शरद पवार गटात एन्ट्री, पहिलंच भाषण; समरजित घाटगेंकडून थेट जयंत पाटीलच 'टार्गेट'
कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला धक्का बसला आहे. गेली दहा वर्षे भाजपसोबत एकनिष्ठ असलेले शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी अखेर तुतारी फुंकली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत गैबी चौक येथे राष्ट्रवादीत प्रवेश केला.
या भाषणादरम्यान बोलत असताना घाटगे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा खास शैलीत चिमटा काढला. यावेळी सभास्थळी एकच हास्यकल्लोळ उडाला. भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात त्यांनी प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटात मंगळवारी (ता.3) समरजित घाटगे यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी बोलताना घाटगे यांनी, यंदा विधानसभा निवडणुकीतील शेवटची सभा गैबी चौकातच होणार आहे. कारण शेवटची सभा हीच महत्वाची आहे.
या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच उपस्थिती राहावे. कारण मागच्यावेळी याच गैबी चौकातून माझा त्यांनी 'करेक्ट कार्यक्रम' केला. यंदा याच चौकातून आपण त्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करायचा आहे. त्यामुळे तुम्ही ठरवा गैबी चौकात सभा घ्यावीच लागेल ,अशा शब्दात घाटगे यांनी जयंत पाटील यांना कोपरखळी लगावली.आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची मैत्री अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. पक्ष फुटीपूर्वी त्यांच्या मैत्रीची अनेक उदाहरणं आहेत. पक्ष फुटल्यानंतर हे दोघेही एकमेकांच्या विरोधात आहेत. मात्र, त्यापूर्वी विधानसभा निवडणूक लागली तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आपल्या प्रचारातून वेळात वेळ काढून मुश्रीफ यांच्या प्रचारासाठी कागल विधानसभा मतदारसंघात दोन सभा घेत असत.
शिवाय पालकमंत्री मुश्रीफ हे देखील त्यांच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील यांच्यासाठी सभा घेत असल्याचा इतिहास आहे. मात्र, यावेळी पहिल्यांदाच जयंत पाटील मुश्रीफ यांच्याविरोधात समरजित घाटगे यांच्या समर्थनात कागलमध्ये मैदानात आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.