Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विट्यात राबताहेत शेकडो परप्रांतीय बालकामगार; प्रशासनाचे दुर्लक्ष

विट्यात राबताहेत शेकडो परप्रांतीय बालकामगार; प्रशासनाचे दुर्लक्ष
 

विटा : दारिद्र्य आणि सततची भटकंती यामुळे शाळेकडे पाठ फिरवलेल्या परप्रांतीय चिमुकल्यांनी विट्यात आश्रय घेतला आहे. आई-वडिलांनी घेतलेली पैशांची उचल फेडण्यासाठी शेकडो परप्रांतीय बालकामगार राबत आहेत. शहरातील हॉटेल्स, चायनीज खाद्यपदार्थांचे स्टाॅल्स, बांधकाम तसेच भंगार व्यवसायासह अन्यत्र या बालकामगारांचा सर्रास वापर होत आहे.

विटा शहरात भंगार व्यवसायात उत्तर प्रदेश, बिहार तर बेकरी व्यवसायात राजस्थान, गुजरात तसेच उडपी आणि सुवर्णालंकार व्यवसायात बंगाली कामगार काम करत आहेत. बांधकाम व्यवसायात कर्नाटकातील बेळगाव परिसरातील अनेक बालकामगार सध्या राबत असल्याचे दिसून येत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी तुटपुंज्या पगारावर तर काही बालकामगार केवळ दोनवेळचे जेवण आणि राहण्याची सोय होत असल्याने काम करत आहेत. अनेक परप्रांतीय व्यावसायिकांनी आपापल्या राज्यातून बालकामगार आणले आहेत. रात्रंदिवस त्यांना कामात जुंपले जाते.

या बालकामगारांचे आर्थिक व शारीरिक शोषण होत असतानाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी आहेत. परप्रांतातून आणताना चिमुरड्यांच्या आई-वडिलांसह अन्य नातेवाईकांच्या हातावर वर्षाकाठी केवळ पाच ते दहा हजार एकरकमी ठेवले जातात. त्यामुळे मालक या कामगारांना खरेदी केल्यासारखी वागणूक देतात.

बेकरी व्यवसायातील बालकामगारांना आगीच्या भट्टीसमोर तर सुवर्ण व्यवसायात ॲसिडच्या धुरात काम करावे लागते. भंगार जमा करतानाही लोखंडी साहित्याची वाहतूक करावी लागते. हॉटेल्स व कोल्ड्रिंक्स या व्यवसायातही अनेक बालकामगार राबताना दिसतात. बालकामगारांचा सर्वाधिक वापर बांधकाम व्यवसायात होत असून, या बालकामगारांना उंच मजल्यांवर सिमेंट, वाळू, वीट, खडी अशा जड साहित्याच्या वाहतुकीसाठी वापरले जाते. अशा बालकामगारांचा प्रशासनाने तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सुटका कोण करणार?

अडगळीच्या एका दहा बाय दहाच्या खोलीत १२ ते १५ बालकांची राहण्याची व्यवस्था केली जाते. त्यांना शिक्षण तर नाहीच पण पुरेसे जेवण, विश्रांती व आरोग्य सुविधाही मिळत नाहीत. या बालकामगारांना व्यक्तिगत स्वातंत्र्य नसल्याने त्यांची यातून कोण सुटका करणार? हा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.