Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

साडेचार हजार बालकांवर मोफत शस्त्रक्रिया :, डॉ. विक्रमसिंह कदम

साडेचार हजार बालकांवर मोफत शस्त्रक्रिया :, डॉ. विक्रमसिंह कदम
 

सांगली, ता. ६ : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत गतवर्षी जिल्ह्यातील साडेचार हजार बालकांवर मोफत शस्त्रक्रिया झाली आहे. त्यासाठी दीड कोटींवर खर्च शासनाने केला आहे. यामुळे फेब्रुवारीअखेर दुसऱ्या स्थानावर असलेला जिल्हा २०२३-२४ या वर्षाखेरीस प्रथम स्थानी आला आहे.

लहान मुलांमधील जन्मजात विकृती, कमतरतेमुळे होणारे आजार, वाढीच्या वेळी होणारे आजार यांचे वेळीच निदान करून उपचार करणे हे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे महत्त्वावाचे उद्दिष्ट आहे. यात विशेष करून हृदयविकार आणि कर्णबधिर आजारांशी संबंधित 'कॉकलियर इम्प्लांट' या महत्त्वाच्या आजारांचा समावेश आहे. त्याचबरोबर जन्मतःच ओठ, टाळूचा दोष असणाऱ्या बालकांवर उपचार केले जातात. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत जिल्हा राज्यात सतत आघाडीवर राहिला आहे. यंदाही एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या वर्षात सर्वाधिक बालकांवर उपचार करणारा जिल्हा म्हणून सांगली प्रथम स्थानी आला आहे.

चार दोषांवर उपचार :

या कार्यक्रमात जन्मापासून ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे जन्मावेळी असलेल्या चार दोषांवर उपचार केले जातात. यात जन्मजात व्यंग, रोग, कमतरता आणि विकास विलंब यांचा समावेश आहे. हे लवकर ओळखण्यासाठी ३२ सामान्य आरोग्य परिस्थितींचा समावेश असून, तृतीय स्तरांवरील शस्त्रक्रियांसह मोफत उपचार आणि व्यवस्थापन यांचा समावेश आहे.

सहा लाखांवर बालकांची तपासणी :

या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडीपासून शालेय विद्यार्थ्यांपर्यंतच्या बालकांची तपासणी करण्यात येते. गतवर्षी अशा सहा लाख ४५ हजार २८९ बालकांची तपासणी झाली. त्यापैकी १७ हजार ९३८ बालकांवर औषध उपचार करण्यात आले. ६१ बालकांचे समुपदेशनद्वारे उपचार करण्यात आले. तर ५२२ बालकांच्या आजाराचा आधीच अंदाज येऊन लवकर उपचार करण्यात आले.

४५३६ बालकांवर शस्त्रक्रिया :

तपासणी केलेल्या बालकापैकी ४५३६ बालकांना शस्त्रक्रियेची गरज होती, त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया केल्या यामध्ये हृदयविकाराच्या २६१, तसेच कॉकलियर इम्प्लांटच्या पाच, ओठ आणि टाळूच्या २५, तर २२४५ शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

एक कोटी ६० लाखांची तरतूद :

साडेचार हजार बालकांच्या शस्त्रक्रिया झाल्या. यामध्ये शासकीय सुविधा असलेल्या रुग्णालयांत ४२४५, तर हॉस्पिटलमध्ये २९१ बालकांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यासाठी एक कोटी ६० लाखांची तरतूद केली.

चार जिल्हे आघाडीवर :

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सर्वाधिक शस्त्रक्रिया केलेल्या जिल्ह्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील ४५३६ बालकांवर गतवर्षी उपचार करण्यात आले. त्या खालोखाल कोल्हापूर जिल्ह्यातील ३५८६, सोलापूर जिल्ह्यातील २३६० आणि पुणे जिल्ह्यातील ३८३२ मुलांवर उपचार करण्यात आले. शस्त्रक्रिया करण्यामध्ये हे चार जिल्हे राज्यात आघाडीवर राहिले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.