काँग्रेसला पाठिंबा दिलेले विशाल पाटील सांगलीत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या पाठिशी
सांगली - लोकसभा निवडणुकीत सांगलीतून अपक्ष उमेदवारी दाखल करुन विजयी झालेले विशाल पाटील, यांनी विजयानंतर लागलीच केंद्रात काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे दोन डिजिटवर (99) अडकलेली काँग्रेस तीन डिजिटमध्ये (100) पोहोचली.
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. यात विशाल पाटील यांची सांगलीमध्ये काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यातच विशाल पाटील यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे
काँग्रेसच्या दोन्ही गटांनी राज्यभरात यात्रा सुरु करुन वातावरण निर्मिती सुरु केली आहे. तर महाविकास आघाडीने मुंबईत संयुक्त मेळावा घेतला त्या पाठोपाठ महायुतीने पुण्यात जाहीर कार्यक्रमात एकत्र येत निवडणुकीचे बिगुल वाजवले. सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी खानापूर विधानसभेसाठी आपली भूमिका जाहीर केली आहे. विशाल पाटील यांनी आडपाडी येथील कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर यांना विजयी करण्याच आवाहन केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आटपाडीत बोलताना विशाल पाटील म्हणाले की, आता लवकरच विधानसभा निवडणुकीचा खेळ सुरू होईल. या निवडणुकीत लाखोंने मतं सुहास बाबर यांना मिळावीत, ही आमची अपेक्षा आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही, आम्ही शब्द देवून आलेलो आहोत. जिथे आमच्यावर प्रेम आहे तेथे आम्ही प्रेम देतो. आम्ही ताकदीने तुमच्या पाठिशी ठाम राहणार आहोत, अशी ग्वाही खासदार पाटील यांनी सुहास बाबर यांना दिली. तुम्ही विधानसभेसाठी आमच्याकडून उभे रहावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण, आमचे मित्र खासदार श्रीकांत शिंदे ऐकायला तयार नाहीत, असे म्हणत विधानसभा निवडणुकीत सुहास बाबर यांना विजयी करण्याचे आवाहन विशाल पाटील यांनी केलं आहे. यामुळे विशाल पाटील यांची विधानसभा निवडणुकीत सांगलीतील इतर मतदार संघात काय भूमिका राहणार याची उत्सूकता वाढली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.