नांद्रे, वसगडेतील शेतकरी 'वंदे भारत' अडविणार.!
गेली दोन वर्षांपासून संपादित जमिनीचा मोबदला न मिळाल्याने रेल्वे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासन, महसूल प्रशासन-कोणीही सहकार्य होत नसल्याचे प्रकल्पबाधितांचे म्हणणे आहे. प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांच्या संतापातून सोमवारी नव्याने सुरू होणारी वंदे भारत रेल्वे अडविणार असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे, नांद्रे, वसगडे येथील शेतकऱ्यांच्या पुणे-मिरज-लोंढा रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पासाठी नांद्रेमधील गट नंबर १६ मधील ४० शेतकरी, वसगडेमधील गट नंबर ३२ मधील ४० शेतकऱ्यांची शेतजमीन संपादन झालेली नसताना जबरदस्तीने प्रकल्प रेटत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून भूमी संपादनाचा मोबदला न देता शेतजमीन ताब्यात घेतली आहे. शासनदरबारी प्रलंबित विषय असताना देखील नवीन वंदे-भारत रेल्वे सुरू करण्यात येत आहे. यासंबंधी नांद्रे व वसगडेमधील शेतकऱ्यांनी रेल रोको व जलसमाधी आंदोलन करून देखील प्रशासनाकडून कार्यवाही झाली नाही.
झोपी गेलेल्या रेल्वे प्रशासन व महसूल प्रशासनास जागे करण्याचा प्रयत्न करणार आहेत. दरम्यान शेतकरी कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार केला आहे. दादासो पाटील, रजत पाटील, सुनील पाटील, कुलदीप पाटील, अजित पाटील, गजानन केरीपाळे यांनी निवेदन दिले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.