गौतमी पाटील अचानक कोल्हापूरमध्ये दाखल झाली अन् पोलिसांची झाली दमछाक
महाराष्ट्रातील तरुणाईला जिच्या नृत्याने भुरळ घातली ती नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाच्या आयोजनावर गणेशोत्सव काळात कोल्हापुरात गेल्या वर्षी बंदी घालण्यात आली होती. मात्र ती आज अचानक करवीर तालुक्यातील राशिवडे गावातील 'सावकार' गणपतीच्या आरतीला आली आणि तिला पाहण्यासाठी चहात्यांची झुंबड उडाली.
गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील नंदगाव आणि राधानगरीतील राशिवडे इथं नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे काही तरुण मंडळांनी आयोजन केले होते. मात्र पोलीस अधीक्षकांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुशंगाने गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती.
कोल्हापूर जिल्ह्यात गणेशोत्सव काळात मागील वर्षी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास बंदी घातली होती. परंतु ती कोल्हापूरात यावर्षी सावकार गणपतीच्या महाआरतीसाठी येणार हे काल शनिवारी सायंकाळी निश्चित झाले. त्याची माहिती आज रविवारी सकाळी कार्यत्यांनी सोशल मीडियावर दिली. यानंतर गौतमी पाटील येणार म्हंटल्यावर राशिवडे गावात बघ्यांची गर्दी सकाळपासून वाढू लागली. गौतमी पाटील राशीवडे गावात येणार असल्याने तिला पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक आल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाची मात्र रविवारी सकाळी धावपळ उडाली होती.
आज सकाळी ती महाआरतीसाठी येणार होती. त्यामुळे झालेली तरुणाईची गर्दी पाहून गावात पोलीस प्रशासनाने तत्काळ बंदोबस्त तैनात केला. दुपारी एक वाजता महाआरतीसाठी गौतमी पाटीलचे आगमन राशिवडे गावात झाले. तिच्या हस्ते गणपतीची महाआरती करण्यात आली. तर महाआरतीनंतर जमलेल्या महिलांशी तिने संवाद साधला. याचवेळी काही महिलांनी तिला फुगडी खेळण्याचा आग्रह केला असता तिने महिलांसोबत फुगडी ही घातली.गेल्या वर्षी याच सावकार गणपती मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव गौतमी पाटीलवर प्रशासनाने बंदी घातल्याने ती उपस्थित राहिली नव्हती. त्यानंतर तब्बल एक वर्षांनंतर गौतमी पाटील पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यात महाआरतीसाठी उपस्थित राहिली.
गौतमी पाटीलचा सत्कार करण्यासाठी मंडळाने भव्य स्टेज आणि साऊंड सिस्टिम ही उभारली होते. परंतु तिला पाहण्यासाठी उसळलेली गर्दी आणि सुरक्षेचे कारण देत सत्कार करण्यासाठी प्रशासनाने थेट परवानगी नाकारली. सावकार मंडळाने कोणतीही वाच्यता न करता गौतमी पाटील हिला महाआरतीसाठी बोलवल्याने राशिवडे येथे झालेली गर्दी आटोक्यात आणताना पोलीस प्रशासनाची मात्र चांगलीच दमछाक यावेळी झाली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.