Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मणिपूर धुमसतेय. इंटरनेट बंद; संचारबंदी कायम, परीक्षा पुढे ढकलल्या; घाबरलेले राज्यपाल आसामला पळाले

मणिपूर धुमसतेय. इंटरनेट बंद; संचारबंदी कायम, परीक्षा पुढे ढकलल्या; घाबरलेले राज्यपाल आसामला पळाले
 

गेल्या दीड वर्षापासून धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुन्हा हिंसाचार सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांनी मंगळवारी राजभवनवर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. तसेच सुरक्षा दलांवर बेचकीने छऱ्याचा आणि गोटय़ांचा मारा केला.

सुरक्षा दलाशी झालेल्या झटापटीत 40 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. त्यानंतर मणिपूर सरकारने इंफाळ पूर्व व पश्चिम जिह्यात संचारबंदी आणि संपूर्ण राज्यात पाच दिवस इंटरनेटबंदी केली आहे. परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांपासून मणिपूर पुन्हा धुमसतेय. पुठल्याही क्षणी आंदोलक पुन्हा राजभवनवर चाल करून जाऊ शकतात. या भीतीने मणिपूरचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य आसामची राजधानी गुवाहाटीला रवाना झाले आहेत. त्यांच्याकडे मणिपूरचा अतिरिक्त भार आहे.

राज्यभरात संचारबंदी कायम असून महाविद्यालये, शाळांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. आचार्य आज सकाळी 10 वाजताच गुवाहाटीला रवाना झाले. राज्यपालांच्या या दौऱ्याबाबत अधिकाऱ्यानी पुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. राज्यपालच राज्यापासून पळून गेल्याने आंदोलक आणखी आक्रमक होऊ शकतात. त्यामुळे राज्यभरात सुरक्षा दलांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून सीआरपीएफ जवानांचा फौजफाटाही आणखी वाढवण्यात आला आहे.

मणिपूर पेटल्यामुळे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचीही दोन दिवसांपासून पळापळ सुरू आहे. आंदोलन आणखी भडपू नये आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी एन. बिरेन सिंह यांनी इंफाळ कॉलेज आणि इबोटोनसाना उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट घेतली. सरकार हिंसाचार भडकू नये तसेच सर्व मुद्दे, प्रश्न सोडवण्यासाठी वचनबद्ध असल्याचे बिरेन सिंह म्हणाले. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी 'एक्स'वरून दिले. दरम्यान, सरकार पीडितांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
15 सप्टेंबर पर्यंत इंटरनेट बंदी, महाविद्यालये दोन दिवस बंद 

1 सप्टेंबरपासून मेईटी भागात ड्रोन आणि रॉकेट हल्ल्यानंतर हिंसाचारात प्रचंड वाढ झाली आहे. या हल्ल्यांविरोधात 8 सप्टेंबरपासून लोकांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने 15 सप्टेंबरपर्यंत राज्यात इंटरनेटवर बंदी घातली आहे. उद्या, 12 सप्टेंबरपर्यंत महाविद्यालये बंद आहेत. इंफाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिमसह तीन जिह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. केंद्राने आणखी दोन हजार सीआरपीएफ जवानांना मणिपूरला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

मणिपूरऐवजी गुजरातेत घडले असते तर तुम्हाला वाईट वाटले असते – काँग्रेस

मणिपूरकडे साफ दुर्लक्ष करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला आहे. हे सर्व जर गुजरातेत घडले असते तर तुम्हाला नक्कीच वाईट वाटले असते. तसेच उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आणि महाराष्ट्र या प्रमुख राज्यांमध्ये असे हिंसक संकट आले असते तरी केंद्राने ते चालू दिले असते का, असा सवाल काँग्रेसने केला आहे. मणिपूर इनर सीटचे काँग्रेस खासदार डॉ. ए. बिमोल अकोईजाम यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.