सांगलीत मोठा राजकीय भूकंप; शरद पवार भाजपला धक्का देणार? माजी खासदाराने घेतली भेट
लोकसभा निवडणुकीत सांगली पॅटर्नची जोरदार चर्चा झाली.भाजपचा दोनदा खासदार राहिलेल्या या मतदारसंघात यावेळी काँग्रेस आणि ठाकरेंनी जोर लावला होता. काँग्रेसनं तिकीट नाकारल्यानंतर विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकलीही.
त्यांनी भाजपच्या संजयकाका पाटलांना पराभवाची धूळ चारली. आता याच संजयकाकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार सांगलीत भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी शरद पवारांची बुधवारी (ता.11) भेट घेतली.ही भेट पुण्यातील मोदीबागेत शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली. दोन्ही नेत्यांमध्ये साधारण अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या दोन दिग्गज नेत्यांमधील भेटीची चर्चा सांगलीत ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरील राजकीय भूकंपाचे संकेत तर नाही ना अशी चर्चा आहे.
एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी म्हणून या दोन्ही नेत्यांकडे पाहिले जाते.पण भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील थेट शत्रुत्व विसरुन थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी दाखल झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
अखेर संजयकाकांनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीवर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी आपण ही भेट सांगलीत होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आलो असल्याचं सांगितलं. तसेच या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाले नसल्याचेही भाजप नेते संजयकाका पाटील यांनी सांगत अधिकचं भाष्य करणं टाळलं.तासगावमधील एका कार्यक्रमात संजयकाका पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकासाठी मैदानात उतरण्याचे संकेत दिले होते. ते म्हणाले, सांगली लोकसभा निवडणुकीत विकासाच्या मुद्यापेक्षा जातीपातीचं राजकारण झाल्यामुळे माझी अडचण झाली.पण या पराभवानं खचून जाणारा हा संजय पाटील नक्कीच नाही.पाटील म्हणाले,पुढे दोन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आहेत.या निवडणुकीत ताकदीने काम करून आपल्याला विधानसभा जिंकायची असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.पण आता त्यांच्या या वक्तव्यामुळे संजयकाका स्वत:मैदानात उतरणार की मुलगा निवडणूक लढवणार याविषयी चर्चांना उधाण आले आहे.
शिकार करायची असेल तर दोन पावले मागे यावे लागते, असेही संजयकाका म्हणाले.तथापि,संजय पाटील यांनी स्वतः विधानसभा लढवणार की मुलगा प्रभाकर यांना निवडणुकीत उतरवणार? याविषयी सांगलीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.