बसखाली सापडली आणि आनंद बाजूला फेकले गेले. यामध्ये संजना गंभीर जखमी झाली. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
आनंद यांचा पाय फ्रॅक्चर झाला. दोघांनाही दवाखान्यात नेले. उपचारावेळीच संजनाचा मृत्यू झाला. आनंद यांच्या फिर्यादीवरून एसटी चालक मारुती भोई (रा. भडगाव) याच्याविरुद्ध संजनाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, आनंद नोकरीनिमित्त कुटुंबासह मुंबईत होते. त्यानंतर ते पुन्हा गावी आले होते. मुलांच्या शिक्षणासाठी कुटुंब सध्या गडहिंग्लजमध्ये राहत आहे. संजना व ते रोज मोटारसायकलने महाविद्यालयाला जातात. आज त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. संजनाच्या मागे आई-वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.
अधिकाधिक भरपाई द्या
संतप्त नागरिकांच्या शिष्टमंडळासमोर बोगरे यांनी चालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याचे सांगताच नागरिक भडकले. वास्तविक चालकाच्या प्रसंगावधनामुळे ८० हून अधिक विद्यार्थ्यांचा जीव वाचला आहे. उलट चालकावरच चूक घालणे माणुसकीला धरून नसल्याचे नागरिकांनी त्यांना बजावले. त्यानंतर बोगरे यांनी एसटीची चूक असल्याचे कबूल केले.मुळात नादुरुस्त बसगाड्या रस्त्यावर आणल्या जात आहेत. त्यातूनच हा अपघात झाला असून, मृताच्या नातेवाइकांना अधिकाधिक भरपाई देण्याची मागणी केली. त्यासाठी ठोस कार्यवाही करावी; अन्यथा संजनाच्या मृतदेहावर आगाराच्या कार्यालयासमोर अंत्यविधी करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. त्यावर बोगरे यांनी एसटीच्या चुकीमुळे झालेली घटना दुर्दैवी असून, त्यांना नियमानुसार जास्तीतजास्त मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.