मुख्यमंत्र्याच्या सभेत तृतीयपंथीयांचा टाहो! 'लाडका किन्नर' योजना काढली का? आम्ही काय खाऊ?
''महिलांसाठी लाडकी बहीण, तरुणांसाठी लाडका भाऊ योजना काढल्या, मात्र आमच्यासाठी काहीच दिले नाही. त्यातच पोलिसांनी भीक मागण्यास मनाई केल्याने आता आम्ही काय खावे?'', असा टाहो फोडत तृतीयपंथीयांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत जोरदार घोषणाबाजी केली.
मात्र, त्यांचा टाहो न ऐकता मुख्यमंत्र्यांचा ताफा सुसाट वेगाने निघून गेला. बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांचे म्हणणेही मुख्यमंत्र्यांनी न ऐकल्याने संताप व्यक्त होत आहे. शहरातील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री हडकोतील टीव्ही सेंटर मैदानावर आले होते. यावेळी पोलिसांनी सिग्नलवर भीक मागण्यास बंदी घातलेले तृतीयपंथी तेथे आले. 'सिग्नलवर पैसे मागितले म्हणून आमच्यावर कारवाई होत आहे. पोलिसांनी भीक मागण्यास बंदी घातली आहे. आम्हाला सगळ्यांनीच नाकारले. त्यामुळे जगणे मुश्कील झाले आहे…' असे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांकडे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे गाऱ्हाणे न ऐकता मुख्यमंत्र्यांचा ताफा सुसाट वेगाने निघाला. त्यावेळी तृतीयपंथीयांनी मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
बार्टीच्या विद्यार्थ्यांचीही संतप्त प्रतिक्रिया
बार्टीच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना चिकलठाणा विमानतळावर भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे त्यांनी निवेदन स्वीकारले नाही. आम्हाला न्याय मिळाला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया बार्टीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
'लाडका किन्नर' योजना काढली का?
सिग्नलवर भीक मागितल्यास आमच्यावर पोलीस कारवाई होत आहे. मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण काढली, लाडका भाऊ काढला. मात्र 'लाडका किन्नर योजना' काढली का? या तृतीयपंथीयांचा कोणी आशीर्वाद घेतलाय का? आम्हाला सगळ्यांनी नाकारले, आम्हाला जगणे मुश्कील झाल्याचे तृतीयपंथी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.